नांदेड : राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती सध्या चिंताजनक वळणावर आली आहे, ज्यामुळं आता स्थानिक प्रशासनाकडून महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. अनेक नियमांचं सक्तीनं पालन करण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. या साऱ्यामध्ये आता पुन्हा एकदा संचारबंदी, लॉकडाऊन यांसारखे शब्द कानी पडू लागले आहेत.
कोरोना बाधितांची राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाढणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब असून प्रशासन याबाबत नांदेड जिल्ह्यांतर्गत योग्य ती खबरदारी घेत आहे. आपल्या नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती पुर्णत: अटोक्यात असून यात नागरिकांची भुमिका खूप महत्वाची आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये यासाठी अंगिकारावयाची त्रिसुत्री म्हणजेच मास्क, सुरक्षित अंतर आणि सतत हात स्वच्छ करणे अथवा सॅनिटायजर वापरणे याचे काटेकोर पालन केले पाहिजे. याबाबत पुरेशी जनजागृतीही आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. नागरिकांनी जर संयमी जबाबदारी पार पाडली तर जिल्हा प्रशासनाला कठोर पावले उचलायची वेळ येणार नाही,असं जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केलं आहे.
धोका वाढला! महाराष्ट्रामागोमाग देशातही कोरोनाचा फैलाव; 5 राज्यांमध्ये अलर्ट
जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत असल्याच्या बातम्या, संदेश हे पुर्णत: चुकीचे असून ज्या व्हॉटस्ॲप ग्रुपवर अथवा ट्विटर, इतर कोणत्याही सोशल मिडियावर जर कोणी हे संदेश शेअर केले तर त्यांच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यात लॉकडाऊन?
दरम्यान, काही जुन्या माहितीचे व्हिडीओ, फोटो वापरत ठराविक भागांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याच्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत. नुकतंच पुणे आणि पिंपरी चिंचव़ड येथेही लॉकडाऊन लागू केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. मुख्य़ म्हणजे यामुळं जनमानसात संभ्रमाचं वातावरणही पाहायला मिळत आहे. पण, तूर्तास पुण्यात कोणत्याही प्रकारच्या लॉकडाऊनची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असं असलं तरीही कोरोनावर ताबा मिळवण्यासाठी म्हणून आखून दिलेल्या नियमांचं पालन न झाल्यास मात्र लॉकडाऊनपासून आपण काही दूर नाही, ही बाबही लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे.