नांदेड : शासकीय सोयाबीन खरेदीस मुदतवाढ द्या या मागणीसह जिल्ह्यातील अवैध धंद्याला लगाम घालण्यासाठी कठोर उपाययोजना करा अशा सूचना देत कामचुकार अधिकाऱ्यांबाबत डीपीडीसीच्या बैठकीत खा. डॉ.अजित गोपछडेंनी प्रशासनाला धारेवर धरले. स्मशान भूमीवरील अतिक्रमणे त्वरीत हटवा, जिल्ह्यातील अवैध धंद्याला लगाम घाला. अशा अनेक मागण्या आज नांदेड (Nanded) जिल्हा नियोजन समिती बैठकीत खा. गोपछडे यांनी केल्या. नांदेड जिल्ह्यात शासनाच्या वतीने खरेदी करण्यात येणाऱ्या सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी या प्रमुख मागणीसह भाजपा (BJP) खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी प्रशासनाची कान उघाडणी केल्याचं पाहायला मिळालं. जिल्ह्यातील स्मशानभूमीवरील अतिक्रमण त्वरित हटवा. या स्मशानभूमीवर अनेकांनी आपले संसार थाटले असल्याचं गोपछडे यांनी म्हटलं. तसेच, जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करून आरोग्य सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचे नूतनीकरण करा आदी मागण्या त्यांनी केल्या.
पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन बैठकीत खा.अशोकराव चव्हाण , खा. डॉ. अजित गोपछडे, खा. रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या बैठकीत गोपछडे यांनी जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न उपस्थित केले. पांदण रस्ते योजना का यशस्वी होत नाही असा सवाल उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वन्य प्राण्यांचा शेतात सुळसुळाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संरक्षित करण्याच्या अनुषंगाने तातडीने पावले उचलावीत , बिलोली, देगलूर तालुक्यामध्ये सुरू असलेली रेतीची तस्करी, अवैध गौण खनिज उत्खनन त्वरित थांबवा , रात्रभर विना नंबरच्या हायवा गाड्या सुसाट धावत आहेत, त्यामुळे अनेकांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे. शिवाय शासनाचा महसूल ही मोठ्या प्रमाणात बुडतो आहे. त्या परिस्थितीवर अंकुश लावण्यासाठी वाळू माफीयांच्या नाकात वेसन घालण्यासाठी कायद्याचा बडगा उगारा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या.जिल्ह्यातील अनेक भागात स्मशानभूमीवर अतिक्रमण सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
लँड जिहाद या माध्यमातून शासकीय जमिनी बळकवणे, त्यावर कब्जा करणे, समशान भूमीच्या जागेवरती कब्जा करणे आदी प्रकार सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात स्मशानभूमीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे अनुषंगाने प्रशासनाने तातडीने समशानभूमीवरील अतिक्रमणे हटवावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती नव्याने उभारा. त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या. तालुकास्तरावर नोकरी करण्यासाठी येणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना निवासस्थान नसल्यामुळे अधिकारी नांदेड येथून येणे जाणे करतात. परिणामी जनतेची कामे नियोजित वेळेत पूर्ण होत नाहीत. ही बाब लक्षात घेता संपूर्ण अधिकाऱ्यांना तालुकास्तरावर निवासस्थाने उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेने तातडीने कामाला लागावे असे निर्देशही त्यांनी दिले. याचवेळी त्यांनी तृतीयपंथीच्या स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. त्यांच्यासाठी निवास उभारावेत असेही प्रश्न उपस्थित केले.
निधीचा वाटपाचे विकेंद्रीकरण करण्याच्या सूचना
जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीचे विकेंद्रीकरण करण्यात यावे. समन्यायीक पध्दतीने निधीचे वाटप करावे अशा सूचना खा. गोपछडे यांनी यावेळी दिल्या.
हेही वाचा
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला