जालना : भाजप नेत आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बबनराव लोणीकर यांनी परतूरचे एपीआय रविंद्र ठाकरे यांना फोन करून पोलिसांना विधानसभेत उलटं टांगू अशी धमकी दिल्याचं या कथित ऑडियो क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.
तीन दिवसांपूर्वी आयपीएस अधिकारी हसन गौहर यांना परतूरमधील एका व्यापाऱ्याच्या घरी मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची टिप मिळाली होती. त्यानंतर पथकासह हसन गौहर यांनी त्या व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. मात्र त्यांना छापेमारीत काहीच आढळून आलं नाही. संबंधित व्यापाऱ्याने घडलेली सर्व कैफियत भाजप नेते बबनराव लोणीकरांसमोर मांडली. त्यानंतर लोणीकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून धमकावल्याचं सांगण्यात येत आहे.
व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना ऐकायला मिळत आहे. बबनराव लोणीकर यांनी कोर्टाच्या आदेशाशिवाय व्यापाऱ्यांच्या घरात घुसता कसे? असा सवाल आयपीएल अधिकाऱ्यांना केला. त्यानंतर मिळालेल्या माहितीनंतरच धाड टाकली होती, पण त्यामध्ये काहीच आक्षेपार्ह्य सापडलं नसल्याचं सांगितलं. पोलीस अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर बबनराव लोणीकर संतापले आणि त्यांनी विधानसभेत तुम्हाला उलटं टांगील सगळ्यांना अशी धमकी दिली.
पाहा व्हिडीओ : भाजप नेते आणि माजी मंत्री Babanrao Lonikar यांची पोलीस अधिकाऱ्याला धमकावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपसंदर्भात भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी एबीपी माझाने बातचित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी सदर पोलीस अधिकाऱ्याने ज्या व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकली होती, त्याची माफी मागितली आहे. त्यामुळे हे प्रकरण मिटलं आहे, असं लोणीकरांनी वक्तव्य केलं आहे. दरम्यान, याआधीही बबनराव लोणीकर यांनी एका महिला तहसीलदार अधिकाऱ्याविरोधात त्यांनी आक्षेपार्ह्य वक्तव्य केलं होतं. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांनी लोणीकरांच्या या ऑडिओ क्लिपविरोधात खेद व्यक्त केला आहे. तसेच एखाद्या पोलीस अधिकाऱ्याशी बोलताना अशा प्रकारचं वक्तव्य एका माजी मंत्र्याने करणं हे निषेधार्ह्य असल्याचं त्यांचं मत आहे.