Raj Thackeray: ''त्या दिवशी एका पत्रकाराने मला विचारलं, एकदम लाउडस्पीकर अचानक. मी म्हटलं अचानक. आम्ही हा विषय काढायचा नाही का? लाउडस्पीकर हा विषय नवीन नाही. मी मांडतोय असं ही नाही. याआधी अनेकांनी मांडला आहे. मी फक्त त्याला पर्याय दिला'', असं मशिदींच्या भोंग्यांवरून पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. औरंगाबादेत मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात पार पडलेल्या सभेत बोलताना ते म्हणाले आहेत की, लाउडस्पीकर मशिदींवर लावून तुम्ही गोंगाट करणार असाल, तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पठण करू, मोठ्याने वाचू, असं ते पुन्हा एकदा म्हणाले आहेत.  


मला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत: राज ठाकरे


राज ठाकरे पुढे म्हणाले की, ''मला कुठेही महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. तशी माझी इच्छा देखील नाही. मुस्लिम समाजाने देखील ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे.'' ते म्हणाले, ''त्या दिवशी माझ्याकडे नाशिकला असताना एक पत्रकार आले, ते मुस्लिम समाजातले होते. ते माझ्या कॅबिनमध्ये आले, ते म्हणाले साहेब मी मुसलमान आहे. मात्र आम्हाला भोंग्यांचा खूप त्रास होतो. माझा लहान मुलगा लाउडस्पीकर लागलं की झोपत नाही. तो आजारी पडायला लागला आहे आणि दरवेळी तो झोपायला आला की, इकडं अझान सुरू होत होती. त्यामुळे माझं मुलं झोपू शकत नव्हतं. त्यानंतर मी त्या मशिदीत जाऊन मौलवींना भेटलो आणि म्हणालो, तुमच्या भोंग्यांमुळे माझ्या मुलाला झोप येत नाही, त्यानंतर त्यांनी आवाज कमी केला.'' 


लाउडस्पीकर हा सामाजिक विषय : राज ठाकरे 


राज ठाकरे म्हणाले, लाउडस्पीकर हा सामाजिक विषय आहे, धार्मिक नाही. जर तुम्ही या विषयाला धार्मिक वळण देणार असाल तर त्याच उत्तर धर्मानेच देऊ. आमची इच्छा नसताना आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. महाराष्ट्रामधील शांतता आम्हाला भंग करायची नाही. तशी आमची इच्छा देखील नाही, असं ते म्हणाले आहेत. 


उत्तर प्रदेशात भोगे काढले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? 


राज ठाकरे पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशात जर लाउडस्पीकर उतरवले जाऊ शकतात, तर महाराष्ट्रात का उतरवले जाऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. ते म्हणाले, ''सर्व लाउडस्पीकर अनधिकृत आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे, स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती दिल्याशिवाय तुम्ही लाउडस्पीकर लावू शकत नाही. त्याची परवानगी घ्यावी लागते. किती मशिदींकडे परवानगी आहे. कोणाकडेच परवानगी नाही. इथे संभाजीनगरमध्ये 600 मशिदी आहेत. हे संपूर्ण देशात असून देशभरातील लाउडस्पीकर खाली आले पाहिजे. प्रत्येक वेळेला आम्हीच का भोगायचं. आम्हाला सभा घ्यायचे असल्यास लगेच सांगतात, इथे शांतता क्षेत्र आहे, इथे शाळा आहे. रात्री कुठे शाळा सुरू असते?''


4 तारखेपासून ऐकणार नाही...


''रस्त्यावर येऊन तुम्ही नमाज पडता, कोणी अधिकार दिले तुम्हाला'', असं राज ठाकरे म्हणाले आहेत. ते म्हणाले, माझी शासनाला विनंती आहे, आज तारीख एक आहे. उद्या तारीख दोन आहे. तीन तारखेला ईद आहे. त्यांच्या सणात मला मध्ये यायचं नाही, मात्र 4 तारखेपासून ऐकणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 4 तारखेनंतर जिथे जिथे लाउडस्पीकरवरून अजाण होणार, तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.