Maharashtra Breaking News 29 August 2022 : देशासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शर्मा यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांची सोनोग्राफी करण्यात येणार आहे.
माजी मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. लवकरच वादग्रस्त रिसॉर्ट जमीनदोस्त होणार आहे. मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आणि शासकीय पद्धतीने हे रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कारवाई होईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.
सोलापुरात रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झालाय. मुक्सीत जमादार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. काल संध्याकाळी सोलापूर रेल्वे स्टेशन येथे उभ्या असलेल्या मालवाहतूक गाडीवर चढून सेल्फी काढताना अपघात झाला होता. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर उपचार सुरू होते, मात्र अखेर आज या तरुणाचा मृत्यू झालाय.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुण्यातील विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार असल्याची माहिती आहे. पीएमआरडीए आणि पुणे महापालिका अधिकारी एकत्रित काम करणार असल्याचं जाहीर केलं आहे. या सगळ्याचं प्लॅनिंग किंवा मार्ग नेमका कसा असेल यासाठी एक प्रेझेंटेशन तयार करुन माहिती देण्यात आली आहे.
Metro 3 : वादग्रस्त ठरलेल्या मेट्रो 3 ची उद्या ट्रायल होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मेट्रो 3 ची ट्रायल होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निषेधार्थ युवासेना आणि शिवसेना महिला आघाडीने निदर्शने करत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. शिवसेना मध्यवर्ती कार्यलयासमोर शिवसेनेने हे आंदोलन केले. एका सभेत बोलताना गुलाबराव पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महिलांचा आणि डॉक्टरांचा अपमान झाल्याची भावना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गुलाबराव पाटील यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय.
भाजपने निवडणुकीत दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. देशातील 30 टक्के घरात अजूनही शौच्छालय नाहित. अच्छे दिन लोकांना पाहायलाच मिळाले नाहीत. दिवसेंदिवस महिला आत्याचारांमध्ये वाढ होत आहे, अशी टीका शरद पवार यांनी भाजपवर केली आहे.
भाजपकडून संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जातंय. 2018 मध्ये ग्रामपंचायतींना दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण झालं नाही. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट कनेक्शन देणार असं आश्वासन भाजपने दिलं होतं. परंतु, त्याची पूर्तता केली जात नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
Parbhani News : परभणी शहरातील गंगाखेड रस्त्यावरील गोरक्षणच्या मैदानात एका 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तरुणाचा खुन करुन मृतदेह आणून टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कोतवाली आणि स्थानिक गुन्हे शाखा असे दोन पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. परभणीतील रमाबाई आंबेडकर नगर येथील 20 वर्षीय यशपाल गोविंद यादव हा तरुण रविवारी रात्री बाहेर जाऊन येतो, असे सांगून घरातून बाहेर पडला. मात्र तो रात्रभर घरी आला नाही. सकाळी घरच्यांनी शोध सुरु केला असता त्याचा मृतदेह हा गंगाखेड रस्त्यावरील गोरक्षणच्या मोकळ्या जागेत आढळला. यशपालच्या गळ्यावर वार केल्याच्या खुणा आढळल्या. तो पूर्णपणे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. ही घटना पोलिसांनी घरच्यांना कळवली आणि घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. यशपालचा खून करुन मृतदेह तिथे आणून टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Reliance AGM 2022: मुकेश अंबानी यांच्या भाषणाला सुरुवात, कोणती घोषणा करणार? उत्सुकता शिगेला
मुंबईत परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूला आग, पाईपलाईनमधील गॅस गळतीमुळे आग लागल्याची शक्यता
कोरोनानंतर वाहतूक पूर्ववत न केल्याने कोल्हापूरच्या मुरगूड इथं विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. बस स्थानकावरच विद्यार्थ्यांनी ठिया आंदोलन केलं. शाळा, महाविद्यालय पूर्ववत झाली तरी किरकोळ कारण देऊन बस सेवा पूर्ववत झाली नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते.
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. ही भेट सागर बंगल्यावर झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. जवळपास एक तास दोघांमध्ये चर्चा झाली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कॉम्बिन ऑपरेशन राबवून गुंडांची झाडझाडती घेतली. या कारवाईत तीन हजार 295 सराईतांची झाडाझडती घेण्यात आली. त्यांच्याकडून कोयते, तलवारी, अंमली पदार्थ, गावठी दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरात हॉटेल आणि लॉजिंग तपासणी करण्यात आलीय. यामध्ये 42 जणांना अटक करून त्यांच्याकडून 35 कोयते, तलवारी जप्त केले आहेत. याशिवाय कलम 172 अन्वये गुन्हेंगाराविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलीय.
गणेश चतुर्थीला अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असून मोठ्या मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नागपुरात अनेक मोठ्या मंडळांनी गणपती मूर्ती मूर्ती शाळेतून मंडपात नेणं सुरू केलं आहे. "नागपूरचा राजा" ला नागपुरात मानाचा गणपती असा दर्जा असून या मंडळाने आज चितार ओळ परिसरातील मूर्ती शाळेतून नागपूरच्या राजाची मूर्ती तुळशीबाग परिसरातील त्यांच्या मंडपात नेली. नागपूरचा राजा मंडळाचा यंदाचा 26 वा वर्ष असून महापालिकेने आखलेल्या नियमाप्रमाणे यंदा मंडळांनी अवघ्या चार फुटांची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
चांदवड शहरात गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल चोरी, घरफोडी या सारख्या गुन्ह्यात वाढ झाली आहे, रात्रीच्या सुमारास चोरट्यांचे टोळके रस्त्यावर फिरतात, गाड्यांची चोरी करतात. मात्र पोलिसांच्या हाती कोणी सापडत नाही, काही दिवसांपूर्वी शहरातील गुरुकुल कॉलनीत मध्यरात्री च्या सुमारास सहा चोरटे टेहळणी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तर अन्य भागातून मोटारसायकल घेऊन जाताना कॅमेरात चित्रीत झालेत. पोलिसांनी गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरतेय
Mumbai News : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबतचा निर्णय मुंबई महापालिकेकडून होल्डवर
गणेशोत्सव आटोपल्यानंतरच निर्णय घेऊ महापालिका सहाय्यक आयुक्तांचे स्पष्टीकरण
शिवसेनेने दसरा मेळाव्याकरता शिवाजी पार्क येथील परवानगीकरता दोनदा पत्र देऊनही महापालिकेने अर्ज अनिर्णीत ठेवलाय
सध्या सर्व स्टाफ गणेशोत्सवाकरता आवश्यक प्रशासनिक बाबी आणि तयारीत गुंतल्यामुळे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत निर्णय होऊ शकलेला नाही असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे
Mumbai News: शिवडी येथील एका उंच इमारतीवरून पडून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहेत. या इमारतीच्या 21 मजल्यावर त्यांचे घर आहे. हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
Share Market : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या (Share Market Crash) पडझडीने झाली आहे. बाजारातील व्यवहार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला. जागतिक पातळीवर शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला. एसजीएक्स निफ्टीत 300 अंकांची घसरण झाली. क्लिक करा आणि वाचा बातमी.
Jalgaon News : गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला मात्र सुडाचं राजकारण करुन त्यांच्याच मुलीचा पराभव करण्यात आला. हे रोहिणी खडसेंना लक्षात आलं. मात्र पंकजा मुंडे यांच्याही लक्षात यायला पाहिजे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं. राष्ट्रवादीने काढलेल्या संवाद यात्रे निमित्ताने अमोल मिटकरी जळगाव जिल्ह्यात बोडवड सभेत बोलत होते. मिटकरी म्हणाले की, "आता 12 आमदारांची यादी राज्यपाल लवकर करतील. 12 आमदाराच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. त्यामुळे पक्ष वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात दिसत आहे. रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत आल्या तशाच पंकजा मुंडेंनीही पाऊल उचलावं."
Nanded News : मुखेड हैदराबाद रोडवरील नरसी-गडगा इथे भरधाव वेगाने जाणाऱ्या टाटा सुमो आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू तर एक गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील औराळा इथले दोन तरुण आज सकाळी दुचाकीवरुन अहमदपूरकडे जात होती. गडगा-नरसी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर टाटा सुमो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. ज्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाला आहे. अपघातातील तरुण एकाच कुटुंबातील असून दोघे चुलत भाऊ होते. यातील दीपक जगदेवराव पवार याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत जखमी तरुणाला नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं,
Buldhana News: पोळ्याच्या दिवशी खामगाव शहरातील बोरिपुरा भागात दोन गटात झालेल्या दगडफिकेच्या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटातील 76 जणांवर गुन्हे दाखल करत काही आरोपीना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपा आमदार आकाश फुंडकर व हिंदुत्ववादी संघटना व शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज खामगाव बंदच आवाहन केलं आहे.
Reliance AGM: रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारणसभा (AGM) आज पार पडणार आहे. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी या बैठकीत मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. रिलायन्स 5 जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ, 5 जी इंटरनेट दरासह जिओच्या आयपीओची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय, मुकेश अंबानी कंपनीच्या संचालक मंडळावर आपल्या मुलांना सहभागी करून घेतील अशी शक्यता आहे. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसह मुंबई शेअर बाजाराचेही लक्ष या बैठकीकडे लागले आहे. क्लिक करा वाचा सविस्तर बातमी...
Ganeshotsav: बाप्पाचं आगमन काही दिवसांवर आलं असून सध्या मूर्ती कारखान्यात बाप्पाच्या मूर्त्यांवर शेवटचा हात फिरवला जात आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा सावट असल्याने मूर्तिकार आणि कारागीर संकटात सापडले होते. मात्र कोरोनाचे सावट कमी झाल्याने गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे गणेश मूर्त्यांना चांगली मागणी आली आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
लालबागचा राजाच्या मूर्तीची पहिली झलक
मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाच्या मूर्तीची पहिली झलक आज पाहायला मिळणार आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठी गर्दी उसळते.
सर्वात शक्तिशाली ओरियन स्पेस रॉकेट आज अंतराळात पाठवणार
नासाचे आजपर्यंतचे सर्वात शक्तिशाली ओरियन स्पेस रॉकेट आज अंतराळात पाठवणार आहे. मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी ही चाचणी आहे. सध्या या रॉकेटमध्ये कोणी अंतराळवीर नसले, त्या ऐवजी पुतळे पाठवले जाणार आहेत. तब्बल 50 वर्षांनंतर नासा मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे
आज ठाण्यात शरद पवारांची पत्रकार परिषद
शरद पवार आज ठाण्यात आहेत. पवार जिल्हाभरातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच, शरद पवारांची पत्रकार परिषद होणार आहे.
नाशिकमध्ये भरणार खड्ड्यांचे प्रदर्शन
गणेशोत्सवात खड्ड्याचे देखावे सादर करण्याचे आवाहन भाकपने केले आहे. शहरातील खड्ड्यांनी नाशिककर त्रस्त आहेत. गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे बुजविण्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले होते. मात्र अजूनही दहा टक्केही काम न झाल्यानं नाशिककरांच्या व्यथा संताप गणेशोत्सव मांडण्याची स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी बक्षीसही दिले जाणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -