मुंबई : भारतीय हवामान विभागाचा (Indian Meteorological Department) मान्सून (Monsoon) संदर्भात दुसरा अंदाज जाहीर झाला आहे.  जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सून सरासरी 96 टक्के संपूर्ण देशात कोसळण्याची शक्यता आहे.  देशात जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. देशात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याचा अंदाज आहे. 


Marathwada, Vidharbha Rain Update :  मराठवाडा, विदर्भ जून महिन्यात कमी पाऊस


मराठवाडा, विदर्भ जून महिन्यात कमी पाऊस तर संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची शक्यता आहे. दीर्घ काळासाठी म्हणजे जून-सप्टेंबर महिन्यात दिलेल्या अंदाजात महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.  अल निनोसाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे. मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव बघायला मिळण्याची दाट शक्यता असल्याचे देखील  भारतीय हवामान विभागाची म्हटले आहे. हवामान विभागाकडून (IMD) तिसरा अंदाज हा जुलै महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. 


शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतीक्षा


देशात यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान 96 टक्के पाऊस  कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी असली तरी महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतीक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. 


पाऊस मोजण्याची श्रेणी कशी ठरते?


यंदाच्या हंगामात सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या अशा पाच श्रेणी ठरवल्या आहेत. त्यानुसार 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो. दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱ्या श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरी इतका पाऊस समजला जातो. पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो. यंदाच्या हंगामात तिसऱ्या श्रेणीतील पावसाचे भाकीत करण्यात आले आहे.


हे ही वाचा :


Monsoon Update : मान्सून संदर्भात महत्वाचं अपडेट; पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण, भारतीय हवामान विभागाची माहिती