Maharashtra Kesari Kusti Competition 2022 : महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेचे 64 वे सामने सातारा जिल्ह्यातील शहू स्टेडीयम या ठिकाणी होत आहेत. महाराष्ट्र केसरीच्या या स्पर्धेसाठी राज्यभरातील सुमारे 900 मल्लांनी सहभाग घेतला. चार दिवसांपासून साताऱ्याच्या मातीत मल्लांनी आपली चुणूक दाखवली. ही स्पर्धा अंतिम टप्यात पोहचली आहे. उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट झालं आहे.

  


गतविजेत्या हर्षवर्धन सदगीर यांनी मॅट विभागाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचे माऊली जमदाडे आणि सिकंदर शेख मातीच्या उपांत्य फेरीत आमनेसामने असणार आहेत. बीडच्या अक्षय शिंदेसमोर मॅटवर कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलचं आव्हान असेल. 


कसे असतील उपांत्य फेरीचे सामने - 


मॅट - १) हर्षवर्धन सदगीर (नाशिक) वि. हर्षद कोकाटे (पुणे) २) अक्षय शिंदे (बीड) वि. पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर)


माती - १) माऊली जमदाडे (अमरावती) वि. सिकंदर शेख (वाशीम) २) प्रकाश बनकर (मुंबई) वि. महेंद्र गायकवाड (सोलापूर)


'महाराष्ट्र केसरी'च्या मानाच्या गदेचा इतिहास माहितीये का?
कुस्ती खेळासाठी भरवली जाणारी महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला 1961 साली सुरुवात झाली. सुरुवातीला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून ही गदा विजेत्या मल्लाला दिली जात होती. कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अशोक मोहोळ यांनी त्यांच्या वडीलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही चांदीची गदा दरवर्षी देण्याची इच्छा व्यक्त केली. कुस्तीगीर परिषदेकडून त्याला मान्यता देण्यात आली. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. या गदेची लांबी साधारणपणे 27 ते 30 इंच असते, तर व्यास 9 ते 10 इंच असतो. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं जेतेपद पटकावणारा पैलवान ही गदा उंचावतो. या गदेचं वजन तब्बल 10 ते 12 किलो असतं. 


महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा सागाच्या लाकडापासून तयार केली जाते. त्यावर कोरीव काम करुन गदेवर चांदीच्या पत्र्याचं कोटींग केलं जातं. या गदेच्या मध्यभागी एका बाजुला हनुमानाचं चित्र तर दुसऱ्या बाजुला मामासाहेब मोहोळ यांची प्रतिकृती बसवलेली असते. ही गदा मिळवणं हे महाराष्ट्रातील प्रत्येक मल्लाचं स्वप्न असतं. या गदेसाठी आजपासून साताऱ्यात महाराष्ट्रातील मल्ल झुंजणार आहेत. त्यामुळे यंदा ही मानाची गदा कोण उंचावणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.