Maharashtra Breaking News 02 July 2022 : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली, वाहतुकीसाठी महामार्ग बंद

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Jul 2022 11:56 PM
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली, वाहतुकीसाठी महामार्ग बंद

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी महामार्ग बंद करण्यात आला आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मातीसह दरड खाली आली आहे. पर्यायी वाहतूक लोटे चिरणी कळबस्ते मार्गे वळवण्यात आली आहे.

चंद्रपूर : दुचाकीला ट्रकची धडक, माय-लेकीचा मृत्यू, बाप-लेक जखमी

चंद्रपूर : पडोली-घुग्गुस मार्गावर दुचाकीला ट्रकची धडक, अपघातात आई आणि 3 वर्षीय मुलाचा मृत्यू तर वडील आणि 5 वर्षीय मुलगा गंभीर जखमी, निखिल ठवरी आपली मुले आणि गर्भवती पत्नीसह जात होते रुग्णालयात, घुग्गुस मार्गावरील अवजड वाहनाच्या अस्ताव्यस्त पार्किंग बाबत खुटाळा ग्रामपंचायतीने याआधी पोलीस प्रशासनाला दिले होते निवेदन, मात्र पोलिसांच्या उदासीनतेमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप

पुणे-मुंबई दृतगती मार्गावर वाहतूक कोंडी, वाहनचालकांची कसरत 

पुणे-मुंबई दृतगती मार्ग आज पुन्हा मंदावला आहे. आज आठवड्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे मुंबईकर लोणावळा, महाबळेश्वर पर्यटन स्थळी जात आहेत. पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक बाहेर पडत आहेत. त्यामुळे दृतगती मार्गांवर वाहतूक कोंडी होत आहे. बोरघाटात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळं वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. त्यात पाऊस  असल्यामुळे चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. पुढचे काही तास अशीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे.  

क्रीडा क्षेत्रात राजकारण आणत नाही : शरद पवार

क्रीडा क्षेत्रात राजकारण आणत नाही. जिल्हास्थरावर चमकलेल्या खेळाडूंना मदत करण्याचं काम मी केलं, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. 

क्रीडा क्षेत्राला हातभार लवण्याचं माझं काम : शरद पवार

क्रीडा क्षेत्राला हातभार लवण्याचं माझं काम आहे. क्रीडा संघटनांना मैदान मिळणं सोप नसतं. कुस्तीगीर परिषदेच्या अंतर्गत विषयांत कधीच हस्तक्षेप केला नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

 SharadPawar :  भारतीय कुस्तीगीर परिषदेवर भाजपचा दबाव; शरद पवार यांचा गंभीर आरोप  

भारतीय कुस्तीगीर परिषदेवर भाजपचा दबाव असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना मदत करण्याचं काम मी केलं. राज्य, राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी मी या परिषदेवर होतो. क्रीडा क्षेत्राला हातभार लावण्याचं माझं काम आहे. राजकीय व्यक्तींनी क्रीडा क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, असे शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे.  

 

Satara News Update : साताऱ्यात गोळ्या झाडून तरूणाची हत्या 

साताऱ्यात आज्ञाताने तरूणावर गोळ्या झाडल्या आहेत. यात तरूण जागीच ठार झाला आहे. शहरातील नटराज मंदिराच्या आवारात ही घटना घडली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत युवकाचा ओखळ पटवण्याचे काम सुरू आहे.  

इंदापूरमधील कदम हायस्कूलच्या मैदानात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे दुसरे गोल रिंगण

Indapur News : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे दुसरे गोल रिंगण इंदापूरमधील कदम हायस्कूलच्या मैदानात शांततेत पार पडले. यावेळी सुरुवातीला झेंडेकरी, तुळस, हांडेकरी, विणेकरी यांनी संत तुकाराम महाराज पादुका यास प्रत्येकी तीन वेळा प्रदर्शना पूर्ण केल्या. त्यानंतर पालखी सोबत असलेले दोन्ही मानाचे अश्व या रिंगणामध्ये धावले. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

पालघर : डहाणू बोर्डी रोडवर भरधाव कारने डहाणू नगरपरिषदेच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांना चिरडले

पालघर : डहाणू बोर्डी रोडवर भरधाव कारने डहाणू नगरपरिषदेच्या दोन सफाई कर्मचाऱ्यांना चिरडले, दोघांचाही जागीच मृत्यू, भरत राऊत 55 आणि वकेश झोप 37 अशी अपघातात मृत झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांची  नाव असून अल्पवयीन कारचालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटल्याने घडला अपघात. डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

5 फुटांवर असलेल्या विमानात धूरचं धूर, नागरिक भयभीत, दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग

Ratnagiri Maharashtra News : यंदाच्या आंबा महोत्सवातून 17 कोटींची उलाढाल, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री 
Ratnagiri Maharashtra News :  यंदाच्या आंबा महोत्सवातून 17 कोटींची उलाढाल, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, राज्य कृषी पणन मंडळाव्दारे 21 वर्षापासून पुण्यासह महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन  केले गेले होते..याची सांगता झाली आहे. यात रत्नागिरी,सिंधुदुर्गतील 70 हुन अधिक आंबा बागायतदार सहभागी झाले होते.. 

 
Maharashtra Sindhudurga News : तळकोकणातील देवगडमध्ये बिबट्याची निर्घृण हत्या



Maharashtra Sindhudurga News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील मोंड चिंचवाडी येथील खाडी किनारी बंदिस्त पिशवीत मादी बिबट्याचे शव कुजलेल्या स्थितीत आढळून आलं. या बिबट्याचे चारही पंजे आणि मुंडके छाटलेल्या अवस्थेत होते. अतिशय निर्दयीपणे या बिबट्याची हत्या करून त्याचे अर्धे शव पिशवीत बंदिस्त करून पाण्यात फेकण्यात आले. सुमारे पाच ते सहा वर्षांचा बिबट्या असल्याचं प्राथमिक अंदाज आहे. मोड-चिंचवाडी येथील खाडी किनारी ग्रामस्थांना दुर्गंधी येत होती. माजी उपसरपंच कोयंडे यांच्यासमवेत ग्रामस्थांनी खाडी किनारी पाहणी केली असता तेथे एका बंदिस्त पिशवीत बिबट्याचे शव निदर्शनास आले. या बिबट्याचे मुंडके व चारही पायाचे पंजे नव्हते. हे शव कुजलेल्या स्थितीत होते. वनविभागाने हे शव ताब्यात घेत पंचनाम्यासाठी पाठवले आहे. तर यासंदर्भात सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती वामविभागाने दिली आहे.


 

 



 
कोल्हापूरच्या किणीजवळ विचित्र अपघातात चार ठार, बंद पडलेल्या कंटेनरला कारची मागून धडक तर अपघातग्रस्त कारला ट्रकची मागून धडक

कोल्हापूरच्या किणीजवळ विचित्र अपघातात चार ठार, बंद पडलेल्या कंटेनरला कारची मागून धडक तर अपघातग्रस्त कारला ट्रकची मागून धडक, आज पहाटे झालेल्या तिहेरी अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू


मृतात 11 वर्षीय मुलींचाही समावेश, मृत सर्व जण बंगळुरु येथील रहिवाशी असल्याची माहिती

सिंंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील 'लँडिंग' राम भरोसे, खराब हवामानामुळे सलग तीन दिवस विमान रद्द

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर गेल्या तीन दिवसांपासून खराब हवामानामुळे विमान लँडिंग करण्यास पायलटला अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे गेले तीन दिवस विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. त्याआधी गेल्या पंधरा दिवसांत दोन वेळा खराब हवामानामुळे विमान रद्द करण्यात आले. आता तर सलग तीन दिवस खराब हवामानामुळे विमान रद्द करण्याची वेळ अलायन्स एअर कंपनीवर आली आहे. त्यामुळे या पावसाळी वातावरणात सिंधुदुर्ग विमानतळावरील विमानसेवा राम भरोसे असल्याचे बोलले जात आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुंबईकडे विमानाने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. चिपीच्या माळरानावर 9 ऑक्टोबरला अलायन्स एअर कंपनीचे 72 आसनी प्रवासी विमान सुरु झाले. या विमानसेवेला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. विमानसेवा सुरु झाल्यापासून खराब वातावरणाचा फटका विमान सेवा देणाऱ्या कंपनीला आणि प्रवाशांना वारंवर बसत आहे. 

हिंगोलीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस उपधीक्षकासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल

Hingoli News : आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस उपधीक्षकासह अन्य पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहरातील मस्तानशहा भागात रहिवासी असलेल्या विनायक पठाण यांनी 30 जून रोजी आत्महत्या केली होती. पोलीस पोलीस दलात उपाधीक्षक गृह विभाग पदावर कार्यरत असणारे वसीम हसणे यांनी शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती. नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या मांडल्यानंतर रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई-गोवा हायवेवरील ओसरगावसह हातीवले टोलनाक्यावर पोलीस संरक्षणात वसुली करण्याचे आदेश

Sindhudurg News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगावसह रत्नागिरी जिल्ह्यातील हातीवले टोलनाक्यावर टोलवसुलीला असलेला विरोध डावलून पोलीस संरक्षणात सक्तीने टोलवसुली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नॅशनल हायवे ऑथोरिटीचे कोल्हापूर येथील डीजीएम तथा प्रोजेक्ट डायरेक्टर व्ही. डी. पंदरकर यांनी टोल ठेकेदार करीमुन्नीसा कंपनीला दिले आहेत. रखडलेली टोलवसुली पोलीस संरक्षणात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात दोन्ही टोलनाक्यावर टोलवसुली सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकीकडे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात mh07 गाड्यांना टोल माफी मिळावी अन्यथा टोल वसुली करु देणार नाही, असं म्हणत आंदोलन केले. मात्र आता तर पोलीस बंदोबस्तात दोन्ही टोल नाक्यांवर टोल वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भारतीय कुस्ती महासंघाकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त

भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केलीय. महासंघाच्या सुचनांनुसार 15 आणि 23 वयोगटातील कुस्ती स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने न केल्यानं ही कारवाई करण्यात आलीय.  भाजपचे खासदार बृजभुषण सिंग हे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आणि विनोद तोमर हे सचिव आहेत तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत तर बाबासाहेब लांडगे हे 40 वर्षांहून अधिक काळ सचिव आहेत.  बाबासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध काही दिवसांपुर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलन देखील केले होते आणि भारतीय कुस्ती महासंघाकडून तक्रार देखिल केली होती. या बरखास्तीनंतर नव्याने निवडणूक घेऊन भारतीय कुस्तीगीर परिषद गठीत करण्यास सांगण्यात आलय.  महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे करण्यात येते.

Maharashtra News : स्पाइसजेटच्या विमानाचं एमर्जंन्सी लँडिग

Maharashtra News : आज सकाळी स्पाइसजेटचं विमानं Q400 दिल्ली ते जबलपूर SG-2962 मार्गस्थ झालं होतं. सुमारे 5000 फूट उंचीवर, विमानात धूर दिसला, त्यानंतर विमानाने दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केलं. विमान सुरक्षितपणे उतरले असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. सदर प्रकरणाची चौकशी सुरु आहे. 

Nashik : नाशिकच्या अशोक नगर परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Nashik :  नाशिकच्या अशोक नगर परिसरात बिबट्याचे दर्शन. नागरी वसाहतीत बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये दहशत. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना. घराच्या जिन्या खालील पोट माळ्यात दबा धरून बसल्याने धरून बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 



Rain Updates : पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला ऑरेंज अलर्ट

Rain Updates : कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा असल्यानं चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाण्यालाही आज ऑरेंज अलर्ट आहे. मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाट माथ्यावरही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंविरोधात कारवाई, शिवसेना नेतेपदावरुन काढलं

Maharashtra Politics : पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून काढण्यात आलंय. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी कारवाई केली आहे. 

Maharashtra Politics : बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार

Maharashtra Politics : सध्या गोव्यातल्या हॉटेलमध्ये मुक्कामी असणारे शिंदे समर्थक आमदार आज मुंबईत परतणार आहेत. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर आज हे आमदार मुंबईत येतील. 3 आणि 4 जुलैला होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थिती लावण्यासाठी हे आमदार येत आहेत. कडक सुरक्षाव्यवस्थेत त्यांना मुंबईत आणलं जाणार आहे. त्यांना मुंबईत ऑबेरॉय हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार


सध्या गोव्यातल्या हॉटेलमध्ये मुक्कामी असणारे शिंदे समर्थक आमदार आज मुंबईत परतणार आहेत. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर आज हे आमदार मुंबईत येतील. 3 आणि 4 जुलैला होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थिती लावण्यासाठी हे आमदार येत आहेत. कडक सुरक्षाव्यवस्थेत त्यांना मुंबईत आणलं जाणार आहे. त्यांना मुंबईत ऑबेरॉय हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. 


एकनाथ शिंदेंविरोधात कारवाई, शिवसेना नेतेपदावरुन काढलं


पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून काढण्यात आलंय. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी कारवाई केली आहे. 


विरोधी पक्षनेतेपदी कुणाची वर्णी लागणार


 सध्या राष्ट्रवादीच्या वतीने संख्याबळ जास्त असल्यामुळे आमचाच विरोधी पक्ष नेता असेल असा मोठया प्रमाणात दावा सुरू झाला आहे. राष्ट्रवादीच्या वतीने विरोधी पक्षनेते पदासाठी जयंत पाटील, अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
 
विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस


आज दुपारी 12 वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर, महाविकास आघाडी आज त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.  
 
राज्यपाल नियुक्त आमदारांची नवी लिस्ट पाठवली जाणार


राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर आता राज्यपाल नियुक्त आमदार नवी लिस्ट पाठवली जाणार आहे.  महाविकास आघाडीने 12 राज्यपाल नियुक्त आमदार यासाठी लिस्ट पाठवली होती. ती विद्यमान राज्यपाल कोश्यारी यांनी मंजूर केली नव्हती. आता नवं सरकार नवी लिस्ट पाठवणार आहे. 


पुढील पाच दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला ऑरेंज अलर्ट


 कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा असल्यानं चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाण्यालाही आज ऑरेंज अलर्ट आहे. मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, साताऱ्याच्या घाट माथ्यावरही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


आषाढी वारी


आज ज्ञानेश्वरांची पालखी फलटण मुक्कामी राहणार आहे.  तुकारामांची पालखी निमगाव केतकीहून निघेल आणि इंदापूरला मुक्कामी असेल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.