नवी दिल्ली : देशभरात कोरोना (Corona)लसीकरणाची सुरुवात करण्यात आलेली असतानाच अनेक राज्यांमध्ये हा विषाणू पुन्हा एकदा थैमान घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागीलल काही दिवसांपासून महाराष्ट्रात नव्यानं लागण झालेल्या कोरोना रुग्णांचा आकडा चिंता वाढवून जात आहे. तर, आता महाराष्ट्रामागोमाग पंजाबमध्येही कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.
शनिवारी केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला देशातील एकूण 5 राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उंचावताना दिसत आहे. यामध्ये केरळ, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. केंद्रानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकाच्या माध्यमातून याबाबतची माहिती देण्यात आली.
‘मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच असल्याचं पाहायला मिळालं. ’ असं सांगत महाराष्ट्रात एका दिवसात 6 हजारांहून अधिक कोरोनारुग्ण आढळल्याची बाब केंद्राकडून अधोरेखित करण्यात आली. याचवेळी पंजाब आणि केरळ या राज्यांमधील कोरोना रुग्णसंख्येत आलेली उसळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सर्वांसमक्ष मांडण्यात आली. मागील 7 दिवसांमध्ये छत्तीसगढमध्येही नव्यानं कोरोनाची लागण झालेल्यांचं प्रमाण जास्त असल्याचं पाहायला मिळालं.
देशात एकेकाळी नियंत्रणात आलेला कोरोना अशा प्रकारे पुन्हा एकदा धडकी भरवणाऱ्या वेगानं फैलावत असल्याचं पाहता कोविडसंबंधी प्रतिबंधात्मक उपायायोजनांचं काटेकोर पालन करण्यावर भर देण्याबाबत आरोग्य मंत्रालय आग्रही दिसलं.
कोणत्या ठिकाणी नियंत्रणात आहे कोरोना?
एकिकडे देशातील काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचा धोका वाढत असतानाच दुसरीकडे काही भागांमध्ये मात्र कोरोना बऱ्याच अंशी किमान सध्यातरी नियंत्रणात असल्याची माहितीही केंद्राकडून देण्यात आली. देशातील 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मागील 24 तासांमध्ये कोरोनामुळं कोणचाही मृत्यू झाला नसल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. यामध्ये, तेलंगणा, हरयाणा, जम्मू आणि काश्मीर (केंद्रशासित प्रदेश), झारखंड, मिझोरम, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, लक्षद्वीप, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेट समूह, दमण, दीवचा यामध्ये समावेश आहे.