मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक संपली आहे. 14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे, अशी माहिती टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान दुसरीकडे या बैठकीनंतर राज्यातल्या सर्व आयएएस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री बातचीत करणार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात उद्या सकाळी बैठक होण्याची शक्यता आहे. 


बैठकीत काय चर्चा झाली...
या बैठकीत लॉकडाऊनला कसं सामोर जायचं, याबाबत चर्चा झाली.  राज्यात लॉकडाऊन लावायचा झाला तर प्रत्येक विभागाची तयारी, पुढील गणितं आणि आर्थिक बाजूची माहिती घेणार, टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनची दाहकता किती ठेवायची? यावर चर्चा झाली. रुग्णसंख्या जिकडे जास्त असेल तिकडे कडक लॉकडाऊन गरजेचं, जास्त कडक लॉकडाऊन लावलं तर सामान्य जनतेचे हालही नाही झाले पाहिजे यावर चर्चा झाली. लॉकडाऊन करायचं तर किती दिवसाचं करायचं? राज्यातली आरोग्य यंत्रणा आणि कर्मचारी याचं नियोजन किती पटीनं आणि कसं वाढवले गेले पाहिजे? यावरही बैठकीत चर्चा झाली.


लॉकडाऊन करण्याआधी उद्यापासून दोन दिवस अर्थ विभाग आणि अन्य विभागाशी चर्चा होण्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात उद्या सकाळी बैठक होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनसाठी बैठकांमागे बैठकांचा सिलसिला सुरु आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर पुन्हा एका बैठकीचं नियोजन करण्यात आलं आहे. मुख्य सचिव सिताराम कुंटे, आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांच्या अन्य अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ही बैठक आज होत आहे.


मुख्यमंत्री काय म्हणाले...
कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणे, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी असे सांगतांना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 


एसओपी तयार करणे सुरु  


यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून आपण कोविड्शी लढा देताना सुविधा वाढविल्या, चाचण्या वाढवल्या, मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे नियम पाळावेत यादृष्टीने जनजागृती केली, लोकांमध्ये सुद्धा याविषयी जागरूकता आली आहे.  कार्यालयीन वेळांमध्ये बदल करावेत, वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा, मुंबईत उपनगरीय रेल्वेसाठी पिक अवर्स ठरवणे अशा अनेक मुद्द्यांवर आपण बोललो आणि कार्यवाही केली आहे. मुळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्ती लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरवित आहेत. जे लोक आरोग्याचे नियम पाळत आहेत त्यांना निष्काळजी लोकांमुळे करण नसतांना धोका निर्माण झाला असून लॉकडाऊन लावून ही वाढ थोपवावी असे त्यांचे म्हणणे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून यासंदर्भात सर्वसमावेशक कार्य पद्धती ( एसओपी ) तयार करण्यात येईल.


काय म्हणाले राजेश टोपे 


14 एप्रिलनंतर लॉकडाऊनसंदर्भात उचित निर्णय मुख्यमंत्री घोषित करतील, असं राजेश टोपे म्हणाले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच लॉकडाऊनची घोषणा करतील. लॉकडाऊन लावण्यासाठी टास्क फोर्स तयार आहे. बुधवारनंतर कॅबिनेटची बैठक होणार आहे, असं टोपे म्हणाले.  आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक घेतली त्यानंतर टोपेंनी ही माहिती दिली. लॉकडाऊनसंदर्भात अर्थ विभाग आणि इतर विभागांशी चर्चा होईल. त्यानंतर 14 एप्रिलनंतर कॅबिनेटची बैठक होणार आणि या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊन संदर्भातला निर्णय घेतील, अशी माहिती टोपे यांनी दिली.