Maharashtra Breaking News 17 August 2022 : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Vinayak Mete Accident : विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत.
Sangli News : इस्लामपूर येथे तहसील कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची एसटी बस चालवली होती. यावर इस्लामपूर मधील भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. बेकायदेशीरपणे एसटी बस चालवल्याप्रकरणी आमदार जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार भाजपाच्या नेत्यांनी इस्लामपूर पोलिसात दिली आहे. एसटी चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना, किंवा जड वाहन चालक म्हणून आवश्यक असणाऱ्या परवाना किंवा, बॅच बिल्ला नसताना जड वाहन बेकायदेशीरित्या जयंत पाटील यांनी चालवलं, असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
पुणे सोलापूर या महामार्गावर उस्मानाबदवरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका शिवशाही बसच्या मागील चाकांमध्ये अचानक आग लागली. वेळीच ही बाब इतर वाहनचालकांनी बस चालकाच्या निदर्शनास आणून दिल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मागील चाकाच्या लायनरने पेट घेतल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या बसमध्ये जवळपास 19 प्रवासी प्रवास करीत होते. हे सर्व प्रवासी सुखरुप असून त्यांना इतर दुसऱ्या बसने पुढे मार्गस्थ करण्यात आले आहे. दरम्यान ही घटना समजताच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कर्मगोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचा अग्निसुरक्षा यंत्रणादेखील घटनास्थळी दाखल झाली आणि ही आग विझवली.
Indapur News : पुणे-सोलापूर या महामार्गावर उस्मानाबादवरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका शिवशाही बसच्या मागील चाकांमध्ये अचानक आग लागली. वेळीच ही बाब इतर वाहनचालकांनी बस चालकाच्या निदर्शनास आणून दिल्याने मोठी दुर्घटना टळली. मागील चाकाच्या लायनरने पेट घेतल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या बसमध्ये जवळपास 19 प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरुप असून त्यांना इतर दुसऱ्या बसमधून मार्गस्थ करण्यात आले. दरम्यान ही घटना समजताच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कर्मगोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची अग्निसुरक्षा यंत्रणादेखील घटनास्थळी दाखल झाली आणि ही आग विझवली.
Dombivli News : डोंबिवली भोपर परिसरात राजकीय वाद विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस ब्रह्मा माळी यांना भाजप कार्यकर्ते कुंदन माळी आणि त्याच्या साथीदारांनी जिममध्ये येऊन मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी दोन्ही गटाच्या तक्रारी घेत दोघांविरोधात कारवाई सुरु केली आहे. राजकीय वर्चस्वातून हा वाद झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ब्रह्मा माळीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेनंतर डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी करत पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई करावी अशी मागणी केली. मानपाडा पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची तक्रार दाखल करुन घेतली आहे. कुंदन माळी आणि त्यांच्या तीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. ब्रह्मा माळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. हा वाद राजकीय असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला.
ED: अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने जॅकलीनची चौकशीदेखील केली होती.
Maharashtra Ministers Portfolio : खाते वाटपावर नाराज असल्याच्या चर्चेनंतर शिंदे गटातील आठ मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 जणांचं हे मंत्रिमंडळ आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील आठ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
Gadchiroli : गडचिरोली जिल्हयात तुमडी येथील पाणी भरलेल्या नाल्यावरुन पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात एक चारचाकी वाहन वाहुन गेली होती. त्याच वाहनासह चालकाचा मृतदेह आज सापडला. एका खासगी व्यवसायात चालक असलेला पांडूरंग कोठजावरे हा गुंडापल्लीकडे जाण्यासाठी वाहनातून निघाला होता. चामोशी तालुक्यातील सुभाषग्राम जवळील तुमडी नाल्यावर हे वाहन पोहचले, तेव्हा पार करत असताना नाल्याला पूर आला. त्यात पांडुरंग आपल्या टव्हेरा वाहनासह वाहून गेला होता. आज पाणी कमी झाल्यानंतर ते वाहन आणि पांडूरंगचा मृतदेह आढळून आला.
Bhandara : भंडारा गोंदिया जिल्ह्यात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळें वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने वैनगंगा नदीने आपले पात्र सोडले आहे. याचा फटका शहरालाच नाही तर भंडारा शहरालगत असलेल्या भाजी मार्केटला सुद्धा बसला असून जवळपास 4 फुट पाणी साचले आहे. त्यामुळे भाजी टंचाई उद्भवू नये, तसेच शेतकऱ्यांचे माल खराब होऊ नये यासाठी भंडारा शहरातली रस्त्यांवर भाजी मार्केट भरविण्याचा निर्णय बीटीबी प्रशासनाने घेतला आहे.
Sindhudurg : देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्याची दर्या बुरुजाच्या समुद्राकडील खालील बाजूची तटबंदी लाटांच्या मारांमुळे ढासळली. विजयुदर्ग किल्याची तटबंदी ढासळण्याचे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे व पुरातत्व विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
Pune : पुण्यातील येरवडा भागात विचित्र अपघात घडला. शास्त्रीनगर येथे विचित्र अपघातात तीन वाहने एकमेकांना धडकली. यात एका एस टी बसचा देखील समावेश आहे. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही
Solapur : सोलापुरात आज सामूहिक राष्ट्रगीतासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. सकाळी 11 वाजता संपूर्ण शहरातील 125 चौकांमध्ये एकाच वेळी सर्व सिग्नल लाल झाले. वाहनचालकांनी देखील आपल्या गाडीतून उतरून सामूहिक राष्ट्रगीताच्या उपक्रमामध्ये सहभागी झाले.
Nashik : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर टिकून असल्याने आज सकाळी 6 वाजल्यापासून 3000 क्यूसेकने गंगापूर धरणातून विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नाशिकला पावसाचा जोर वाढताच जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग धरणातून 47 हजार 760 एवढा विसर्ग करण्यात येत आहे .त्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..
कोकणातील रिफायनरीचं ड्रोन आणि माती परीक्षण अद्यापही सुरुच आहे. राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ड्रोन सर्वेक्षण आणि माती परीक्षण झालं आहे. राजापूर तालुक्यातील बारसु, सोलगाव, गोवळ यासह आसपासच्या गावातील ड्रोन सर्वेक्षण आणि माती परीक्षण अद्याप देखील झालेलं नाही. या ठिकाणी नागरिकांचा रिफायनरीला तीव्र विरोध आहे. हाच विरोध लक्षात घेता ड्रोन सर्वेक्षण आणि माती परीक्षणासाठी पोलिसांकडे संरक्षण देखील मागण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास निश्चितच विलंब लागणार आहे.
Kolhapur News : पाकिस्तान जिंदाबादचा स्टेटस लावलेल्या एका शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मूळचा जम्मूचा शिक्षक कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत होता. हातकणंगले येथील एका खासगी शाळेत शिकवत होता. जावेद अहमद असं त्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. 14 ऑगस्ट इनडीपेंड डे आणि पाकिस्तान जिंदाबाद असा स्टेटस लावला होता.
नागपूरः मोटार वाहन चालक पीएसआई साहेबराव बहाळे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलीस यांचे आज सकाळी 8.30 वाजता निधन झाले. सरकारी वाहनाची साफसफाई करत असताना त्यांना करंट लागला. करंट लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. मानकापूर येथील एलेक्सिस हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
देशातील कोरोनाचा संसर्गात चढ-उतार पाहायला मिळात आहे. देशात सोमवारी कोरोनाबाधितांमध्ये मोठी घट दिसून आली होती, पण आज पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशात मंगळवारी दिवसभरात 9,062 नवीन कोरोना रुग्णांनी नोंद झाली आहे. सोमवारच्या तुलनेनं कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र दिलासादायक बाब अशी की, देशात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून कमी रुग्ण आढळले आहेत. दुसरी चांगली बाब म्हणजे नवीन कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत 15 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात केली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं (Maharashtra Cabinet) खाते वाटप पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटात (Shinde Group) नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा होती. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आपल्या खात्याबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता शिंदे गटातील आठ मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी या आठ मंत्र्यांवर देण्यात आली आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा आदी भागांत काही दिवसांपूर्वी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर आता दिंडोरी (Dindori) तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे (Earthquake) तीन धक्के बसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील विविध गावांना हे धक्के काल (16 ऑगस्ट) रात्री जाणवले आहेत. नाशिकच्या मेरी येथील भूकंप मापक यंत्राच्या अहवालानुसार रात्री 08 वाजून 58 मिनिटांनी, 09 वाजून 34 मिनिटांनी आणि 09 वाजून 42 मिनिटांनी असे तीन भूकंपाचे धक्के जाणवले. या सौम्य धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे 3.4, 2.1 आणि 1.9 असून नाशिक वेधशाळेपासून 16 ते 20 किलोमीटर अंतरावर दिंडोरी तालुक्यामध्ये असण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने माहिती दिली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवडाभर रिमझिम व संततधार पावसामुळे सूर्य दर्शन होत नव्हते , सर्वत्र ढगाळ वातावरण मात्र एक आठवड्यानंतर आज सकाळी सूर्य दर्शन झाले आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. बुलढाणा शहराजवळ असलेल्या अजिंठा पर्वत रांगा असल्याने यातील निसर्ग फुलून गेलंय. सर्वत्र हिरवळ असल्याने त्याववर पडणाऱ्या आल्हाददायक सुर्यप्रकाशाने निसर्गाचं सौंदर्य पाहून डोळे दीपून जात आहे.. सकाळी या निसर्गाचं अवलोकन करणाऱ्यांची गर्दी राजूर घाटात दिसून आली. आठवडाभरानंतर पावसाने उघडीप दिल्याने आज सकाळी शहरवासी घराबाहेर पडले आहेत.
महागाईचा पुन्हा एकदा भडका उडालेला पाहायला मिळतोय. आजपासून दुधाच्या दरात वाढ झाली आहे. आजपासून अमूल दुधाच्या दरात वाढ (Amul Milk) आली आहे. प्रति लीटर दुधामागे दोन रुपये दर वाढण्यात आला आहे. ही सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणारी बातमी आहे. दुधाचे दर (Milk Price Hike) वाढवण्यात आले आहेत.
पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चुकीच्या बाजूने आलेला ट्रक अचानक रोडच्या मध्ये आल्याने कारची ट्रकला धडक बसून हा अपघात झाला. अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरु होत आहे. आज आदित्य ठाकरे एक दिवसाच्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरश आहेत. आदित्य ठाकरे यांची महाड आणि अलिबाग येथे शिवसंवाद यात्रा पार पडणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील खैरखेड वन परिक्षेत्रात काही मेंढपाळ वन जमिनीत मेंढ्या चारत असताना येथील वन मजुरांच्या निदर्शनास आल्यावर या वन मजुरांनी या मेंढपाळांना वन क्षेत्रात मेंढ्या चारण्यास मनाई केल्याने मेंढपाळांनी या दोन वन मजुरांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला यात हे दोन्ही वन मजूर जखमी झालेत दरम्यान ही बाब वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा मुरकुटे यांना कळविण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बघितलं असता त्या ठिकाणी 20 ते 25 मेंढपाळ जमाव करून असल्याने त्यांना पांगविण्यासाठी नेहा मुरकुटे यांनी हवेत तीन राउंड फायर केल्याने हल्लेखोर मेंढपाळ जवळच्या जंगलात पळून गेले. ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही वन मजुरांवर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून मोताळा पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील मेंढपाळांनी आपल्या मेंढ्यांसह वन कर्मचाऱ्यांच्या अत्याचाराविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून न्याय मागितला होता.
रायपुरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या "भगत की कोठी" (Bhagat Ki Kothi) ट्रेनला गोंदिया शहरालगत अपघात (Train Accident) झाल्याची घटना घडली. यावेळी समोरून जात असलेल्या मालगाडीला 'भगत की कोठी ट्रेन'ने मागून धडक दिल्याचं वृत्त समोर येत आहे. या अपघातानंतर या ट्रेनचा एक डब्बा रुळाखाली घसरला. सुत्रांच्या माहितीनुसार या ट्रेनच्या अपघातात 50 च्या वर लोक किरकोळ जखमी झाल्याचं समजत आहे.
गोंदियात 'भगत की कोठी' ट्रेनला भीषण अपघात झाला आहे. रायपूरहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनला अपघात झाला आहे. यामध्ये 50 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
पार्श्वभूमी
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत...
शिंदे सरकारचं पहिलं अधिवेशन
राज्यात शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदार सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत. . गेल्या अनेक दिवसात मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. याचीच पुनरावृत्ती या अधिवेशनात पाहायला मिळू शकते. अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, मुंबईतील मेट्रो कारशेडचा वाद, ठाकरे सरकारच्या निर्णयांना स्थगितीचा मुद्दा, यासह वादग्रस्त मुद्द्यांवरून घमासान पाहयला मिळणार आहे.
सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन
राज्यात आज सकाळी 11 वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचं गायन होणार असून नागरिक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी यामध्ये भाग घ्यावा असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या "स्वराज्य महोत्सवाचे" आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
अमूल आणि मदर डेअरीचं दूध महागलं, दूध दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ
भल्या पहाटे दुधाच्या खरेदीनं दिवसाची सुरुवात करण्याऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात आता आणखी वाढ होणार आहे. अमूल आणि मदर डेअरीचं दूध महागलं असून, या दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दुधाचे हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
भारतीय फुटबॉल असोसिएशनची मान्यता निलंबित केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
जागतिक फुटबॉल संघटना म्हणजेच फीफानं भारतीय फुटबॉल महासंघावरील निलंबनाच्या कारवाईप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. भारतीय फुटबॉल महासंघात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप वाढला असल्यानं तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचं फिफानं स्पष्ट केलंय. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज मुद्दा न्यायालयात मांडला. फीफानं केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळं ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अंडर-17 महिला विश्वचषक अडचणीत आला आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -