Ind vs Eng Pune T20 Match पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेतील चौथा सामना आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील मैदानावर होणार आहे. या मैदानावर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया आणि जोस बटलरच्या नेतृत्त्वातील इंग्लंड यांच्यात लढत होईल. पुण्यातील टी 20 लढत जिंकून मालिका विजयाची संधी भारताकडे आहे. तर, आजची मॅच जिंकत मालिकेत बरोबरी करण्याची संधी इंग्लंडकडे आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात आज भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलंय. पुण्यातील स्टेडियमवर झालेल्या टी 20 लढतींमधील यापूर्वीची कामगिरी भारतासाठी चिंता वाढवणारी आहे.
भारताकडे मालिका विजयाची संधी पण...
भारतानं सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात पहिल्या दोन लढतींमध्ये विजय मिळवला होता. कोलकाता आणि चेन्नई येथे झालेल्या टी 20 लढतीमध्ये भारतानं विजय मिळवला. तर, राजकोट येथील तिसऱ्या टी 20 लढतीमध्ये इंग्लंडनं भारताला पराभूत केलं होतं. चौथ्या सामन्यापूर्वी भारतीय संघ मालिकेत 2-1 अशा आघाडीवर आहे. आजचा सामना जिंकल्यास भारत मालिका जिंकू शकतो. मात्र, पुण्यातील स्टेडियमवर भारतानं एकूण चार टी 20 सामने खेळले होते. त्यापैकी दोन सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला तर दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळं आजच्या सामन्यात विजय मिळवण्यात टीम इंडियाला यश येणार का पाहावं लागेल.
भारताचा पुण्यात इंग्लंडवर विजय
भारतानं इंग्लंड विरुद्ध यापूर्वी पुण्यात एक टी 20 सामना खेळला आहे. त्या मॅचमध्ये भारतानं इंग्लंडला पराभूत केलं आहे. त्यामुळं आजच्या लढतीत भारतीय संघ पुन्हा तशी कामगिरी करतो का ते पाहावं लागेल.
सूर्यकुमार यादवच्या कामगिरीकडे लक्ष
सूर्यकुमार यादव हा टी 20 क्रिकेटमधील टीम इंडियाचा आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो. मात्र, पहिल्या तीन टी 20 सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करण्यात सूर्यकुमार यादवला अपयश आलं होतं. भारतानं पहिल्या तीन सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी केली. धावसंख्येचा पाठलाग करत असताना सूर्यकुमार यादवला त्याच्या नावलौकिकाप्रमाणं कामगिरी करण्यात अपयश आलं होतं. तिसऱ्या टी 20 लढतीत भारतीय फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळं पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं आतापर्यंत एकही टी 20 मालिका गमावलेली नाही. युवा खेळाडूंच्या दमदार कामगिरीवर भारतानं विजय मिळवला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अभिषेक शर्मा, तिलक वर्मा यांनी दमदार कामगिरी केली. मात्र, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन यांच्यासारखे वरिष्ठ खेळाडू दमदार कामगिरी करण्यात अपयशी ठरले.
इतर बातम्या :