मुंबई : मनसेच्या हनुमान चालीसा कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद सहभाही होणार नाही. समर्थनाच्या चर्चेनंतर  विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. राज ठाकरे दुष्प्रचाराचं राजकारण करत असल्याची टीका करत मनसेच्या हनुमान चालीसाच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याची भूमिका विहिंपने जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील हिंदूंना मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. 


महाराष्ट्राबाहेरील कट्टर हिंदुत्त्ववादी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्व हिंदू परिषद तसंच बजरंग दल यांचा सहभाग अपेक्षित होता. परंतु आता या संघटनांनी यातून माघार घेतल्याने राज्याबाहेर याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल. 


4 तारखेनंतर जिथे जिथे लाऊडस्पीकरवरुन अजाण होणार, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. तसंच देशभरातील हिंदूंना यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्यातच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मशिदींबाहेर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याच्या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी चर्चा सुरु झाली होती. परंतु विहिंपचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी हे वृत्त फेटाळलं.


विश्व हिंदू परिषद ही राजकीय संघटना नाही किंवा राजकीय पक्षाशी संबंधित नाही. त्यामुळे ते या कार्यक्रमात मनसेच्या भूमिकेशी सहमत नाहीत. मनसेवर टीका करताना विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल म्हणाले की, "महाराष्ट्र नवनिर्माण सेना दुष्प्रचाराचं राजकारण करत आहे. विहिंप आणि बजरंग दलाने मनसेच्या हनुमान चालीसा कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला नाही. मनसेच्या कार्यक्रमात विहिंप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याचं वृत्त खोटं, निराधार आणि सत्यापासून दूर आहे."


संबंधित बातम्या


Raj Thackeray On Loudspeakers: 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, भोंग्यांवरून राज ठाकरे यांचा सरकारला इशारा