मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आणि रोज वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता दाट झाली आहे. सतत वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय घेऊ शकतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.


महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आता निर्णय घेण्याची वेळ आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. दरम्यान राज्य सरकारने गेल्या आठवड्यात कडक निर्बंध जाहीर केले होते. ज्यात वीकेंड लॉकडाऊन, रात्रीचा कर्फ्यू आणि दिवसा जमावबंदी यांसारख्या आदेशांचा समावेश होता. पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध 30 एप्रिलपर्यंत सुरू राहतील.


मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबतची बैठक; ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


टास्क फोर्सच्या बैठकीत काय झालं?


14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे, अशी माहिती टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.  मुख्यमंत्रीच लॉकडाऊनची घोषणा करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या ऑनलाईन बैठकीत लॉकडाऊन लागू करण्यासह विविध विषयांवर चर्चा झाली.


या बैठकीत लॉकडाऊनला कसं सामोर जायचं, याबाबत चर्चा झाली.  राज्यात लॉकडाऊन लावायचा झाला तर प्रत्येक विभागाची तयारी, पुढील गणितं आणि आर्थिक बाजूची माहिती घेणार, टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनची दाहकता किती ठेवायची? यावर चर्चा झाली. रुग्णसंख्या जिकडे जास्त असेल तिकडे कडक लॉकडाऊन गरजेचं, जास्त कडक लॉकडाऊन लावलं तर सामान्य जनतेचे हालही नाही झाले पाहिजे यावर चर्चा झाली. लॉकडाऊन करायचं तर किती दिवसाचं करायचं? राज्यातली आरोग्य यंत्रणा आणि कर्मचारी याचं नियोजन किती पटीनं आणि कसं वाढवले गेले पाहिजे? यावरही बैठकीत चर्चा झाली.


राज्यात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन? टास्कफोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांची माहिती, मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरुच


राज्यात कोरोनाचं थैमान, काल दिवसभरात विक्रमी 63,294 नवीन रुग्णांचे निदान


कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. राज्यात कोरोनाची स्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. कारण रविवारी राज्यात कोरोना रुग्णांच्या उच्चांकांची नोंद झाली आहे. रविवारी 63 हजार 294 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात शनिवारी 55 हजार 411 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी, 34 हजार 008 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 349 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.7 टक्के एवढा आहे.  


राज्यात आतापर्यंत एकूण  27 लाख 82 हजार 161 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.65 टक्के एवढे झालेआहे. आजपर्यंत  तपासण्यात आलेल्या 2,21,14,372 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 34,07,245 (15.41 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 31,75,585 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,२694 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.