गडचिरोली : सहसा पोलीस कारवाई करताना आरोपी किंवा दोषींना कठोरातील कठोर शिक्षा कशी होईल यावरच भर देतात असाच अनेकांचा समज. किंबहुना ते योग्यही आहे, कारण अराजकता माजवणाऱ्या घटकांना वठणीवर आणण्याचं या यंत्रणेचं काम. कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवत ही यंत्रणा आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडत असते. यातच अनेकदा त्यांच्यातील माणुसकीचंही दर्शन घडतं. सध्या अशाच एका कारणामुळं गडचिरोली पोलीस सर्वांची मनं जिंकल आहेत. 


एरवी जंगलात नक्षलवाद्यांविरोधात पाय रोवून उभ्या ठाकलेल्या गडचिरोली पोलिसांचा संवेदनशील चेहरा दर्शविणारी घटना समोर आली आहे. 29 मार्चला पोलिसांनी धडाकेबाज अभियान राबवत खोब्रामेंढा चकमकीत 5 मोठ्या नक्षल्याना टिपलं. पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र या यशस्वी कामगिरीत पोलिसांपासून बचावासाठी म्हणून नक्षलवाद्यांनी पळही काढला. 


त्यावेळी नक्षलवाद्यांनी आपल्या काही साथीदारांना जखमी अवस्थेत सोडून पळ काढल्याची घटना घडली. पक्की सूचना मिळाल्यावर पोलिसांनी आसपासच्या गावांमध्ये शोध अभियान राबवलं. यात टीपागड दलमचा उपकमांडर किशोर कवडो याला शोधण्यात पोलिसांना यश आलं. कटेझरी गावातील कट्टर नक्षल समर्थकांच्या घरी पायाला गोळी लागलेल्या जखमी अवस्थेत किशोर कवडो लपला होता. 


पोलीस दलानं गावाला घेराव घालत किशोर याला ताब्यात घेत प्राथमिक उपचारानंतर नागपुरात अतिदक्षता विभागात दाखल केलं होतं. उत्तम उपचारानंतर आता किशोरची प्रकृती सुधारली आहे. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी नक्षल समर्थक गणेश कोल्हे याला या प्रकरणात अटक केली आहे. जखमी नक्षली किशोर कवडो याच्यावर 16 लाखांचं बक्षीस होतं. 



Corona Update | राज्यात कोरोनाचं थैमान, रविवारी राज्यात विक्रमी 63,294 नवीन रुग्णांचे निदान


विविध नक्षल गुन्हे - जाळपोळ प्रकरणात पोलिसांना किशोर हवा होता. छत्तीसगडच्या बीजापूर येथे प्रचंड दबावानंतर का होईना नक्षल्यानी कोब्रा कमांडो राकेश मनहास याला कुठलीही इजा न करता सोडलं होतं. आता जखमी नक्षलवाद्याला अतिदक्षता कक्षात पोलिस पाणी पाजत असल्याचा व्हिडिओ पुढे आल्याने पोलिसांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेचं सर्वत्र कौतुक होत आहे.