Dilip Walse Patil : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह विभाग अॅक्टिव्ह मोडमध्ये आलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार आहेत. राज्यातील कायदा संदर्भात चर्चा तसंच ईद सण असल्याने राज्यातील आढावा घेतला जाणार आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री आज महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. DGP कार्यालयात सकाळी 11 वाजता गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील आणि DGP सह इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे. आता या बैठकीकडे सर्वांच लक्ष लागलंय.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेत भाषण केल्यानंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय उद्या ईद आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आजच सकाळी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तसेच संपूर्ण राज्यातील संवेदनशील भागांचा आढावा घेणार आहेत. धोक्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचा कशाप्रकारे सामना करायचा, कायदा आणि सुव्यवस्था कशी राखायची यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंच्या संपूर्ण भाषणाचा आढावा घेणारा अहवाल देखील तयार होणार
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य केलं का किंवा त्यांच्या संपूर्ण भाषणाचा आढावा घेणारा अहवाल देखील तयार करण्यात येईल. औरंगाबादचे पोलीस आयुक्त तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर करतील. त्याअनुषंगाने गृहखात्याची पुढील रणनीती असणार, तसंच राज्यभरात 4 तारखेला मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता पाहता कशापद्धतीने हे प्रकरण थांबवता येईल याबाबत बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील.
औरंगाबाद पोलीस राज ठाकरेंच्या सभेची टेप ऐकणार
औरंगाबादचे पोलीस राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा पोलीस घेणार आहेत. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन पोलीस पुढची कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 16 अटी-शर्तींवर पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली होती. या अटी-शर्तींचं पालन मनसेच्या सभेत झालं की नाही याची पडताळणी देखील पोलीस करणार आहेत.
संबंधित बातम्या