नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात पॅकेजवरुन चांगलंच शाब्दिक वॉर सुरु आहे. आता देवेंद्र फडणवीसांनी आव्हाडांवर चांगलाच घणाघात केला आहे. जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे ज्याने कोरोना काळात लॉकडाऊन केल्यानंतरही नागरिकांना कोणतीही मदत केलेली नाही. केंद्र सरकारने वीस लाख कोटींचा पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकारने एक पैसाही नागरिकांना मदतीसाठी दिलेला नसल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपुर विमानतळावर बोलत होते.
लॉकडाऊन काळात राज्य सरकारनं नागरिकांना मदतीसाठी एक पैसाही दिला नाही : देवेंद्र फडणवीस
फडणवीस म्हणाले की, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केले, त्यामध्ये कुठल्याही उपाययोजना नव्हत्या, कुठलेही निर्णय नव्हते. तज्ञांशी बोलू दोन दिवसानंतर सांगू असेच मुद्दे त्यांनी मांडले. लॉकडाऊन करताना त्याकाळात काळात नागरिकांना कशा पद्धतीने मदत केली जाईल हे सांगणे गरजेचे आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल काहीच सांगितलेले नसल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी जेव्हा देशात लॉकडाऊन केला होता. तेव्हा प्रत्येक घटकातील नागरिकांची काळजी घेतली होती. त्यांच्यासाठी काही न काही उपाययोजना केल्या होत्या. प्रत्येक नागरिकांच्या घरी अन्नधान्य पोहोचेल, त्यांच्या खात्यात पैसे जाईल असे नियोजन केले असल्याची आठवण फडणवीसांनी करून दिली. लॉकडाउनच्या काळात राज्य सरकार ने पॅकेज न देता फक्त लोकांची वीज कापली लोकांना त्रास दिल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पहिली लाट आली त्यावेळेस व्हेंटिलेटर, साधनसामग्री बंद केली आणि वीस लाख कोटी म्हणत फिरत आहेत. विस्मरणाचा रोग मला झालाय की तुम्हाला झालाय? असा सवाल त्यांनी केला. 20 लाख कोटींचा नक्की हिशोब समोर ठेवा मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असंही ते म्हणाले. कोण विरोधकांना दाबत आहे? कोरोना दाबायचा की विरोधकांना? लोक मरणाशी लढत आहेत त्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारसोबत काम करायच्या ऐवजी सरकारच्या पायात पाय घालून पाडण्याचा विचार विरोधक करत असतील तर अर्थ नाही, असं आव्हाड म्हणाले. राज्य सरकारला एक लाख कोटी रुपयांची तूट आली आहे. महाराष्ट्र पहिल्यांदाच शून्यावर गेला आहे तो केंद्रामुळे गेलाय. वीस लाख कोटी मधील किती कोटी महाराष्ट्राच्या हातात आले हे जर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर मला विस्मरण झालं असेल तर माझ्या स्मरणात भर होईल, असंही ते म्हणाले.
काल काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड
काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर फडणवीस यांनी वेगवेगळ्या देशांनी घोषित केलेल्या मदतीच्या पॅकेजबाबत ट्वीट करुन माहिती दिली होती. त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे पॅकेज किंवा मदत ही तिथल्या केंद्र सरकारांनी केलेली आहे. आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून अशी टीका केली होती. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे.