मुंबई : इंग्रजी बोला म्हटलं की आपली घाबरगुंडी होते, किंवा मला इंग्रजी समजतं पण बोलता येत नाही, असाच काहीसा सूर भारतीयांचा असतो. त्यातही महानगर किंवा मेट्रो सिटीमध्ये इंग्रजी बोलण्याचं प्रमाण वाढलं आहे, कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही इंग्रजीत संभाषण ही सर्वसाधारण बाब झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे इंग्रजी (English) माध्यमांच्या शाळांचेही प्रमाण वाढले असून लहानपणापासूनच आपल्या मुलांना स्पष्ट अन् फाडफाड इंग्रजी बोलता यावं अशी सध्याच्या पालकांनी इच्छा दिसून येते. त्यामुळे, इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पाल्यांना पाठवण्यात येत असल्याचे दिसते. अनेकदा विदेशवारीसाठी इंग्रजी सक्तीची असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, एका अहवालानुसार भारताबाहेर (India) किती देशांमध्ये इंग्रजीत संवाद साधला जातो, किंवा इंग्रजी बोलण्यात कोणता देश आघाडीवर, पिछाडीवर आहे हे एका अहवालातून समोर आलं आहे.
जगभरात सध्या इंग्रजी भाषेला अधिक महत्त्व आहे, कारण इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा मानली जाते. मात्र, अनेक देशांमध्ये इंग्रजीला अधिक महत्त्व न देता त्यांच्या राष्ट्रीय भाषेतच व्यवहार व अभ्यासक्रम होत असल्याचंही पाहायला मिळत आहे. भारतातही सद्यस्थितीत हिंदी, संस्कृतनंतर सर्वाधिक बोलली जाणारी भाषा इंग्रजी बनली आहे. जगभरातील देशांचा विचार केल्यास भारत हा इंग्रजी भाषा बोलण्यात जागतिक सरासरीपेक्षा पुढे आहे. भारतात सर्वाधिक इंग्रजी बोलले जाणारे शहर हे दिल्ली आहे. दिल्लीनंतर राजस्थान आणि पंजाबमध्ये सर्वाधिक फाडफाड इंग्रजी बोललं जात असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. पियरसनच्या ग्लोबल इंग्लिश प्रोफिसिएंसी अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. दिल्लीला इंग्रजी बोलण्यात 63 गुण मिळाले असून राजस्थान 60 तर पंजाबला 58 गुण मिळाले आहेत.
इंग्रजी बोलणाऱ्या जगभरातील देशांमध्ये ब्रिटन म्हणजे इंग्लंडमध्ये 98.3 टक्के लोकं आहेत. तर, अमेरिकेत 95 टक्के नागरिक इंग्रजीत संवाद साधतात. वर्ल्ड ऑफ स्टॅटिक्स (World of Statistics) च्या डेटानुसार सर्वाधिक इंग्रजी जिब्राल्टर लोकं बोलतात. येथील 100 टक्के नागरिक फाडफाड इंग्रजी बोलतात. मात्र, येथील लोकसंख्या केवळ 32,669 एवढी आहे. तर, भारतात केवळ 20 टक्के नागरिक फाडफाड इंग्रजी बोलतात. पण, लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केल्यास भारत इंग्रजी बोलणाऱ्या प्रमुख 5 देशांमध्ये आहे. तर, भारतात दिल्ली हे सर्वाधिक इंग्रजी बोलणारं शहर आहे.
जगात सर्वात कमी इंग्रजी बोलणारा देश चीन
दरम्यान, चीनमध्ये सर्वात कमी इंग्रजी भाषा बोलली जाते. चीनमध्ये केवळ 0.9 टक्के लोक इंग्रजी बोलतात. येथील नागरिक चीनी भाषेचा सर्वाधिक वापर करतात. चीनमध्ये चीनी, मंगोलियाई, तिब्बती, उइघुर आणि झुआंग भाषा बोलल्या जातात.