Maharashtra Breaking News 18 May 2022 : Raj Thackeray: पुण्यात राज ठाकरेंची सभा होणार: मनसे
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने झटपट एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळविले पण महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे एंपिरिकल डेटा गोळा करण्यात टाळाटाळ करून ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या केली. मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षण गमावले व अनुसूचित जाती – जमातींच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा घोळ केल्यानंतर आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे कायमस्वरुपी गंभीर नुकसान केले आहे. या अन्यायाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी केली.
शहरातील विकासकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विकासकांनी केलेल्या काही मागण्यांचा थेट परिणाम राज्याच्या महसुलावर होणार असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे.
बालगंधर्व रंगमंदिर बचावासाठी पुणे शहरातील कॉंग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. मोहन जोशी, रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील सभा होणार असल्याच मनसेकडून सांगण्यात आले आहे. फक्त ही सभा खुल्या मैदानात होणार नसून पावसाची शक्यता लक्षात घेता ती पुढील आठवड्याच्या शेवटी बंदिस्त सभागृहात घेण्याच मनसेकडून नक्की करण्यात आले आहे. पण या सभेची तारीख, वेळ आणि ठिकाण हे राज ठाकरे स्वतः जाहीर करतील अस मनसेकडून सांगण्यात आलं आहे.
हिंगणघाट तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरुन हिंगणघाट व वडनेर पोलीस स्टेशन हद्दीतून मोठ्या प्रमाणात गो-तस्करी होते. हीच गो-तस्करी थांबवण्याची मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस महासंचालक मुंबई व पोलीस आयुक्त नागपूर यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते
वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील एका व्यापाऱ्यांने 67 शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना जानेवारी महिन्यात उघडकीस आली. व्यापाऱ्याने 67 शेतकऱ्यांकडून सोयाबीन,तूर खरेदी केली. मात्र खरेदी केलेल्या धान्याचे पैसे दिले नाही. आपली आर्थिक फसवणूक केल्याची बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आमचे पैसे देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली. मात्र विक्री केलेल्या धान्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान उपोषण मंडपाला मनसेचे राजू उंबरकर यांनी भेट दिली.
प्लास्टिक बंदी असताना त्याचा वापर पिंपरी चिंचवडमध्ये होताना दिसून येत आहे. त्यामुळेच आज पालिकेकडून धडक कारवाई सुरु झाली. मात्र ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप केला आणि पिंपरी कंपची बाजारपेठ बंद ठेवण्याची आडमुठी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली. शिवाय पालिका अधिकारी आणि कर्मचारी ही कारवाई करताना अपशब्द वापरत असल्याचा दावादेखील व्यापाऱ्यांनी केला. अखेर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत तूर्तास प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. 75 मायक्रोन च्या पिशव्या उपलब्ध करून द्या, अशी मागणी व्यापाऱ्यांनी यावेळी केली. तर प्रशासनाने यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं.
Nashik News : 20 हजारांची लाच घेतांना महिला पोलिस अधिकाऱ्यासह पोलिस नाईक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलिस नाईक बैरागी असे अटक केलेल्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे कालच आडगाव पोलिस ठाण्यात २० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या पोलिसाला अटक करण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवसांत दोन कारवाया झाल्याने पोलिस विभागात एकाच खळबळ उडाली आहे.
निखिल भामरेचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यात आला आहे. नाशिक कोर्टातून ताबा घेण्यात आला आहे. निखिलने शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. आता निखिलला पोलिस उद्या कोर्टात हजर करणार आहेत.
मध्यप्रदेशचे आदेशाच्या निकालाची कॉपी हाती आली नाही, केंद्रात बसलेल्या केंद्र सरकारने अशी काय जादु केली, की डेटा दिला आणि आरक्षण मिळाले हे सुप्रीम कोर्टाच्या निकालाची कॉपी हाती आल्यावर कळेल. महाराष्ट्र सरकार सोबत केंद्र सरकार सूडबुद्धीने वागत आहे, आरक्षण संपण्याचा घाट सुरू आहे, असे नाना पटोले म्हणाले.
Pune News : न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली संयुक्त मुख्य परीक्षा 2020 च्या भरती प्रक्रियेचा प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच उर्वरित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. यासंदर्भात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांतर्फे पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आली. तब्बल अडीच वर्षे उलटून गेली असून संबंधित भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, या कारणामुळे 22 आणि 29 जानेवारी 2022 रोजी नियोजित असलेली मुख्य परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली आहे. राज्य सरकार आणि एमपीएससी आयोगाशी समन्वय साधावा तसेच महाधिवक्ता यांच्याद्वारे 13 हजार विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निदर्शनास आणून द्यावा आणि मुख्य परीक्षेची तारीख तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी एमपीएससीचे विद्यार्थी करत आहेत.
गोरेगाव पोलिसानंतर केतकी चितळेला पिंपरी चिंचवड पोलीस अटक करणार आहेत. न्यायालयाकडे तशी मागणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी केली आहे. देहूरोड पोलीस आजच ताबा घेण्यासाठी गेले होते मात्र तत्पूर्वीच गोरेगाव पोलिसांनी अटकेची कारवाई पूर्ण केली. त्यामुळं या पुढचा ताबा देहू रोड पोलिसांना मिळावा यासाठी न्यायालयाकडे केली आहे. संत तुकाराम महाराज संस्थानाने केतकी विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. केतकीने 'तुका म्हणे' या वाक्याचा वापर करत, शरद पवारांविरोधातील कविता फेसबुकवर शेअर केली होती.
Buldhana News : राज्यातील वाढत्या तापमानाचा फटका आता मुक्या प्राण्यांनाही बसू लागला आहे. वाढतं तापमान आता शेळ्या-मेंढयांच्या जीवावर उठलं आहे. बुलढाण्यात उष्माघाताने एकाच दिवसात तब्बल 53 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे मेंढपाळांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मेंढपाळांचं जवळपास पाच लाखांपेक्षा अधिक नुकसान झालं आहे. त्यामुळे शासनाने नैसर्गिक आपत्ती समजून आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.
Mumbai News : 'वर्षा' बंगल्यावर थोड्याच वेळात बीडीडी चाळ संदर्भात बैठक सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मंत्री जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे, सुनिल शिंदे उपस्थित राहणार आहेत.
Jaykumar Gore : भाजप आमदार जयकुमार गोरेंना हायकोर्टाचा अंतरीम दिलासा. हायकोर्टाचं नियमित कामकाज सुरू होईपर्यंत अटक न करण्याचे निर्देश. 9 जूनपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना निर्देश . गोरेंविरोधात खोटी कागदपत्र बनवून फसवल्याचा आरोप
OBC Reservation : मध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टाने हिरवा झेंडा दाखवला आहे.
राणा दांपत्याचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर पुढील सुनावणी 15 जूनपर्यंत तहकूब, राज्य सरकारच्या याचिकेवर राणांच्यावतीनं उत्तर सादर केलं गेलं
सोयीनुसार वॉर्ड पुनर्रचना, मुंबईतील वॉर्ड पुनर्रचनेवर नाना पटोलेंचा आक्षेप, कोर्टात जाण्याचा इशारा
महाराष्ट्रातील 10 हजार परिचारिका आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत .
रुग्णालयात बाह्य स्त्रोताद्वारे (कंत्राटी) पदे भरण्याला विरोध तसेच इतर 12 मागण्या त्यांच्या आहेत
23 तारखेला महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन होणार आहे.
सरकार प्रशासनाने दखल घेतली नाही तर काम बंद आंदोलन करण्याचा ईशारा
आंदोलनाबाबत माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिलीय.
त्यामुळे मोठा परिणाम राज्यात अनेक रुग्णालयात पाहायला मिळणार आहे.
त्यामुळे रुग्णाची देखील गैरसोय होण्याची शक्यता आहे.
Buldhana News : मेहकर परिसरातील उकळी सुकळी शिवारात काल मेंढपाळांच्या वाड्यावरील मेंढ्यांच्या कळपातील काही मेंढ्या भोवळ येऊन पडून मृत्यू पावल्याचे आढळून आल्या व बघता बघता सायंकाळ पर्यंत 53 मेंढ्या दगावल्याची घटना घडल्याने मेंढपाळांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मेंढ्यांचे मृत्यू उष्माघातामुळे झालेले असल्याचा पशु चिकित्सकांचा प्राथमिक अंदाज आहे.सध्या परिसरातील तापमान 45 ते 47 अंशापर्यंत गेल्याने दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य असल्याचे चित्र आहे. उकळी सुकळी गाव परिसरात दरवर्षी प्रमाणे यंदाही मेंढपाळानी मेंढ्यांचे कळप चारायला आणले आहेत . काल सायंकाळी अचानकपणे मेंढ्यांना भोवळ येऊन त्या जागीच पडत असल्याचे दिसून आल्याने मेंढपाळ घाबरून गेले. चार कळपातील जवळपास 53 मेंढ्या मृत्यू पावल्यानंतर घबराटीचे वातावरण तयार झाले. सोनाटी, मेहकर येथून पशु चिकित्सकांना बोलवण्यात येऊन उपचाराचे प्रयत्न झाले. उष्माघातामुळे हे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून मेंढ्यांच्या शवचिकित्सेनंतर येणाऱ्या अहवालात खरे कारण समजून येईल, जवळपास पाच लाखापेक्षा अधिक मेंढपाळांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नैसर्गिक आपत्ती समजून आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे
आज बनारसमध्ये वकिलांचं कामबंद आंदोलन..
त्यामुळे आज ज्ञानव्यापी मशिदीप्रकरणात होणारी सुनावणी टळण्याची शक्यता
वकिलांच्या अराजकतापूर्ण वर्तनाची दखल घेण्याचे आदेश उत्तर प्रदेशच्या विशेष सचिवांनी दिलेत..
त्याविरोधात वाराणसी बार असोसिएशनने कामबंद आंदोलनाची हात दिलीय ..
Buldhana News : खांबाला रुमाल बांधून खेळत असताना फास लागून बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू
खामगाव शहरातील मीरा नगर परिसरातील घटना, पुर्वेश आवटे अस मृत मुलाचं नाव.
घरासमोर लोखंडी खांबाला रुमाल बांधून खेळत असताना झाली दुर्घटना.
पुर्वेश नेहमी युट्युब व इन्स्टाग्रामवर खेळत होता , कुटुंबियांची माहिती.
धुळे शहरामध्ये नशेच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात साठा अज्ञात इसम आपल्या सोबत बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती, या माहितीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ पथक तैनात केले व संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेशही देण्यात आले, त्यानुसार पोलीस प्रशासनातर्फे टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये मानवी शरीरावर परिणाम करणारे कोरेक्स या गुंगीच्या औषधासह एकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत, त्याच्याकडून जवळपास 355 या औषधाच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
या इसमाचा गुजरात येथील साथीदार या सर्व नशेच्या औषधांच्या विक्री मध्ये सहभागी असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे, त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक काही दिवसात गुजरातकडे पुढील तपासासाठी रवाना होणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी स्पष्ट केले आहे यासंदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे पुढील कारवाई करण्यात येत आहे.
Buldhana News : ज्येष्ठ साहित्यिक ,विचारवंत , शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष दिनकर दाभाडे यांच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन.
आज सायंकाळी 7.30 वाजता जळगाव जामोद येथे निधन. ते 66 वर्षांचे होते.
दिनकर दाभाडे यांचे शेतकऱ्यांवरील साहित्य राज्यभर गाजलेले.
स्मार्ट सिटी संबोधल्या जाणाऱ्या ठाण्यातील येऊर भागात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी बांधवावर उपोषणाची वेळ आली आहे. आदिवासी बांधवांनी चक्क पाण्याच्या टाकीखाली पाण्याचे हंडे पालथे ठेऊन प्रशासनाविरोधात आंदोलन केले. आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना देखील पाण्याच्या समस्येमुळे शाळा सोडण्याची वेळ आली आहे. पाणी भरण्यासाठी डोंगरात जावं लागत, आम्ही अभ्यास कधी करणार असा प्रश्न विद्यार्थी करत आहेत. आदिवासी महिलांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे. बंगल्याना आणि हॉटेल व्यवसिकांना पाणी मिळते हॉटेलमधील स्विमिंग पूल भरून वाहत आहेत, मात्र आम्हाला पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचे आदिवासी बांधव सांगतात
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
1682 : मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती, छत्रपती शाहूराजे भोसले यांची जयंती
थोरले शाहू महाराज यांचा जन्म 18 मे मे 1682 रोजी झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचे चिरंजीव होते. जन्मापासूनच ते मोंगल बादशहा औरंगजेबाच्या त्याब्यात होते. राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर राणी ताराबाई यांनी राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. तिला शह बसावा म्हणून औरंगजेबाने शाहूंना सोडून दिले. ताराबाईच्या सैन्याशी शाहूच्या सैनिकांनी केलेल्या लढाईनंतर झालेल्या तहान्वये राज्याची वाटणी झाली व थोरल्या शाहूंना साताऱ्याला राज्य स्थापन करण्याची परवानगी मिळाली. साताऱ्याला या थोरल्या शाहूंनी 1707 पासून ते मरेपर्यंत म्हणजे 15 डिसेंबर 1749 पर्यंत राज्य चालविले. साताऱ्याची राज्य गादी ही थोरली गादी म्हणून ओळखली जाई.
1913 : गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम काकोडकर यांची जंयती
पुरुषोत्तम केशव काकोडकर यांचा जन्म 18 मे 1913 रोजी झाला. कोकोडकर हे भारतीय राजकारणी आणि समाजसेवक होते. ते लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य देखील होते. गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी सहभाग घेतला होता.
1933 : भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची जयंती
सामाजिक आर्थिक विकास व भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे कट्टर समर्थक असलेल्या श्री. एच. डी. देवेगौडा यांचा जन्म 18 मे 1933 रोजी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होलेनारासिपुरा तालुक्यात असलेल्या हरदनहल्ली गावात झाला. सिविल इंजिनीरिंग पदवी धारक देवेगौडा यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शिक्षण पूर्ण करून राजकारणात प्रवेश केला. 1953 साली त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला व 1962 पर्यंत ते या पक्षाचे सदस्य राहिले. एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबाचे सदस्य असलेल्या देवेगौडा यांनी शेतकऱ्याच्या जीवनातील समस्या जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे त्यांनी शेतकरी, वंचित शोषित लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवला. 11 डिसेंबर 1994 रोजी ते कर्नाटकाचे 14 वे मुख्यमंत्री बनले. 30 मे 1996 रोजी देवेगौडा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
1048 : पर्शियन कवी उमर खय्याम यांची जयंती
उमर खय्याम हे एक प्रसिद्ध ज्योतिषी आणि कवी होते. ईशान्य इराणमधील निशापूर येथे जन्मलेल्या खय्याम यांनी आपले बहुतेक आयुष्य कारखानिद आणि सेल्जुक शासकांच्या दरबारात घालवले.
1872 :इंग्लिश तत्त्वज्ञानी व गणितज्ञ बर्ट्रान्ड रसेल यांची जयंती
1897 : अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक फ्रॅंक काप्रा यांची जयंती
1931 : अमेरिकन व्यंगचित्रकार डॉन मार्टिन यांची जयंती
1979 : माईनक्राफ्ट या गेमचे सहसंस्थापक जेन्स बर्गेंस्टन यांची जयंती
2017 : जेष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांची पुण्यतिथी
रीमा लागू यांचा जन्म मुंबईतील गिरगांव येथे 21 जून १९५८ रोजी झाला. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमा लागू यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं यासारख्या हिंदी चित्रपटांमधील तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम चांगलेच गाजले. 18 मे 2017 रोजी त्यांच निधन झाले.
1846 : मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी
आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंबर्ले येथे 20 जानेवारी 1822 रोजी झाला. त्यांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केला. 1825 मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत त्यांनी सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे इंग्रजी आणि संस्कृतचे शिक्षण घेतले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले.
मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आद्य मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारवाद्यांचे प्रवर्तक, शिक्षकतज्ञ, जेष्ट पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून ओळखले जाते. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. 18 मे 1846 रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला.
1997 : भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई रघुनाथराव गोखले यांची पुण्यतिथी
भारतीय चित्रपटातील पहिली बालनटी म्हणून कमलाबाई कामत ओळखल्या जातात. प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत गोखले व प्रसिद्ध तबला वादक लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले यांच्या त्या आई होत. त्याचप्रमाणे आजचे आघाडीचे लोकप्रिय नट व दिग्दर्शक विक्रम गोखले यांच्या त्या आजी. 6 सप्टेंबर 1901 रोजी कमलाबाई कामत यांचा जन्म झाला. तर 18 मे 1997 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
2015 : भारतीय परिचारिका अरुणा शानबाग यांची पुण्यतिथी
अरुणा रामचंद्र शानबाग यांचा 1 जून 1948 रोजी झाला. एक भारतीय परिचारिका म्हणून त्यांची ओळख होती. 1973 मध्ये परळ येथील केईएम हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ परिचारिका म्हणून काम करत असताना अरुणा शानबाग यांच्यावर वॉर्ड बॉय सोहनलाल भरत वाल्मिकी याने लैंगिक अत्याचार केला होता. या हल्ल्यात गळ्याभोवती साखळीचा फास आवळला गेल्याने त्या निश्चल अवस्थेत गेल्या होत्या. जवळपास 42 वर्ष मृत्यूशय्येवर घालवल्यानंतर अरुणा शानबाग यांचे 18 मे 2015 रोजी मुंबईत निधन झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -