सिंधुदुर्ग : कोकणातील शिमगोत्सव म्हणजे उत्सव आणि परंपरेचा अनोखा संगम असतो. शिमगोत्सवात कोकणातील साऱ्या गावामध्ये उत्साहाच वातावरण असतं. देवतरंगांची स्वारी रयतेला भेटण्यासाठी वाडीवस्तीत पोहोचते. चव्हाटा हे गावचे व्यासपीठ बनते. होळीचे सात ते नऊ दिवस रंगून जातात. ढोल-ताशा बडवणारे वाजंत्री, रंगीबेरंगी रंगांची उधळण, रंगात न्हाऊन निघालेले रोंबाटकारी हे चित्र शिमगोत्सवात कोकणातच पहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेरूरचे रोंबाट, कुणकेरीचा हुडोत्सव, विविध गावातील गडे, राधा नाचवणे, देवगडचा कापड खेळ, पालखी नाचवणे अश्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण रूढी परंपरा कोकणात पहायला मिळतात.


आज सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचा प्रसिद्ध हुडोत्सव कोरोनामुळे साध्या पद्धतीने व गावमर्यादीत साजरा केला जात आहे. दोन दिवस चालणार हा उत्सव डोळ्यांची पारणं फेडणार असतो. सहाव्या अग्नीचे खेळ असलेले भाभीचे रोंबाट हा कार्यक्रम झाला असून आज शंभर फूट उंच हुड्यावर चढलेल्या अवसारांच्या दिशेने दगडांचा मारा करत अनोख्या उत्सवाची अनुभूती देणारा हुडोत्सव साध्या पध्दतीने साजरा केला जात आहे. होळीच्या सातव्या दिवशी साजरा होणारा हुडोत्सव जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील भाविकांसाठी पर्वणीच असतो. मात्र, यंदा सलग दुसऱ्या वर्षी हुडोत्सव साध्या पध्दतीने गावमर्यादीत साजरा केला जात असल्याने गावाबाहेर भाविकांना या उत्सवात प्रवेश बंदी केली आहे. त्यासाठी गावच्या वेशीवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.




कुणकेरीतील शिमग्याच्या सातव्या दिवशीचा हुडोत्सव कोकणाचं नव्हे तर राज्यासह गोवा व कर्नाटक राज्यातही प्रसिद्ध आहे. कोलगाव, कुणकेरी, आंबेगाव या तीन गावाची निशाण हुड्याच्या ठिकाणी सायंकाळी सातव्या दाखल झाली. यावेळी तिन्ही अवसार प्रसाद उभे करून कौल घेतल्यानंतर श्रींची पालखी घटावर ठेवून तिन्ही अवसार गगनचुंबी शंभर फुटी हुड्यावर एका मागोमाग एक चढू लागतात. हुडोत्सवादरम्यान तेथे पांरपरिक खेळही खेळले जातात. घोडेमोडणी, वाघाचा खेळ, पारंपरिक पाथर (धनगरणीचा दगड) उचलण्याचे खेळही पार पडतात. शंभर फुटी हुड्यावर एका मागोमाग एक अवसार चढू लागले की जमलेल्या भाविकांकडून संचारी अवसारांवर दगड मारण्याची प्रथाही पार सुरू होते. एकूण पाचवेळा दगड मारले जातात. विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थिती असतात. मात्र, ते दगड कुठल्याही भाविकांना लागत नाहीत. भावई देवस्थानचे अवसार हुड्यावर चढतानाचा चित्तथरारक प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी दरवर्षी असते.