Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात पुढील 4, 5 दिवसात पावसाची शक्यता
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
IMD च्या पुर्वानुमानानुसार, राज्यात पुढचे 4,5 दिवसात काही ठिकाणी हलका व काही ठिकाणी गडगडाटासह पाउस.. विदर्भात तुरळक ठिकाणी 9 ता. गारपीटीची शक्यता.
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दररोज कोरोना बाधित रुग्णसंख्या ही 2 किंवा चार अशी होती. दरम्यान आज ह्या कोरोना रुग्णवाढीने अचानक उसळी घेत धडकी भरवणारा आकडा गाठलाय. कारण आज प्राप्त झालेल्या 1 हजार 32 अहवालापैकी 45 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 41 तर अँटिजेन तपासणीद्वारे 4 अहवाल बाधित आले आहेत. तर जिल्ह्यात नवीन व्हेरियंट ओमीक्रोनचे 3 बाधित रुग्ण आढळले आहेत. आजवर जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 90 हजार 646 एवढी झाली असून यातील 87 हजार 888 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 103 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आज पर्यंत बाधित मृत संख्या 2 हजार 655 एवढी आहे.जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे असे जिल्हा प्रशासनाने आवाहन जरी केले असले तरी प्रशासनाकडून अंमलबजावणी मात्र शून्य आहे. कारण जिल्हाभरात 144 कलम लागू असताना बाजारपेठेत,मॉल मध्ये, चित्रपटगृह,लग्न सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी जमावल्या जात आहे. परंतु जिल्हा प्रशासनाकडून नियम फक्त कागद काळे करण्यासाठीच वापरले जात आहेत. प्रत्यक्षात प्रशासनाकडून नियमांची कडक अंमलबजावणी केल्यास ह्या वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवता येईल.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजा नुसार आज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर आणि परिसरात काही वेळा साठी जोरदार पावसाची हजेरी लावली,अचानक झालेल्या अवकाळी पावसाने मात्र नागरिकांची चांगलीच त्रेधा उडाली तर मालेगाव शहरातील काही ठिकाणी महानगरपालिकेने टाकलेल्या गतारावरील झाकणे पावसाने रात्रीला दिसू न शकल्याने वाहन धारकांची मोठी पंचाईत झाली.
भिवंडी तालुक्यातील दापोडा ग्रामपंचायत हद्दीमधील इंडियन कॉर्पोरेशन येथील मोजे बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. सोक्सको या कंपनी भीषण आग लागली असून गोदामातील मोजे व मशीन जळून खाक झाले आहे. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ठाणे, भिवंडी येथील तीन गाड्या दाखल झाल्या आहेत.
राज्यात सोन्या-चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ किंवा कमी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. वित्त विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. मुद्रांक शुल्क माफ किंवा कमी केल्यास महसुलावर काय परिणाम होईल तसेच या व्यावसायिकांना काय फायदा होईल याचा अभ्यास समिती करणार आहे. सध्या आयातीवर 0.1 टक्के कर आकारला जातो. समिती अभ्यास करुन एका महिन्यात राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ कारखान्यातील 62 जण कामगार कोरोनाबाधित झाले आहे. 4 जानेवारीला कर्मचाऱ्यांची टेस्ट केली होती.
भिवंडी ग्रामीण क्षेत्रातील सर्वच शासकीय वसतिगृहे, आश्रमशाळा 6 जानेवारी पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन टँकरचा भीषण अपघात घडला आहे. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी 3.15 च्या सुमारास विरारच्या शिरसाट फाटा येथे मुंबईवरून गुजरातला जाणाऱ्या लेनवर हा अपघात घडला आहे. अपघात इतका भीषण होता की टँकर चालक व क्लीनरचा यात जागीच मृत्यू झाला आहे. घटना स्थळी मांडवी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे हा अपघात हायवेला विरार च्या वाहतुक नियंत्रण कार्यालयाशेजारी झाला आहे
गेली काही वर्षे ठाणे जिल्हयातील शहरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागत आहे, मात्र यंदा पावसाळा डिसेंबर महिन्यापर्यंत लांबल्याने ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंदर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणी कपात करावी लागणार नसल्याच पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नंदुरबारमधील धडगाव तालुक्यातील मोदलगाव येथे मजुरांना घेऊन जाणाऱ्या पीकअप वाहनाला मोठा अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय. तर, पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. जखमींना धडगाव उपजिल्हा रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.
कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट ओमीक्रोनचा वेगाने होत असणारा प्रसार व जिल्ह्यात या विषाणूचा शिरकाव झाल्याचा निदर्शनास आल्याने,नांदेड जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत.त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील 1 ते 8 वी पर्यंतच्या शाळा 10 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत प्रत्यक्ष अध्यापनासाठी बंद राहणार आहेत. परंतु या बंद दरम्यान शिक्षकांचे ऑनलाइन अध्यापन हे सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.त्याच पद्धतीने 9 वी ते 12 वी चे वर्ग कोरोना विषयक नियमांचे पालन करून सुरू राहणार आहेत. परंतु कोविड रुग्ण आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून दिवस आवशयक त्या उपयोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आता दोन डोस घेणाऱ्यांनाच जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन मिळणार आहे.वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिर देवस्थानाने हा निर्णय घेतला. मोठया संख्येने भाविक दर्शनासाठी गडावर गर्दी करत असतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर समितीने घेतला निर्णय घेतला
येत्या 12 जानेवारीला बुलढान्यातील सिंदखेडराजा येथील माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी दरवर्षी जन्मोत्सव साजरा करण्यात येतो , यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने अटी व शर्तीच्या आधीन राहून जन्मोत्सव साजरा करण्यासाठी फक्त 50 जणांनाच परवानगी दिली आहे. यासोबत कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकाला RT- PCR चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह असणे, लसीचे दोन्ही डोस घेतलेल प्रमाणपत्र सोबत असणे बंधनकारक केलं आहे. यामुळे सलग गेल्या तिसऱ्या वर्षीही कोरोनामुळे जिजाऊ जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.
कोरोनानं मुंबईची काळजी वाढवली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोना रुग्णांचा उद्रेक होत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत दिवसभरात 20 हजारांच्या घरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तर लॉकडाऊन लावावा लागेल, असे संकेत आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले आहेत. काल (बुधवारी) मुंबईत दिवसभरात तब्बल 15 हजार 166 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का? असा प्रश्न आता सर्वांना सतावू लागला आहे.
खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठोपाठ भारती पवार यांनाही कोरोनाची लागण. संपर्कात आलेल्यांनी खबरदारी घेण्याचे दोन्ही खासदारांनी केले अवाहन.
पार्श्वभूमी
यवतमाळमध्ये 'मिळून साऱ्या जणी'; लोहारा पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हाती
महिला सक्षमीकरणाबाबत अनेकदा बोललं जातं, मात्र यवतमाळच्या पोलीस दलाने प्रत्यक्ष कृती करून एका पोलिस स्टेशनचे सर्व कामकाज महिलांच्या हाती देऊन नव्या पर्वाची सुरवात केली आहे. यवतमाळच्या लोहारा पोलीस स्टेशनमध्ये नव्या बदलाची सुरुवात झाली आहे. येथे पोलीस शिपाई ते वाहन चालक, बिट अंमलदार, पोलीस निरीक्षक अशी सर्वच महत्त्वाचे जबाबदारी आता लोहारा पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी कर्मचारी सक्षमपणे सांभाळत असून यामुळे यवतमाळ पोलीस दलात नव्या इतिहासाला सुरुवात झाली आहे.
सन 2015 साली स्थापन झालेल्या लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात साधारण 60 हजार लोकसंख्या आहे. या सर्वांसाठी लोहारा पोलीस ठाण्यात महिला आणि पुरुष मिळून साधारण 50 कर्मचारी कार्यरत होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी लोहारा पोलीस स्टेशनची संपूर्ण जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांना दिल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आम्ही पुरुषांपेक्षाही जास्त चांगले काम करून दाखवू असा विश्वास महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
रुग्णसेवा देणारे डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात, 291 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण
कोरोनाच्या विळख्यात राज्यातील निवासी डॉक्टरही सापडले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 291 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वाधिक सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरबाधित झाले आहे. तब्बल 80 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.
जे.जे. रुग्णालयात आत्तापर्यंत 59 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. तर नायर रुग्णालयात 40, केईएममध्ये 40 डॉक्टरांना कोरोनाची लागण झालीय. काही जणांना डिस्चार्ज मिळाला असला तरी अद्याप विलगीकरणात आहे. नायर रुग्णालय 45, केईएम 60, ठाणे 8, धुळे 8, कुपर 7, पुण्यातील ससून रुग्णालय 5, मिरज 2, लातूर, औरंगाबाद, नागपूर येथील प्रत्येकी एका निवासी डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टर कोरोनाबाधित होत असल्याने पुढील पाच ते सहा दिवस जिकरीचे ठरणार आहे. कंत्राटी पद्धतीच्या डॉक्टरांच्या नेमणुकीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण पडणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -