राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
नाशिकमध्ये कॉम्बॅट एव्हिएशन स्कूलचा दीक्षांत सोहळा; चित्ता, चेतक, ध्रुवच्या चित्तथरारक कसरती
'ती शिस्त, तो जोश, ती ऊर्जा, कुटुंबियांच्या डोळ्यांतील अश्रू आणि आता भारतमातेच्या रक्षणासाठी सज्ज झालेले तरुण...' अशा भारदस्त वातावरणात कॉम्बॅट आर्मी एव्हिएशनच्या 39 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा नाशिकच्या गांधीनगर मधील आर्टिलरी सेंटरमध्ये (Artillery Center) आज सकाळी पार पडला. दिक्षांत सोहळ्यादरम्यान पासिंग आउट परेड सोबतच चित्ता, चेतक, ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. वाचा सविस्तर
हॅलो, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी बोलतोय! मुख्यमंत्र्यांचं नाव सांगून कॉलेजमध्ये प्रवेश देत उकळले पैसे, तरुणाला बेड्या
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून बोलतोय असं सांगून (Pune Crime news ) नामांकित महाविद्यालयात विद्यार्थांना प्रवेश मिळवून देणाऱ्या भामट्याचा पर्दाफाश झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील लिपिकाने हिंजवडी पोलिसांत तशी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवडमधील राहुल राजेंद्र पालांडेला अटक करण्यात आली आहे. तो युवा सेनेचा कार्यकर्ता असून त्याने स्वतःच्या व्हाट्सअॅपवर सीएमओ ऑफिसचे बनावट लोगो, सीएम ऑफिसचे प्रोफाईल, बनावट मेल आयडी आणि गुगल लोकेशन ही टाकले होते. सोबतच ट्रूकॉलरला ही सीएमओ ऑफिसचा उल्लेख केला. वाचा सविस्तर
पुण्यात नो पार्किंगमध्ये गाडी पार्क कराल तर खिसा होईल रिकामा, यापुढे पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड?
मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहतूक कोंडी आणि वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. वाहनांची वाढती संख्या वाहतूक कोंडीला कारणीभूत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नो पार्कींगमध्ये पुणेकर गाड्या पार्क करतात परिणामी त्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणं पुणेकरांना चांगलंच महागात पडणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांना नो पार्किंगमध्ये आपलं वाहन लावताना एकदा विचार करावा लागणार आहे. कारण नो पार्किंगमध्ये वाहनं लावणाऱ्यांवर आता घसघशीत आर्थिक दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर
बाहेरुन कीर्तन आतून तमाशा, राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधकांवर टीका
"विरोधकांच्या मोट बांधणीला काही अर्थ नाही ते सत्तेसाठी एकत्र आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगात प्रतिमा उंचावत चालली आहे, त्यामुळे विरोधकांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटत आहे. त्यांना आपले स्वतःचे दुकाने बंद होण्याची भीती वाटत आहे म्हणून ते एकत्र येत आहेत. नाहीतर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी शरद पवारांविषयी (Sharad Pawar) काय उद्गार काढले आणि अरविंद केजरीवाल यांच्याविषयी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काय उद्गार काढले आहेत ते जरा तपासा. त्यामुळे बाहेरुन कीर्तन आणि आतून तमाशा विरोधकांचा चालला आहे," अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली आहे, ते अहमदनगरमध्ये (Ahmednagar) बोलत होते. वाचा सविस्तर
छत्रपती संभाजीनगरच्या अंधारी गावात पिसाळलेल्या वानराचा 11 जणांवर हल्ला, पाच वर्षांचा मुलगा जखमी
छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) अंधारी गावात दोन ते तीन दिवसांपासून वानरांनी (Monkey) धुमाकूळ घातला आहे. यामध्ये एका पिसाळलेल्या वानराने केलेल्या हल्ल्यात 11 ग्रामस्थ जखमी झाले आहेत. यात एका पाच वर्षांच्या मुलाला देखील हल्ला करत वानराने जखमी केले आहे. त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर या वानरांचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर वानराच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना गंभीर जखम झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाचा सविस्तर