Maharashtra Breaking News LIVE Updates: 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 20 Nov 2021 07:19 PM
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब

94 व्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या   उदघाटकाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब  झाला आहे.  प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन यासोबतच विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर  उपस्थिती लावणार आहे. संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे,  स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.

तोडगा नाही, एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांची बैठक संपली

मागील एक तासापासून सुरू असलेली बैठक संपली. बैठकीत तूर्तास तरी काहीच तोडगा नाही.  कर्मचारी मात्र संपावर ठाम  आहे. अनिल परब यांच्याकडून सरकार विलीनीकरणाबाबत पॉझिटिव्ह असल्याबाबतचे संकेत दिले आहे.  लवकरच पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या अमरावती दौरा करणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या अमरावती येथे दौरा करणार आहेत. त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात अमरावतीत हिंसाचार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा दौरा महत्वाचा आहे. फडणवीस उद्या स्थनिक नागरिक, लोक्रतिनिधींसह पोलिस अधिकारी यांच्या सोबत चर्चा करतील.

आझाद मैदानावरील संपकरी आक्रमक, अनिल परबांच्या घरावर मोर्चा काढण्यावर ठाम


आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून संप सुरु असून मोर्चेकरी आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावह मोर्चा धडकणार आहेत. त्यामुळे अनिल परबांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक

एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी मुंबई सेंट्रल ऑफिस येथे परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक होणार आहे.  बैठकीला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर उपस्थित राहणार आहे.  कर्मचारी संघटना अजूनही एसटी महामंडळाच्या विलीनीकरणावर ठाम आहे. बैठकीसाठी सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांना निमंत्रण नाही.  एसटी महामंडळाकडून सुरुवातीला संपाची नोटीस देणाऱ्या एसटी कर्मचारी संघटनेला चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे, 

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. थोड्याच वेळात एसटी कर्मचारी गनिमीकावा करत अनिल परब यांच्या घराबाहेर येण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळातील 49 रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीचे आदेश 

वर्धा: महामंडळाच्या  वतीनं कर्मचाऱ्यांना कामगिरीवर येण्याची नोटीस बजावण्यात आली. नोटीस बजावूनही कर्तव्यावर हजर न झालेल्या वर्धा विभागातील रोजंदार गट क्रमांक एकमध्ये असलेल्या 49 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले. उर्वरित १२ कर्मचाऱ्यांना नोटीस मिळाली आहे, याची खातरजमा करून कारवाई केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

तारक मेहता का उल्टा चष्माच्या 'या' कलाकाराच्या मुलानं दिली मुंबई उडवण्याची धमकी

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील एका कलाकाराच्या मुलाकडून मुंबई बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अंधेरी पोलिसांना फोन करुन मुंबई उडवण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्याला अंधेरी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सिंघु बॉर्डरवर संयुक्त किसान मोर्चाची बैठक सुरु

पंतप्रधान मोदींनी काल 3 शेतकरी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यापार्श्वभूमीवर आज सिंघु बॉर्डरवर आज दुपारी संयुक्त किसान मोर्चाची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख 9 नेते उपस्थित आहेत. 

भाजप खासदार वरुण गांधी यांच्याकडून पंतप्रधानांच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचं स्वागत

भाजप खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलकांना घरी परतवण्यासाठी एमएसपीवर कायदा बनवण्याची मागणी आणि इतर मुद्द्यांवरही तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली आहे. 





लखीमपूरमधील शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा : प्रियंका गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी स्वागत केले आहे. केंद्र सरकारने आता लखीमपूर-खीरी येथे भाजप नेत्याच्या गाडीखाली चिरडून ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केली आहे. 


प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. त्यांनी म्हटले की, गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने लखीमपूर-खीरीमध्ये शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडल्याचा आरोप आहे. मात्र, भाजप सरकार आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोपींसोबत व्यासपीठावर एकत्र दिसले तर ते शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा संदेश लोकांमध्ये लोकांमध्ये जाईल. पंतप्रधानांचा हा निर्णय 700 हून अधिक शहीद शेतकऱ्यांचा अपमान असेल असेही प्रियंका यांनी म्हटले. 


पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली. सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांविरोधात सुरू असलेले खटले मागे घ्यावेत आणि पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणीही प्रियंका गांधींनी केली. 

Vikram Gokhale Controversy : अभिनेते विक्रम गोखले 'त्या' विधानावर ठाम

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale)  यांनी अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले. त्यानंतर विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले. परंतु स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यावर अभिनेते विक्रम गोखले ठाम आहेत. खरं स्वातंत्र्य 2014 पासूनच मिळालं यावर ठाम असून ते बदलणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


रामदास कदम यांच्याबाबत काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दोऱ्या दरम्यान ते भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहतील. तसंच दुपारी 12 वाजता नाशिक फ्लॉवर पार्कचं उद्घाटन संजय राऊतांच्या हस्ते झाले. या वेळी पत्रकारांशी बोलताना कृषी कायद्यांवरून त्यांनी केंद्र सरकारला धारेनर धरलं. 


आंध्रात पुराचा कहर! 8 जणांचा मृत्यू, तर 12 बेपत्ता

Andhra Pradesh Rains : आंध्र प्रदेशात शुक्रवारी रायलसीमाच्या तीन जिल्ह्यांमध्ये आणि एका दक्षिण किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये 20 सेंटीमीटरपर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसानं आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. कडप्पा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 12 जण बेपत्ता झाले आहेत. वायुसेना, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेकांना वाचवण्यात आलं आहे. 


पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संवाद 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. तसेच आंध्र प्रदेशातील पूरस्थितीचा आढावाही घेऊन सर्वोतोपरी मदत देण्याचं आश्वासनही दिलं. मुख्यमंत्री कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आज पूरग्रस्त भागांचा दौरा करणार आहेत. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित

Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तर केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर रविकांत तुपकर यांनी स्वतः आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. दरम्यान, सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा यासाठी रविकांत तुपकर यांचं गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु होतं. तुपकरांची तब्येत ढासळत असल्यानं कार्यकर्त्यांची चिंता वाढू लागली होती. 


आंदोलनाला हिंसक वळण


रविकांत तुपकर यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. अन्नत्याग आंदोलनामुळे काल तुपकर यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. प्रशासनाकडून कोणत्याही प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. एका संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर हे आंदोलन आणखी चिघळलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली होती. पोलिसांच्या गाडीच्या काचाही यावेळी फोडण्यात आल्या. यानंतर तुपकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला होता. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. 



रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला रात्री पुन्हा हिंसक वळण लागलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाणा तहसीलदार यांची गाडी पेटवली. तुपकरांची प्रकृती खालावल्याने शेतकरी आणि कार्यकर्ते संतापल्याचं पाहायला मिळालं. 

 


सुनील शिंदेना त्यागाचे बक्षीस, मग रामदास कदमांना कसली शिक्षा? संजय राऊत म्हणाले की...

Sanjay Raut on Ramdas Kadam : आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विद्यमान आमदार रामदास कदम यांचा पुन्हा संधी देण्याचे शिवसेनेने टाळले आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सुनील शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. सुनील शिंदे यांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली असल्याचे राऊत यांनी म्हटले. 


संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी संजय राऊत यांनी सुनील शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. सुनील शिंदे हे मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार होते. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुनील शिंदे यांनी ही जागा त्यांच्यासाठी सोडली होती. त्याशिवाय, सुनील शिंदे यांनी अनेक वर्ष पक्षासाठी काम केले आहे. त्यांच्या या पक्षकार्याची आणि केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

अमरावतीत संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना 800 कोटींचा फटका?

Amravati Voilance : अमरावती शहरात संचारबंदीत शिथिलता देण्यात असून शहरात कायदे आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 13 तारखेपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. काल (शुक्रवारी) पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी संचारबंदीत सूट देण्याचा आदेश निर्गमित केला आहे. त्यामुळे आजपासून सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ ही उघडण्यात आली. या संचारबंदीमुळे व्यापाऱ्यांना अंदाजे तब्बल 800 कोटींचा फटका बसला असल्याची माहिती अमरावतीतील महानगर चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी दिली आहे. 


अमरावतीत हिंसाचारानंतर शहरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळं शहरातील व्यापार-उद्योगांची तब्बल 700 ते 800 कोटींची उलाढाल थांबलेली आहे. इंटरनेट सेवा बंद आहे, त्यामुळे बँकिंग सेवाही बंद असल्यामुळं व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला असल्याची माहितीही महानगर चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला : संजय राऊत

Sanjay Raut : आम्ही करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्राला दोन वर्षापूर्वी स्वतंत्र करत भगवा फडकवला असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले. शिवसेना नगरसेवक डी. जी. सुर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक महापालिकेत शिवसेनेचे 100 नगरसेवक निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


..म्हणून तीन कृषी कायदे मागे घेतले


शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी केंद्र सरकारवरही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, 1947 साली जसे आंदोलन झाले, 'चलेजाव'ची चळवळ झाली म्हणून ब्रिटिश सरकार पळाले. तसेच जनता रस्त्यावर आली असती कोण पंतप्रधान, कोण गृहमंत्री आहे हे जनतेने पाहिले नसते. त्यामुळेच कायदे मागे घेतले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

नाशिकच्या पेठ तालुक्यात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या



नाशिकच्या पेठ तालुक्यात एसटी कर्मचाऱ्यानी  आत्महत्या  केली आहे. आगारातील गहिनाथ गायकवाड या चालकाने आज दुपारी राहत्या घरात गळफास घेत जीवन संपवले. गेल्या काही दिवसांपासून सूरु असलेल्या एसटी  आंदोलनातही गायकवाडांचा  सहभाग होता. गहिनाथ गायकवाड मूळचे बीडचे रहिवाशी असून त्यांच्या पश्चात एक वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे. 


एसटी महामंडळाकडून कारवाईचा बडगा; 238 रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय


मागील 2 आठवड्यांपासून लालपरीला ब्रेक लागला आहे. एसटीच्या शासकीय विलिनीकरणासाठी कर्मचारी कामबंद आंदोलनावर ठाम आहेत. आता संप मिटत नाही, म्हणून महामंडळानं हालचाली सुरु केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्यानं आता एसटी महामंडळानं कारवाईचा बडगा उगारला आहे. काल एसटी महामंडळानं 238 रोजंदारी कामगारांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, काल महामंडळानं संपात सहभागी झालेल्या 297 कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्यामुळे आता निलंबित एसटी कर्मचाऱ्यांची संख्या 2 हजार 776 इतकी झाली आहे. 


देशवासियांना संबोधित करताना काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?



पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,  "देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला आहे. इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेनं आम्ही त्यांच्या गोष्टी देखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदल देखील केले. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत." असं मोदींनी म्हटलं आहे. 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.