कोल्हापूर : महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदाचे (Kolhapur Guardian Minister) वाटप करण्यात आल्यानंतर खदखद सुरू झाली आहे. ही खदखद पहिल्यांदा रायगड आणि नाशिकमध्ये उफाळून आल्यानंतर आता कोल्हापूरमध्ये सुद्धा पालकमंत्रीपदावरून ठिणग्या पडण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमध्ये सार्वजनिक आरोग्य मंत्री शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांना पालकमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. आबिटकर यांना पालकमंत्रीपद मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मात्र नाराजी लपून राहिलेली नाही. दुसरीकडे प्रकाश आबिटकर यांना संधी मिळाल्याने शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचीही जाहीर व्यक्त करण्याची मालिका सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची सातत्याने मंत्रिपद मिळाली नसल्याची खंत समोर येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या मनातील मीच पालकमंत्री
त्यामुळे कोल्हापूरमध्ये सुद्धा पालकमंत्रीपदावरून सर्वकाही आलबेल सुरु नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं असलं तरी कोल्हापूरपासून सहाशे किलोमीटर अंतरावर वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आल्याने सुद्धा राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या पालकमंत्रीपदामध्ये सतेज पाटील यांच्याशी असलेला अदृश्य दोस्ताना सुद्धा कारणीभूत ठरला आहे का? अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रीपदावरून नाराज व्यक्त केली असून ते म्हणाले की गेल्या वीस वर्षांपासून मी मंत्री आहे. या सर्वांमध्ये केवळ 14 मंत्री पालकमंत्री राहिलो आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
हे सह पालकमंत्री पद काय आहे हे मुंबईला जाऊन समजून घेईन
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यासाठी सह पालकमंत्री म्हणून भाजपच्या माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय सुद्धा मुश्रीफ यांना पटला नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली असता त्यांनी सह पालकमंत्र्यांची नवीन पद्धत आता आली आहे, हे सह पालकमंत्री पद काय आहे हे मुंबईला जाऊन समजून घेईन, अशी प्रतिक्रिया दिली.
यावेळी माझा नंबर होता, क्षीरसागरांची नाराजी
दुसरीकडे शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांची सुद्धा नाराजी जाहीरपणे प्रकट होत आहे. त्यांनी पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपद निश्चित असल्याचे सांगतना पालकमंत्रीपदावर सुद्धा दावा केला होता. मात्र, त्यांना सुद्धा संधी मिळालेली नाही. त्यामुळे आपल्याला जर हे पद मिळालं असतं, तर मतदारसंघासाठी चांगले काम झालं असतं. यावेळी माझा नंबर होता असे सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या