Khalapur Irshalwadi Landslide : माळीण, तळीयेनंतर आज रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या (Khalapur Irshalwadi Landslide) इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेले इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळून डोंगराचा कडा खाली आला आणि त्यात  30 ते 40 घरं नागरिकांसह गाडली गेली. त्यात पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. मात्र मागील काही वर्षांमध्ये पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये भूस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यात अनेकांचा जीव गेलाय मात्र हे प्रकार घडल्यानंतर त्यावर उपाय करणं आणि लोकांना मदत जाहीर करणं एवढ पुरेसं नाही. या घटनांमागचं मुळ शोधणं गरजेचं आहे. 


पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांच्या मते, पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये भूस्खलनाच्या घटनांमधे मागील दहा वर्षांत शंभर पटीने वाढ झाली आहे. भूगर्भशास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणात हे स्पष्ट झालं आहे. पर्यावरणात होत असलेले बदल आणि मानवी हस्तक्षेप हे दोन्ही याला कारणीभूत आहेत. अनेक ठिकाणी वस्त्या निर्माण झाल्या आहेत. त्या वस्त्यांच्या आजुबाजूला दरड कोसळली की अनेकांचा नाहक जीव जातो. त्यामुळे संवेदनशील क्षेत्रातील वस्त्यांमधील नागरिकांना दुर्घटनेचा मोठा धोका असतो.


गाडगीळ समितीने 2011 साली याबाबतचा अहवाल सादर केला होता. मात्र आजवर तो स्वीकारण्यात आलेला नाही.  या अहवालात अतिसंवेदनशील भाग कोणते हे नक्की करण्यात आलं आहे आणि त्या भागांमधे रस्ते,  दगडखाणी यांसारख्या मानवी हस्तक्षेपाला पुर्णपणे बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मानवी वस्तीचे स्थलांतर हा यावर उपाय असू शकत नाही. कारण पुनर्वसनाचे प्रश्न वर्षानुवर्ष रखडतात. त्यामुळे यावर ठोस उपाय शोधणं गरजेचं आहे. 


'गौतम बुद्धाने म्हटलंय की बहुजन हिताय,  बहुजन सुखाय. जो बहुतांश लोकांच्या हिताचा आहे तो खरा विकास असतो.  काही ठराविक उद्योगपतींच्या हितासाठी होत असलेला विकास हा पर्यावरणविरोधी आहे. त्यामुळे अनेकांचे नाहक जीव जात आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. अनेकाना आपले लेकरं गमवावे लागत आहे. त्यामुळे आता या घटनांमागील मुळ शोधणं गरजेचं आहे. गाडगीळ अहवालातील शिफारसी दिलेल्या आहेत. त्या शिफारसी स्वीकारल्या जातील', अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 


शिफारसी कोणत्या आहेत?


-पश्चिम घाटातील पर्वतरांगांमध्ये संवेदनशील आणि अतिसंवेशदनशील परिसर सांगण्यात आले आहेत.
-याच परिसरात वस्ती, रस्ते आणि मानवी हस्तक्षेप टाळायला हवा.
-वस्त्यांमधील नागरिकांनी आणि प्रशासनाने मिळून निर्णय घ्यायला हवा.
-भूस्खलनाच्या घटनांमधे मागील दहा वर्षांत शंभर पटीने वाढ झाली आहे.
-भागांमधे रस्ते,  दगडखाणी यांसारख्या मानवी हस्तक्षेपाला पुर्णपणे बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे


हेही वाचा-


एक होती इर्शाळवाडी! 40 हून अधिक घरं डोंगराखाली; थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेत गेल्या 12 तासात काय काय घडलं?