मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गृहमंत्री घेणार बैठक


महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री आज महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. DGP कार्यालयात सकाळी 11 वाजता गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील आणि DGP सह इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे.


नरेंद्र मोदी आज डेन्मार्कला भेट देणार
तीन देशांच्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डेन्मार्कला भेट देणार आहेत. तेथे ते दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होतील. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यावर पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये थोड्या वेळासाठी थांबतील. तेथे ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील.


देशभरात ईदचा उत्साह 
आज देशभर ईदचा सण आज साजरा केला जाणार आहे. ईद हा मुस्लिम बांधवांसाठी आनंदाचा सण आहे. मुस्लिम समाज 30 दिवस उपवाचा उपवास आज सोडून ईदचा सण साजरा करेल. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कठोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचा ईदच्या दिवशी अलर्ट राहिल. समाजकंटकांवर विशेष लक्ष ठेवण्यासह अनावश्यक गर्दी जमू देऊ नये यासाठी सर्व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आपापल्या जिल्ह्यात गस्त घालणार आहेत.


चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात
डेहराडूनमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे आज उघडले जाणार आहेत. उद्या म्हणजे अक्षय्य तृतीयेपासून चारधाम यात्रा सुरू होणार आहे. केदारनाथचे दरवाजे 6 मे रोजी उघडतील, तर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे 8 मे रोजी उघडतील.


अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती
आज अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाईल. आज परशुमाम जयंती आहे. या निमित्ताने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भोपाळमध्ये भगवान परशुराम यांच्या सर्वात मोठ्या मुर्तीचे अनावरण करणार आहेत.  


सर्वात उंच राम मंदिराचे बांधकाम आजपासून सुरू होणार
जगातील सर्वात उंच राम मंदिराचे बांधकाम आजपासून सुरू होणार आहे. पूर्व चंपारणच्या केसरिया ब्लॉकमध्ये असलेल्या कैथवालियामध्ये हे मंदिर बांधले जाणार आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बेंगळुरू दौऱ्यावर आहेत. ते येथे चार सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणार आहेत.   


गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज एकमेकांशी भिडणार 
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 49 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज एकमेकांशी भिडणार आहेत. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. तर, अर्धातासपूर्वी नाणेफेक होणार आहे. उद्याचा सामना पंजाबच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे.