Maharashtra Breaking News 20 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या धुळे येथे आगमनादरम्यान नियोजना अभावी स्टेजवर चेंगराचेंगरी झाली आहे. आदित्य ठाकरे स्टेजवर पोहोचताच कार्यकर्त्यांची एकच उडाली झुंबड उडाली. या कार्यक्रमादरम्यान नियोजनाचा अभाव दिसून आला. आदित्य ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर परतताना देखील स्टेजवरून बहुतांश कार्यकर्त्यांची स्टेजवरून पडझड झाली.
धरणगाव येथील सभेत आदित्य ठाकरे यांनी जे शिवसेना सोडून गेले ते गद्दार अशी टीका केली होती. या टीकेवर गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही गद्दार नाही तर आम्ही खुद्दार आहोत असे उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना दिलंय.
आम्ही जो प्रयत्न केला तो शिवसेना वाचवण्यासाठीच केला. मात्र शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न त्यांना आवडलेला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत. मात्र आम्ही गद्दर नाही तर आम्ही खुद्दार आहोत असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
रत्नागिरी : कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी भुमीअधीग्रहण करून 60 वर्षे पूर्ण झाली. तरीसुद्धा प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे हे चौथे आमरण उपोषण असून उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना कामथे येथील कुटीर रुग्णालय येथे अति दक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले आहे.
मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूणच्या पागनाक्यावर झालेल्या अपघातात सावर्डे कोंडमाळा येथील किरण कृष्णा घाणेकर याचा मृत्यू झालाय. महामार्गावरील खड्डे चुकवताना हा अपघात झाला. अपघात मृत्यू झालेल्या युवकाच्या नातेवाईकांनी दीड तास मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला.
ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे हा अपघात झाला आहे असा नातेवाईकांनी आरोप करत महामार्ग रोखला. अखेर स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मध्यस्थीने मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दहा लाख रूपयांची मदत कंपनीच्या ठेकेदाराकडून जाहीर करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील ठप्प असलेली वाहतूक सुरु करण्यात आली.
हिंदुत्वाचा ज्वलंत विचार जगणाऱ्या वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न त्यांच्या सुपुत्रांना पूर्ण करण्यास नाही जमले. म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पूर्ण करु नये का? ते इतरांनी पूर्ण केले म्हणून त्यांच्या मुलांनी एवढे चिडावे का? आपल्या वडिलांच्या विचारांनी झपाटून समाजातील लोक, आयुष्य खर्च करुन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करतात. याचा त्यांच्या सुपुत्रांना आनंदच व्हायला हवा ना? पेला अर्धा भरला आहे, असेही म्हणता येते पेला अर्धा रिकामा असेही म्हणता येते! फक्त भरला आहे म्हणायला मोठे मन लागते. उरला प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्व संपत आले म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव भाजप वापरते असे जे सुपुत्रांना वाटतेय. हे म्हणजे अती झाले आणि हसू आले, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे.
मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघामध्ये आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव समारंभामध्ये भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत किशोरी पेडणेकर यांचा अभ्यास चुकीचा आहे खरा दुर्योधन कोण आहे याचा अभ्यास त्यांनी करावा अशी प्रतिक्रिया दिली. यासोबतच जांभोरी मैदानाचे दुरावस्था याआधी सुनील शिंदे यांच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील केली होती त्याची नुकसान भरपाई आधी द्यावी आणि मग भाजपाला प्रश्न विचारले असा टोला लगावला आहे.
अमरावती : मेळघाटातील कळमखार गावात महिलांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा ताफा रोखला. पावसाळ्याच्या दिवसात नालीचे पाणी घरात जात असल्यामुळे या महिलांनी रोष व्यक्त केला. आदिवासी लोकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला. अजित पवारांनी गाडीतून उतरून महिलांशी साधला संवाद सधात तातडीने समस्या निकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिले.
शिवसेनेला संपवण्याचाच नव्हे तर ठाकरे कुटुंबीयांना संपवण्याचं घाणेरडे राजकारण सध्या महाराष्ट्र सुरू आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबाला एकटं पडून देऊ नका, आम्हाला सांभाळून घ्या असं भावनिक आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलंय.
शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांच्या धरणगावात आदित्य ठाकरे यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होते, मात्र यावेळी या सर्व गद्दारांनी मस्ती करत महाराष्ट्राची लाज घालवली. जिथे आहे तिथे आनंदाने राहा, मात्र, थोडीशी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणूक लढा असं आव्हान यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलं आहे.
रिफायनरी विरोधकांनी ड्रोन सर्वेक्षण आणि माती परीक्षण या विरोधात घेतलेला आंदोलनाचा निर्णय सध्या तात्पुरता मागे घेतलेला आहे. ड्रोन सर्वेक्षण आणि माती परीक्षण करणाऱ्या कंपनीने राजापूर तालुक्यातील गोवळ गावच्या साड्यावर झालेला विरोध पाहता काम थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्थानिकांनी देखील सध्या आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या ठिकाणी असलेली पोलीस यंत्रणा आणि कंपनीचे सर्व कर्मचारी माघारी फिरल्यानंतर आंदोलक देखील माघारी फिरणार आहेत.
Jalna News : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसह इतर मागण्या घेऊन मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधीचा इशारा देणार्या शिवसंग्राम पक्ष आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या 8 पदाधिकाऱ्यांना मुंबईत जालना पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या त्यांना मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून जोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ देत नाही तोपर्यंत आम्ही जामीन देखील करणार नाही, असा पवित्रा आता या आंदोलकांनी घेतला आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे बांधकाम सुरू करावे, सारथी संस्थेला दरवर्षी 200 कोटी निधी द्यावा, यासह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी जलसमाधी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या मराठा पदाधिकाऱ्यांना मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवसंग्राम पक्ष आणि अखिल भारतीय छावा संघटनेचे हे ऐकून आठ पदाधिकारी असून त्यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात अरबी समुद्रात 22 ऑगस्ट रोजी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील एका हॉटेलमधून जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत बाळासाहेबांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्रनी आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित केले , मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली आहे . भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार , या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र यांनी समोर आणला . महाराष्ट्रातील जनता याना मतपेटीतून याचे उत्तर देईलच असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केला .
प्रख्यात उद्योजक मुकेश अंबानी धमकी प्रकरणी अटक आरोपी बिष्णू विदू भौमिक याला आज न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे. गिरगाव कोर्टात आज आरोपीला रिमांडसाठी हजर करण्यात आलं होतं.
डी बी मार्ग पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात 506 ( 2 ) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. यापूर्वी आरोपीला सुट्टीकालीन किल्ला कोर्टात हजर करण्यात आला होतं. मात्र तेव्हा 16 ऑगस्ट रोजी किल्ला कोर्टाने आरोपीला 20 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत पाठविला होतं. आरोपीने 15 ऑगस्ट रोजी रिलायन्स हॉस्पिटलच्या लेन्ड लाईन नंबरवर काल करून उद्योगपती मुकेश अंबानी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची दिली होती धमकी
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल केलेले ऑलिम्पियन कविता राऊत (Kavita Raut), दत्तू भोकनळ (Dattu Bhoknal), अंजना ठमके यांच्यासह अनेक खेळाडू अद्यापही शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असून शासनाने पहिल्यांदा देशाचे नाव उज्ज्वल केलेल्या खेळाडूंना नोकरी देण्याचा निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले.
गोविंदांना (Govinda) नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण (Reservation) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला राज्यातील स्पर्धा परिक्षा (Competative Exam) देणारे विद्यार्थी तसेच समाजातील विविध स्तरातून विरोध होत आहे. याबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या धमकीच्या संदेशावरून मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (२) अन्वये वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरळी पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की त्यांनी आज वाहतूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. हा नंबर एका पाकिस्तानी नागरिकाचा असल्याचे पोलिसांना आढळले. दरम्यान, या धमकीमागील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी वरळी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात एखाद्या दिवशी सीबीआयचा वापर होऊ नये अशी शंका काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार व्यक्ती केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्यावरून भाजपमध्ये गडकरी यांचे खच्चीकरण सुरू असल्याकडे कन्हैय्या कुमार यांनी लक्ष वेधले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त आज नागपुरात काँग्रेसकडून टेक्नॉलॉजी यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी कन्हैय्या कुमार नागपुरात आले आहेत.
"युवा है जोश में, लायेंगे इन्हे होश में" या घोषवाक् सह काढण्यात आलेल्या रॅलीच्या माध्यमातून देशाला विकणाऱ्यांच्या विरोधात लोकांना जागे करण्याचे काम करणार असल्याचे कन्हैय्या कुमार यावेळी म्हणाले. आज देशासमोर बेरोजगारी, महागाईचे आव्हान आहे, शासकीय कंपन्या विकल्या जात आहेत. हे सर्व थांबवायचे असेल तर लोकांना एकत्रित आणण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे कन्हैय्या कुमार म्हणाले.
मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल रूमला 26/11 सारखा हल्ला घडणार असल्याचा धमकीचा मेसेज व्हाट्सअपवर आला आहे. त्यामुळे पुन्हा राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोकणातील किनारपट्टी भागात कोष्टल भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी रायगडमध्ये आढळलेल्या बोटीनंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या मेसेजमुळे अलर्ट जारी केला आहे.
Pune News : केंद्र सरकारच्या कामगार कायद्यांच्या विरोधात पुण्यातील कामगार आयुक्तालयासमोरील आंदोलनाचा आजचा अकरावा दिवस आहे. या आंदोलनात आमरण उपोषण करणारे कामगार नेते यशवंत भोसले यांची प्रकृती खालावली आहे. राज्याचे कामगार कल्याण मंत्री सुरेश खाडे यांनी त्यांच्याशी फोनवरुन संपर्क देखील साधला. मात्र राज्य सरकार जोपर्यंत या कायद्यांची अंम॔लबजावणी थांबवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं कामगारांनी म्हटलं आहे.
Akola News : अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक ज. पां. खोडके यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. जपांची ओळख अकोला जिल्हा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, 19 पुस्तकांचे लेखक, कवी, समीक्षक, अनेक साहित्यिकांचे मार्गदर्शक अशी होती. जनार्दन पांडुरंग खोडके यांची साहित्यवर्तुळात 'जपां' नावाने ओळख होती. कवी 'बी' यांच्यावर त्यांनी केलेली पीएचडी मराठी साहित्य क्षेत्रातला मोठा ठेवा समजला जातो. आज त्यांच्यावर अकोल्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Solapur News : सोलापुरातील अक्कलकोटच्या बस स्थानकाची मोठी दूरवस्था झाली आहे. बस स्टँडची मुख्य इमारत जीर्ण झाली असून धोकादायक बनली आहे. तर पावसामुळे बस स्टँड परिसरात खड्डेच खड्डे पडले आहेत. स्वामी समर्थांची नगरी असलेल्या अक्कलकोटमध्ये दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र अक्कलकोटमध्ये दाखल होताचं त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भाविकांमधून देखील नाराजीचा सूर उमटत आहे. बस स्टँड परिसरात पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार विचारणा करुन देखील प्रशासनातर्फे कोणतीही दखल घेतली जात नाही. जर प्रशासनाने या संदर्भात गंभीर्याने दखल घेतली नाही तर सर्वसामान्य लोकांना घेऊन रस्त्यावर उतरु, असा इशारा आरपीआयचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी दिला.
मरीन ड्राइव्ह फ्लायओव्हरजवळ आज सकाळी एक बॅग आढळून आली. लगेच पोलीस आणि बॉम्बविरोधी पथक घटनास्थळी पोहोचले. बॅग तपासली असता ती रिकामी बॅग होती. चोरट्यांनी चोरी केल्यानंतर ही बॅग फेकून दिली असावी, असा पोलिसांना संशय आहे. काल मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज आला होता तसेच रायगडमध्ये AK 47 सापडली होती. यानंतर मुंबई पोलीस सतर्क असून कोणतीही जोखीम न घेता प्रत्येक गोष्टीची तपासणी करत आहेत.
नागपूर. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अनुषंगाने कान्होबा मूर्ती विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे शहरातील फुटाळा तलाव, शुक्रवारी तलाव, नाईक तलाव परिसरासह अन्य भागात विसर्जन टॅंकची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील सर्व तलावांमध्ये मूर्ती विसर्जनास प्रतिबंध करण्यात आले आहे. मनपातर्फे नागरिकांना कृत्रिम विसर्जन टॅंकमध्ये मूर्ती विसर्जनाचे आवाहन करण्यात आले. मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनीही टँकमध्ये मूर्ती विसर्जन केले. शहरात विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेल्या कृत्रिम टँकची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी मनपाद्वारे shorturl.at/vwH17 ही लिंक जारी करण्यात आली आहे. आपल्या जवळचे कृत्रिम विसर्जन कुंड शोधण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
Gondia News : गोंदिया येथिल एसेंट पब्लिक स्कूलच्या व्हॅनचा अपघात झाला, सकाळी 13३ मुलांना शाळेत सोडून परत जात असताना हा अपघात झाला आहे.
Nashik News : पिंपळगाव टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांची थेट पोलीस अधीक्षकांशी अरेरावी, टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांनी अडवली थेट नाशिक पोलीस अधीक्षकांची शासकीय गाडी, युनिफॉर्म असताना आणि शासकीय गाडी असताना देखील टोल कर्मचाऱ्यांची अरेरावी, टोल नाक्यावर स्क्युरिटी ठेवण्याची परवानगीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड, पोलीस निरीक्षकांनी केला टोल नाका कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल..यापूर्वी देखील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या दादागिरीच्या अनेक घटना
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमनंतर आता मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला त्यांच्या हेल्पलाइन क्रमांकावर धमकीचा संदेश, वरिष्ठ वाहतूक अधिकार्यांनी मुंबई गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांना धमकी संदेश संदर्भात माहिती दिली आहे. हा संदेश वाहतूक हेल्पलाईन वॉट्सअप नंबर वर आल्याची माहिती आहे. धमकीच्या संदेशासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे असून नंबर खरा आहे की नाही याची पडताळणी सुरू आहे. मोबाईल क्रमांक हा आंतरराष्ट्रीय क्रमांक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Nashik News : कोरोना नियंत्रणात येत नाही तोच आता स्वाईन फ्लूने डोकं वर काढलं आहे. नाशिक शहरात उपचार घेणाऱ्या अकरा जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नाशिक शहर 3, नाशिक ग्रामीण 4, अहमदनगर 3 आणि पालघरच्या एका रुग्णाचा समावेश आहे. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत हे मृत्यू झाले असून काल अहवाल प्राप्त होताच स्वाईन फ्लू मुळे हे रुग्ण दगावल्याच समोर आलं आहे. चिंताजनक बाब म्हणजे नाशिक शहरात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असून चालू ऑगस्ट महिन्यातच आजपर्यंत 64 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. हिच सर्व परिस्थिती बघता आरोग्य विभागही सतर्क झाला असून महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात स्वतंत्र स्वाईन फ्लू कक्षही सुरु करण्यात आला आहे. काळजी घ्या आणि या आजाराची लक्षणं आढळल्यास तातडीने उपचार घ्या असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.
Nashik News : पिंपळगाव टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांची थेट पोलीस अधीक्षकांशी अरेरावी
टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्यांनी अडवली थेट नाशिक पोलीस अधीक्षकांची शासकीय गाडी
युनिफॉर्म असताना आणि शासकीय गाडी असताना देखील टोल कर्मचाऱ्यांची अरेरावी
टोल नाक्यावर सिक्युरिटी ठेवण्याची परवानगीच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड
पोलीस निरीक्षकांनी केला टोल नाका कर्मचाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल
यापूर्वी देखील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या दादागिरीच्या अनेक घटना
Nandurbar News : नंदुरबार जिल्हा सातपुड्याच्या दुर्गम भागात वसला असून जिल्ह्यातील धडगाव अक्कलकुवा तळोदा या तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने संवादाची कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच मोबाईल नेटवर्क नसल्याने जिल्ह्यातील या भागात प्रशासनाच्या सुविधा पोहोचण्यास उशीर होत होता. या संदर्भात परिसरातील नागरिकांनी खासदार हिना गावित यांच्याकडे मोबाईल टॉवर उभारण्यासंदर्भात मागणी केली होती. याचा पाठपुरावा करत केंद्र सरकारच्या आदेशाने जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात सर्वाधिक 48 मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत. या भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध झाल्यास आरोग्य सुविधा आणि इतर सुविधा पोहोचण्यास मदत होणार असून भागाच्या विकासासाठी मदत होणार आहे.
Buldhana News : काल चिखलीच्या भाजप (BJP) आमदार श्वेता महाले व भाजपा युवा मोर्चा ने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात अक्षरशः अनेक गोविंदा जखमी झाले. दहीहंडी फोडण्यासाठी आपला नंबर आधी आहे. या कारणावरून अनेक दहीहंडी मंडळात सुरुवातीला वाद झाला. काही वेळात तो निवळलाही पण नंतर पुन्हा दोन मंडळात वाद होऊन तो इतका विकोपाला गेला की, या ठिकाणी अक्षरशः गोविंदांमध्ये तुफान हाणामारी झाली. पोलीस बंदोबस्त तोकडा पडल्यानं ही हाणामारी अक्षरशः एक तास सुरू होती. यामुळे मात्र शेवट पर्यंत दहीहंडी न फुटता कार्यक्रम संपला.
Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्येला आज नऊ वर्ष पूर्ण होतायत. यानिमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दोन गटांकडून वेगवगेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. अविनाश पाटील अध्यक्ष असलेल्या गटाकडून सकाळी 7 वाजता डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची जिथे हत्या करण्यात आली तिथून महात्मा फुले पुतळ्यापर्यंत निर्भया वॉकचे आयोजन करण्यात आलंय.
Kalyan Dombivli News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल (शुक्रवारी) डोंबिवली (Dombivli) येथे दीपेश म्हात्रे फाऊंडेशन तर्फे आयोजित दहीहंडी (Dahi Handi) महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी भाषणाची सुरुवात करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी, "एकदम आवाज कमी करा, फक्त गोविंदांना इथल्या लोकांना ऐकायला येईल इतकाच ठेवा, नियम आपल्याला पाळायचे आहेत. सर्व गोविंदांच मनापासून स्वागत करतो.", असं बोलत भाषणाला सुरुवात केली. यावेळी शिंदे यांनी यंदा दोन वर्षानंतर साजरा होणारा या दहीहंडी उत्सवात गोविंदांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आल्याचं सांगितलं. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेणार. संस्कृती परंपरा जोपासण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय, दीड महिन्यांत तब्बल सातशे निर्णय घेतले, असे शिंदे यांनी सांगितलं. पुढे बोलताना शिंदे यांनी दहीहंडी उत्सव तर उत्साहात साजरा झाला. आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होणार असं सांगितलं. दरम्यान डोंबिवलीत दहीहंडी उत्सवाला येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री साडे अकरा वाजता भरपावसात मानकोली वेलेगाव ते डोंबिवली मोठागाव गणेश घाट दरम्यान बोटीने प्रवास केला.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष पूर्ण होतायत. यानिमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दोन गटांकडून वेगवगेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. अविनाश पाटील अध्यक्ष असलेल्या गटाकडून सकाळी 7 वाजता डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची जिथे हत्या करण्यात आली तिथून महात्मा फुले पुतळ्यापर्यंत निर्भया वॉकचे आयोजन करण्यात आलंय.
मुंबई भाजपाकडून कार्यकर्ता मेळावा
मुंबई भाजपाकडून कार्यकर्ता मेळावा आणि शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार समारंभ होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.
आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
जळगाव जिल्ह्यातील सेनेचे पाच आमदार शिंदे गटात गेल्या नंतर उद्धव सेनेला मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बंडखोर आमदार किशोर पाटील, गुलाबराव पाटील आणि चिमण आबा पाटील यांच्या मतदार संघात तर जाणार आहेत. सकाळी 11 पासून दौऱ्याची सुरुवात होईल. दुपारी आदित्य ठाकरे धुळ्यात येतील. पारोळा चौफुली येथे आदित्य ठाकरेंचं स्वागत केलं जाणार आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आजपासून दोन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर
विरोधी पक्षनेते अजित पवार आजपासून दोन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 8.30 वाजता त्यांचं अमरावतीत आगमन होईल. त्यानंतर ते मेळघाटला रवाना होतील. मेळघाटातील भोकरबर्डी येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची ते पाहणी करतील. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र कळमखार तालुका धारणी येथे भेट देणार आहे. त्यांनतर उपविभागीय अधिकारी कार्यालय धारणी येथे कुपोषणग्रस्त बालक / बाल मृत्यू / गर्भवती महिला यांच्या संदर्भात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था समवेत चर्चा करणार आहेत.
राजीव गांधी यांची 78 वी जयंती
राजीव गांधी यांच्या 78 व्या जयंतीनिमित्त काँग्रेसकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -