मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 7 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडियाद्वारे मुख्यमंत्री ठाकरे संवाद साधणार आहेत. राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संदर्भात काही निर्णय होणार का? याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री आजच्या संवादात काय बोलणार? राज्यात लॉकडाऊन लागू होणार का? झाला तर कुठे कुठे होईल? अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध काय कारवाई होणार? याविषयी उत्सुकता लागली आहे.
राज्यातील कोरोना वाढतोय
राज्यामध्ये या आठवड्यापासून कमी होत असलेला कोरोनाचा आकडा पुन्हा वाढताना दिसत आहे. काल, शनिवारी राज्यात 6281 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 2567 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकूण १९,९२,५३० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.16 % एवढे झाले आहे.
CoronaVirus Lockdown | लॉकडाऊनसंदर्भातील अफवा पसरवाल, तर दंडात्मक कारवाई
पुण्यात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा संचारबंदी, शाळा, महाविद्यालयांबाबतही मोठा निर्णय
पुणे : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुण्यातील शाळा, महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न/समारंभास केवळ 200 जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचे सविस्तर आदेश लवकरच जारी केली जातील. उच्च शिक्षण घेणारे वर्ग अर्ध्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे BMC अलर्ट मोडवर
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबई महापालिका अलर्ट मोडवर आल्याचं बघायला मिळत आहे. ज्यात मागील दोन दिवसांपासून महापालिकेकडून रेस्टॉरन्ट्स बार आणि हॉटेल्सवर कारवाई धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. काल रात्रीच्या सुमारास वांद्रे आणि खार परिसरातल्या पाच रेस्टॉरन्ट, बार आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण 650 जणांवर महापालिकेकडून 1 लाख 40 हजारांचा दंड वसूल केला आहे. वांद्रे येथील 145 कॅफे अॅण्ड बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं. यात सदर व्यवस्थापनावर संसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत वांद्रे पोलीस ठाण्यात एच वॉर्डच्या आरोग्य खात्यातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात काही कॅफे अॅण्ड बारवर 188, 269 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
नागपुरात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद
नागपुरात कोरोनाचं वाढतं संकट पाहता शहरात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी ही माहिती दिली आहे.नागपुरात गेले 5 दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. नागपूर शहरात रोज 500 पेक्षा जास्त कोरोना बाधित आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका खडबडून जागी झाली आहे. शहरात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
धोका वाढला! महाराष्ट्रामागोमाग देशातही कोरोनाचा फैलाव; 5 राज्यांमध्ये अलर्ट
राज्यात अमरावतीत सर्वाधिक रुग्णांची नोंद
अमरावती जिल्ह्यात कोरोना संसर्गाने शनिवारी सात जणांचा मृत्यू झाला असून पुन्हा 1055 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 28,815 इतकी झाली आहे. राज्यात सर्वाधिक संक्रमित रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. जिल्ह्यातील कोरोनाच्या उद्रेकावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाद्वारे बैठकांचा रतीब सुरू आहे. महापालिकेत आयुक्त प्रशांत रोडे यांनी होम आयसोलेशन आणि स्वॅब सेंटरचा आढावा घेतला, तर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केंद्रांना भेटी दिल्या. रात्रीपासून जिल्ह्यात 36 तासांसाठी लॉकडाऊन सुरू झालेला आहे. आता याला अमरावतीकर कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.