Maharashtra Irsalwadi Landslide: रायगड जिल्ह्यातील (Raigad) इर्शाळगडाच्या पोटात वसलेल्या इर्शाळवाडीवर (Irsalwadi) बुधवारी रात्री दु:खाचा डोंगर कोसळला. इर्शाळवाडीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे. बचाव पथकाला आतापर्यंत 98 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मुसळधार पाऊस आणि दाट धुकं यामुळे एनडीआरएफ आणि अन्य यंत्रणांकडून सुरू असलेले घटनास्थळावरील बचावकार्य थांबवण्यात आले आहे. उद्या, शुक्रवारी पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात येणार असल्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे. 


बुधवारी रात्री शांत निजलेल्या इर्शाळवाडीत अवघ्या काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं आणि सारा महाराष्ट्र हादरुन गेला. रायगड जिल्ह्यातल्या माथेरान आणि आसपासच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला. त्या मुसळधार पावसात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत इर्शाळवाडीतली 48 पैकी 17 घरं गाडली गेली. या दुर्घटनेत जवळपास 20 घरांचं गंभीर नुकसान झालं असून, उरलेली दहा घरं वाचली आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथकं तासाभरात घटनास्थळी दाखल झाली. पण पाऊस आणि अंधारामुळं बचावकार्य सकाळीच सुरु करावं लागलं. गुरुवारी दिवसभरातही पाऊस आणि जोरदार वाऱ्यानं बचाव पथकाची परीक्षा घेतली. या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 98 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. इर्शाळवाडी गावातील अनेकजण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे.  


मदतीसाठी हात सरसावले


पावसामुळे माती निसरडी झाल्यानं वाडीपर्यंत पोहोचण्यास मदत पथकाला खूप कष्ट घ्यावे लागत होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी घटनास्थळी तातडीने बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यास अडचणी उद्भवल्या. त्यामुळे सकाळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी असल्याने मदतीसाठी कोणतीही साधने आणता येणे शक्य नव्हती. त्यामुळे फक्त माणसांच्या मदतीने इथे मदत पोहोचवता येणे शक्य होत होते. स्थानिक नागरीक, एनडीआरएफ, एसडीआरएफ, टीडीआरएफ यांच्या पथकांच्या माध्यमातून याठिकाणी प्रत्यक्ष मदतकार्य सुरू करण्यात आले. त्याशिवाय, ट्रेकर्स ग्रुप, स्वयंसेवी संस्था देखील मदतीसाठी सरसावल्या.  


मुख्यमंत्री शिंदे ठाण मांडून....


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील सकाळपासून घटनास्थळी दाखल झाले होते. मदत आणि बचाव कार्यावर त्यांनी देखरेख ठेवली. त्याशिवाय, मंत्री गिरीश महाजन, आमदार महेश बाल्दी यांनी मध्यरात्रीच घटनास्थळ गाठले होते. मध्यरात्रीपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. तर, सकाळच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियंत्रण कक्षातून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेत यंत्रणांना सूचना दिल्या. त्याशिवाय, मंत्री उदय सामंत, दादा भुसे, अनिल पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, मनसे नेते बाळा नांदगावकर आदी नेत्यांनी घटनास्थळाजवळ भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. 


अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू


मध्यरात्री या घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्यसाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, इर्शाळवाडीतील घटनास्थळी पोहचत असताना एका अग्निशमन दलाच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 



मृतांच्या नातेवाईकांना सरकारची मदत


इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेतल्या जखमींवर शासकीय खर्चानं उपचार करण्यात येणार आहेत. 


विधानसभेत सरकारचे निवेदन 


इर्शाळगडावरील याच दुर्घटनेबाबत आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवेदन दिलं आहे. फडणवीसांनी आपल्या निवेदनात दुर्घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आणि मदत कार्यासंदर्भाती सविस्तर माहिती दिली. 


विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "रायगडमधील इर्शाळवाडी येथे मध्यरात्री दुर्घटना घडली. इर्शाळवाडीला जाण्यासाठी रस्ता नाही, पायी चालत जावं लागतं. गेल्या तीन दिवसांत म्हणजेच, 17 जुलै ते 19 जुलै त्या भागांत 499 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. रात्री साडेदहा वाजता ही दुर्घटना घटना घडली आहे. इर्शाळवाडीत 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे. काल रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान सदरची घटना घडली आहे. दुर्घटना घडल्यानंतर 11.30 च्या दरम्यान जिल्हा प्रशासनाला माहिती मिळाली. 12 वाजता राज्य नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली आणि त्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी प्रशासनाचे लोक घटनास्थळी दाखल झाले, असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


इतर संबंधित बातमी: