Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा कहर, ट्रक गेला वाहून, तीन जणांचा मृत्यू

राज्यात विविध ठिकाणी चांगलाच पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Jul 2022 07:15 PM
यवतमाळ : पुलावरील वाहत्या पाण्यात दुचाकी नेणे पडले महागात, थोडक्यात बचावला जीव 
गेल्या तीन दिवसांपासून राळेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून ओसंडून वाहत आहे. राळेगाव तालुक्यातील लाडकी गावात मुसळधार पाऊस झाल्याने गावातून वाहणाऱ्या नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे याचं पुलावर दुचाकी घेऊन स्टंट करणे लाडकी येथील मंगेश मांडवकर याला चांगलेच महागात पडले आहे.  लाडकी येथील मंगेश मांडवकर हा शेतातून घरी जाताना लाडकी नाल्याला पुराचे पाणी ओसंडून वाहत होते  त्याने आपली दुचाकी त्या पुराच्या पाण्यातून टाकताच नाल्याच्या मधात पुराच्या पाण्याने त्याला दुचाकीसह ओढले दुचाकी घेऊन पुलावरून नदीपात्रात वाहून जाता जाता, सुदैवाने त्याने दुचाकी  पुराच्या पाण्यात सोडून दिली तो सुखरूप वाचला मात्र त्याची दुचाकी पाण्यात वाहून गेली, अखेर लाडकी येथील ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यात उतरून  काही  तासानंतर दुचाकी पाण्यातून बाहेर काढली. त्यांला हा पुराच्या पाण्यातून दुचाकी टाकण्याच्या जीव घेणा स्टंट चांगलाच महागात पडला.

 

 
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 48 तासांपेक्षा अधिक काळापासून कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस, कोरपना तालुक्यातील धानोली तांडा क्रमांक 2 येथिल बारा ते पंधरा घरात शिरले पाणी, घरातील अन्नधान्य व सामानाचे झाले नुकसान, त्वरित मदत मिळावी अशी गावकऱ्यांनी केली मागणी, जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात अड्याळ जानी येथे वीज पडून मासेमारी करणाऱ्या इसमाचा मृत्यू तर सावली शहरात देखील पावसामुळे काही घरांचे नुकसान

नंदूरबारमधील वडफळीच्या आश्रम शाळेत शिरलं नदीचं पाणी, 200 विद्यार्थ्यांना सुरक्षीतस्थळी हलवले

नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वडफळीच्या आश्रम शाळेत नदीचे पाणी शिरलं आहे. त्यामुळं विद्यार्थी अडकून पडले होते.  दरम्यान, या आश्रमशाळेतील 200 आदिवासी विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळीत वाढ

Buldhana Rain : गेल्या 7 दिवसापासून जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील मोठ्या व माध्यम प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात व परिसरात चांगला पाऊस  झाल्यानं नद्या भरुन वाहत आहेत. त्यामुळं धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. त्यामध्ये नलगंगा, खडकपूर्णा व पेनटाकळी यांचा समावेश आहे. तर 7 मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलंढग, मन, तोरणा व उतावली असे सात मध्यम प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यानं जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

नंदूरबार जिल्ह्यात वडफळीच्या आश्रमशाळेत घुसले नदीचे पाणी, दोरीच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांना काढलं बाहेर

नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी आश्रमशाळेत नदीचे पाणी घुसले आहे. जोरदार पावसामुळं देव नदी ओसंडून वाहत असून नदीचे पाणी आश्रम शाळेत शिरले आहे. आश्रम शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना दोरीच्या सहाय्याने पाण्यातून बाहेर काढले. तर काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर सहारा घेतला आहे.  तर गाव परिसररातही पाणी घुसलं आहे. 

पुराच्या पाण्यात भिजल्यानं हिंगोलीतील कुरुंदा गावातील वयोवृध्द महिलेचा मृत्यू

पुराच्या पाण्यात भिजल्यानं हिंगोलीतील कुरुंदा गावातील वयोवृध्द महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आणसाबाई सूर्यवंशी असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ही महिला घरात असताना आसना नदीचे पाणी थेट घरात शिरले. या पाण्यात सदर महिला भिजली. रात्रभर पाण्यात भिजल्यानं या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती महिलेच्या नातेवाईकांनी दिली आहे. कुरुंदा गावातील पुरात भिजून हा पहिलाच मृत्यू  झाला आहे.

वर्धा जिल्ह्यातील पुलगावमध्ये नाल्याच्या पुरात दोन अल्पवयीन मुलं गेली वाहून

वर्धा जिल्ह्यातील बरांडा पुलगावमध्ये नाल्याच्या पुरात दोन अल्पवयीन मुलं गेली वाहून गेल्याची घटना घडली. एकाचा मृतदेह  सापडला आहे. तर एका मुलाचा शोध सुरु आहे. प्रचंड पुरामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे देखील मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. याच दरम्यान काल रात्री दोन मुलं वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. 14 वर्षीय मुलगा प्रणय पुंडलीक जगताप आणि 15 वर्षीय आदीत्य संजय शिंदे हे दोघे मुले काल उशिरा बरांडा पुलगांव येथून नाल्यात वाहून गेली आहेत. यापैकी प्रणय पुंडलीक जगताप या मुलाचा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने शोधण्यात आला आहे. तर एकाचा मुलाचा शोध सुरु आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा पश्चिम भागात भूस्खलनचा  धोका, 250 नागरिकांचे तातडीने स्थलांतर

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पश्चिम भागात भूस्खलनचा धोका आहे. त्यामुळं येथील 80 कुटुंबातील 250 नागरिकांचे तातडीने स्थलांतर करण्यात आलं आहे. मिरुखेवाडी येथे भूस्खलनचा संभाव्य धोका असलेल्या वाडीतील वस्तीवरील लोकांना  खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरीत केले जात आहे. शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने शिराळा पश्चिम भागातील भूस्खलनचा धोका निर्माण झालेल्या पाच वाडीतील वस्तीपैकी चार ठिकाणच्या 80 कुटुंबातील 250  नागरिकांचे तातडीने स्थलांतर केले आहे. करुंगली येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात स्थलांतर करण्यात आले आहे. भाष्टेवस्ती, कोकणेवाडी,धामणकरवस्ती, मिरुखेवाडी, डफळेवाडी या पाच वाड्या- वस्त्यावरील  डोंगरांना भेगा पडल्या आहेत. घरात पाण्याचे उन्माळे लागले आहेत. त्यामुळे भूस्खलनचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने भाष्टेवस्ती, कोकणेवाडी, धामणकर वस्ती ,मिरुखेवाडी येथील 80 कुटुंबातील 250 लोकांना  स्थलांतर केले आहे. स्थलांतरीत लोकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली आहे. शेतीची कामे  व जनावरांची देखभाल करण्यासाठी सकाळी लोक गावाकडे जाऊन सायंकाळी परत मुक्कामी येणार आहेत. वृद्ध व लहान मुळे मुक्कामीच राहणार आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील नायरी नेरदवाडीत वीज कोसळून 13 म्हशींचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील नायरी नेरदवाडी येथील रहिवासी संजय मेहफत जाधव यांच्या घरा शेजारी बांधलेल्या सिमेंट पत्र्याच्या गोठ्यावर शुक्रवारी मुसळधार पाऊस सुरु असताना अचानक वीज पडली. त्यामुळं गोठ्यातील 13 म्हशींचा तडफडून मृत्यू झाला. तसेच गोठ्यातील खाद्य पदार्थ आणि पावसाळी वैरण जळून लाखोंचं नुकसान झालं आहे. 
वर्धा जिल्ह्यातील बाकडी नदीला पूर, वाहतुकीवर परिणाम

Wardha Rain : वर्धा जिल्ह्यातील बाकडी नदीला पूर आला आहे. या पुरामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. धनोडी गावाजवळील असलेल्या बाकडी नदीला आलेल्या पुरामुळे साडेतीन तास वहिवाट बंद होती.  आर्वी-कोंडण्यपूर महामार्ग सकाळी 7 वाजेपासून साडेदहा वाजेपर्यंत बंद होता. त्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागलं. दोन तास सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं नागरिकांचा जनजीवन विस्कळीत झालं आहे. नित्यनेमाची काम करणं कठीण झाला आहे. जिकडे तिकडं पाणी साचलं असून, रस्त्यावरील
पाणी आता थोडं ओसरल्यानं महामार्गावरील वाहतूक सुरु झाली असल्याची माहिती मिळत आहे. तब्बल साडेतीन तास महामार्ग बंद असल्यामुळं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा कहर, ट्रक गेला वाहून, तीन जणांचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात पावसानं कहर केला आहे. प्रवासी घेऊन जाणारा ट्रक पुरात गेला वाहून गेल्याची घटना घडली आहे. या मध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 3 जणांचे मृतदहे सापडले आहे. आलापल्ली वरुन भामरागडला जात असताना ट्रक पुराच्या पाण्यात वाहून गेला. अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ एका नाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. पुलावरून पाणी जातं असल्यानं हा मार्ग बंद होता. मात्र, पुलावरून पाणी ओसरु लागल्याचं बघून ट्रक ड्रायव्हरने गाडी पुढे घेतली मात्र, मध्यभागी पोहोचल्यावर लाकूड अडकल्यानं ट्रक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली आहे. 



कळसूबाई शिखरावर अडकलेल्या पर्यटकांची केली सुटका

कळसुबाईला पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे.  स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी सुटका केली. अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णवंती नदीला मोठा पूर आला आहे. 
अचानक आलेल्या पुरामुळे शेकडो पर्यटक अडकले होते. पोलीस आणि जहागीरदार वाडीतील युवकांनी रेस्क्यू करुन पर्यटकांना बाहेर काढले. शनिवारी संध्याकाळपर्यंत रेस्क्यु ऑपरेशन सुरु होते. सगळे पर्यटक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. 



चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुरात वाहणाऱ्या गाडीतून प्रवाशांचा बचाव

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात पुरात प्रवासी वाहन वाहून गेल्याची घटना घडली. या गाडीतून प्रवाशांचा थरारकपणे बचाव करण्यात आला आहे. एक प्रवासी भरलेली टाटा मॅजिक गाडी यात वाहून गेली. वाहनचालकाने टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्याला आलेल्या पुरात हलगर्जीपणाने गाडी घातली. या गाडीत एकूण 5 लोक होते. ही गाडी पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी टपावर आश्रय घेतला. माहिती मिळताच गावातील नागरिकांसह भारतीय सैन्यात असलेल्या आणि सुटीवर गावात आलेल्या निखिल काळे या जवानाने घटनास्थळी धाव घेत भर पावसात बचावकार्य राबवले. निखिल काळे आणि स्थानिकांनी दाखविलेल्या धाडसाने सर्वच प्रवाशांची  सुटका झाली. निखिल काळे या सैनिकाने प्रसंगावधान राखून केलेल्या बचावकार्याचे कौतुक केले जात आहे.



नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला...

नंदुरबार जिल्ह्यात रात्रभरापासून पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक काही अंशी प्रभावित झाली आहे.  दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. 



वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सोनोरा ढोक गावात शिरलं पुराचं पाणी

Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसानं अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान  झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोनोरा ढोक या गावात मुसळधार पाऊसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळं गावालगतच्या लाडकी नदीचा प्रवाह वाढून, नदीचे पाणी घरात शिरले आहे. यामुळं अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत.



सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. महाबळेश्वरमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे कोयना धरणात 38 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु आहे. धरणात 28.53 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या 24 तासात नवजा परिसारात 194 मिलिमीटर पाऊस तर कोयनेत 151 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वारमध्येही 177 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे.



परभणीत रात्रीपासून संततधार पाऊस सुरु

परभणीत रात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. अद्याप पावसानं उघडीप दिलेली नाही. 

वाशिम जिल्ह्यात मध्यरात्री हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

वाशिम जिल्ह्यात मध्यरात्री हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. सध्या ढगाळ वातावरण असून, पावसाची शक्यता आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Mumbai Rain Live :  राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकरी आनंदी असल्याचे दिसत आहे. 
राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळं नदी नाले धुथडी भरुन वाहत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच कोकणात देखील चांगला पाऊस पडत आहे.


राज्यात काही ठिकाणी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. नदी नाल्यांना काही ठिकाणी पूर आले आहेत. तर मराठवाड्यात या पावसामुळं शेतीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पीकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. 


बुलढाणा पाऊस


बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात रात्री देखील जोरदार पाऊस पडला. मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नदी , नाल्यासह ओढ्यांना पूर आला आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी आनंदी आहेत.


वर्धा पाऊस


वर्धा जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती झाली आहे. शहरालगत असलेल्या सालोड हिरापूर आणि धोत्रा या दोन गावाला जोडणाऱ्या नाल्याला नदीचे स्वरुप आले आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळं शेतात गेलेल्या तेरा महिला व एक पुरुष पाण्यात अडकले होते. त्यांचा जीव धोक्यात अडकला होता मात्र, रात्रीच्या या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.


चंद्रपूर पाऊस


चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील धक्कादायक घटना घडली. प्रवाशांनी भरलेली टाटा मॅजिक गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्याला आलेल्या पुरात चालकाने हलगर्जीपणाने गाडी घातली होती. या गाडीत 5 प्रवाशी होते. गाडी पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी टपावर आश्रय घेतला. गावातील नागरिकांसह सैन्यात असलेल्या निखिल काळे या जवानाने घटनास्थळी धाव घेत भर पावसात बचावकार्य राबवले. स्थानिकांनी दाखवलेल्या धाडसाने सर्वच प्रवाशांची सुटका केली आहे. 


हिंगोली


हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. पहाटेच्या सुमारास उघडीप दिलेला पाऊस पुन्हा सुरु झाल्यामुळं शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली आहे. असाच आणखी काही दिवस पाऊस सुरु राहिला तर खरिपातील कोवळ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.