Maharashtra Breaking News 26 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
धर्मवीर आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी
धर्मवीर आनंद दिघे यांची आज पुण्यतिथी आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच पुण्यतिथी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सकाळ 11 वाजता शक्तीस्थळ येथे उपस्थित राहणार आहेत. सोबत दादा भुसे आणि इतर मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. एका फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते यावेळी केले जाणार आहे. दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटात असलेले खासदार राजन विचारे, अनिता बिर्जे, केदार दिघे देखील शक्तीस्थळवर येणार आहेत.
भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा निवृत्त होणार
भारताचे 48 वे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा आज सेवानिवृत्त होणार आहे. त्यांच्या जागी न्यायमूर्ती उदय लळीत हे भारताचे 49 वे सरन्यायाधिश होणार आहेत.
सोलापुरातील आयकर विभागाची कारवाई सुरुच
सोलापूर शहरात जवळपास सात ठिकाणी आयकर विभागाच्या पथकांची तपासणी सुरु आहे. काल सकाळी 7 वाजता सुरु झालेली ही कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरूच होती.
मुंबई गोवा महामार्गाची मंत्र्यांकडून पाहणी
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज मुंबई गोवा महामार्गाची पहाणी करणार आहेत. त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक टीम उपस्थित होती.
तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा यांना अटक
इस्लाम आणि मोहम्मद पैगंबरांवर यांच्या बद्दल अक्षेपार्ह वक्तव्य करण्या प्रकरणात भाजपकडून निलंबित आमदार टी राजा यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. यावर आज गोंधळ होण्याची शक्यता आहे.
आज बैलपोळा सण
आज राज्यात बैलपोळा सण साजरा केला जातोय. त्यानिमित्ताने विविध भागात बैलांची मिरवणूक निघणार आहे.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर सुरु असलेल्या ब्लॅाकची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर सुरु असलेल्या ब्लॅाकची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक कोंडी पाहून तातडीनं जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, नॅशनल हायवे प्रशासन आणि एमएसआरडीच्या अधिकाऱ्यांना उद्या सकाळी साडेअकरा वाजता पाहणी करायच्या सूचना दिल्या.
Pune : पुण्यातील चांदणी चौकात फ्लायओव्हरच्या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
पुणे शहरातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेल्या फ्लायओव्हरच्या कामामुळे होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडी संदर्भात स्थानिक प्रवाशांनी थेट साताऱ्याला जात असताना वाटेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत गाऱ्हाणे मांडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ संबंधीत सर्व अस्थापनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांदणी चौकातील फ्लायओव्हरपाशी होणाऱ्या वाहतूक कोंडीची पहाणी करून प्रवाशांची समस्या सोडवण्याचे आदेश दिले आहेत.
Andheri Station : अंधेरी स्थानकातील लिफ्टमध्ये अडकलेल्या 18 जणांची सुटका, गरोदर महिला जखमी
अंधेरी रेल्वे स्थानकातील लिफ्टमध्ये एकूण 18 जण अडकले होते. यामध्ये एका गरोदर महिलेचा समावेश होता. यापैकी 17 जणांना आता सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तर गरोदर महिला जखमी झाली आहे. या महिलेला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
भाजपच्या श्रीकांत देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा, बलात्काराच्या आरोपांत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर
भाजपच्या श्रीकांत देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. बलात्काराच्या आरोपांत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. देशमुख हे भाजपचे माजी सोलापूर जिल्हाप्रमुख आहेत. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 12 सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली असून तोपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
बैल धुण्यास गेलेल्या तरुणाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू, नाशिकमधील घटना
आज सर्वत्र पोळा सण साजरा होत असतानाच येवला तालुक्यातील कुसूर गावातील तरुण बैल धुण्यास बंधाऱ्यावर गेला असता या तरुणाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऐन पोळा सणाच्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मधुकर गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे.