बीड: साप्ताहिक सुटी असल्याने बीडहून अंबाजोगाईला आलेले पोलीस कर्मचारी तेजस वाहुळे यांच्यामुळे आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला आहे. तेजस वाहुळे यांना बस स्थानकात एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर कारमध्ये निघालेल्या त्या चोरट्याचा पाठलाग करून वाहुळे यांनी त्यास पकडले. त्यावेळी त्या तरुणाकडे चोरीचे तब्बल 63 मोबाईल आढळून आले. यावेळी त्या चोरट्याचे तिघे साथीदार मात्र पलायन करण्यात यशस्वी झाले.


तेजस वाहुळे सध्या बीड पोलीस मुख्यालय कर्तव्य बजावत आहेत. अधिक माहिती अशी की, साप्ताहिक सुटी असल्याने वाहुळे अंबाजोगाईत आले होते. दुपारी मुलाची शाळा सुटेपर्यंत वाट पाहत ते बस स्थानकात थांबले होते. यावेळी एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तो पाकीटमार किंवा मोबाईल चोर असून शकतो अशी खात्री झाल्याने वाहुळे यांनी त्याच्यावर पाळत ठेवली. 


पाठलाग करून चोराला पकडले


थोड्यावेळात तो तरुण लगबगीने बस स्थानकच्या बाहेर पडला आणि रस्त्यावर थांबलेल्या एका कारमध्ये बसलेल्या तीन साथीदारांसह लगबगीने निघाला. वाहुळे यांनी तत्काळ एका ऑटोरिक्षातून त्या कारचा पाठलाग सुरु केला. आपल्या पाळतीवर कोणी येत असल्याची अजिबात कल्पना नसलेल्या त्या चोरट्यांनी कार भगवानबाबा चौकातील पंपावर सीएनजी भरण्यासाठी थांबवली. यावेळी तिघेजण कारमधून उतरले तर एकजण कार जवळच थांबला. 


तीन जण झारखंडचे


पाठलाग करत आलेल्या वाहुळे यांनी कारजवळ थांबलेल्या चोरट्यास पकडले आणि चौकशी सुरु केली. यावेळी त्याच्यासोबतचे तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसी खाक्या दाखवताच त्या चोरट्याने तो स्वतः नागपूरचा असून सोबतचे तिघे साथीदार झारखंडचे असल्याचे सांगितले. 


नुकतेच बस स्थानकातून एक मोबाईल चोरला असल्याचंही त्याने कबूल केले. त्यानंतर वाहुळे यांनी कारची झडती घेतली असता आतमध्ये तब्बल 63 मोबाईल आढळून आले. वाहुळे यांनी मोबाईल आणि कारसह त्या चोरट्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. या कामगिरीबद्दल तेजस वाहुळे यांचे कौतुक होत आहे. 


सहा आयफोनचा समावेश


दरम्यान, जप्त केलेल्या 63 मोबाईलमध्ये सहा आयफोनचा समावेश आहे. हे मोबाईल ट्रेस होऊ नयेत म्हणून चोरट्यांनी त्याला चांदीच्या आवरणात गुंडाळले होते. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.


ही बातमी वाचा: