Maharashtra Kesari 2022: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला मागील दोन दिवसांपासून सुरुवात झाली. साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुलमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. परंतु, सातऱ्यात सुरू झालेल्या अवकाळी आणि वादळी पावसामुळं या स्पर्धेला मोठा फटका बसल्याचं दिसून आलंय. या अवकाळी पावसामुळं महाराष्ट्र केसरी कुस्तीचा स्टेज कोसळल्यानं आजच्या लढती उद्या खेळल्या जाणार आहेत. दरम्यान, अवकाळी पावसामुळं कुस्ती पैलवानाबरोबरच कुस्ती शौकिनांनाचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


अचानक आज वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे या परिसरातील मोठं नुकसान झालं आहे. स्टेजच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या लाईटचे सर्व स्ट्रक्चर कोसळले आहेत. या ठिकाणची मातीचा जो आखाडा आहे त्यातील मातीपावसाने भिजलेली आहे.मॅट हे भिजलेले आहेत.वादळी वाऱ्याने या परिसरातलं प्रचंड मोठं नुकसान केलं त्यामुळे आजचे सर्व सामने हे रद्द करण्यात आले आता ते उद्या घेतले जातील आसे सांगितले जात आहे. 


दरम्यान, 5 एप्रिलपासून साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला आहे. तब्बल 59 वर्षांनंतर साताऱ्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान मिळालाय. ज्यामुळं सातऱ्यामधील कुस्ती शौकिनांना मोठा आनंद झाला. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावण्यासाठी 900 पैलवान शड्डू ठोकून सज्ज आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळं गेले दोन वर्ष महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा झाली नव्हती. मात्र, आता निर्बंधमुक्तीनंतर पुन्हा एकदा साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहे. त्यामुळे पैलवान आणि कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु, अवकाळी पावसानं कुस्तीप्रेमींच्या आनंदावर पाणी फेरलंय. 


महाराष्ट्र केसरी किताबाच्या शर्यतीतलं यंदाचं सर्वात मोठं नाव होतं ते शिवराज राक्षेचं. पण कुस्तीशौकिनांच्या दुर्दैवानं पुणे जिल्ह्याच्या या पैलवानाला खांद्याच्या दुखापतीमुळं स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली आहे. नुकत्याच झालेल्या सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत शिवराजनं 125 किलो वजनी गटात सुवर्णपदकाचा मान मिळवला होता. जागतिक रॅन्किंग कुस्ती स्पर्धेतही त्यानं उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारून आपला दर्जा दाखवून दिला. त्यामुळं शिवराज राक्षेला महाराष्ट्र केसरीत खेळण्याची संधी मिळाली तर त्याचं आव्हान नक्कीच तगडं ठरलं असतं. शिवराज राक्षेइतकीच 2019 सालचा उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके आणि अनुभवी माऊली जमदाडे हे दोघंही दुखापतीमुळं यंदा महाराष्ट्र केसरीत खेळू शकणार नाहीत.


हे देखील वाचा-