Nashik News : 'ती शिस्त, तो जोश, ती ऊर्जा, कुटुंबियांच्या डोळ्यांतील अश्रू आणि आता भारतमातेच्या रक्षणासाठी सज्ज झालेले तरुण...' अशा भारदस्त वातावरणात कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनच्या 39 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा नाशिकच्या गांधीनगर मधील आर्टिलरी सेंटरमध्ये (Artillery Center) आज सकाळी पार पडला. दिक्षांत सोहळ्यादरम्यान पासिंग आउट परेड सोबतच चित्ता, चेतक, ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. 


नाशिकच्या (Nashik) गांधीनगर लष्करी तळावर युद्धभूमीचा थरार अनुभवायला मिळाला. निमित्त होतं, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन (Combat Army Aviation) ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) लढाऊ वैमानिकांच्या दीक्षांत सोहळ्याचे. कॅट्सच्या हवाई तळावर लष्करी थाटात दीक्षांत संचलनाला सुरुवात झाली. 37 जणांच्या वैमानिकाच्या या तुकडीचे मुख्य आकर्षण होते लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी (Ajay Kumar Suri). गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशनच्या दीक्षांत सोहळ्यास आज त्यांची विशेष उपस्थिती होती. प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांनी विमान उड्डाणाचे कठोर प्रशिक्षण घेतले असून एकूण 37 अधिकारी कॉम्बॅट एव्हिएटर्स म्‍हणून नवीन भूमिका साकारण्‍यासाठी तयार झाले आहेत. कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर 21 अधिकाऱ्यांना कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट बनण्यासाठी प्रतिष्ठित एव्हिएशन विंग्स प्रदान करण्यात आले. 


दरम्यान शिस्तबद्ध पडणारी पाऊल, अभिमानाने भरून आलेला ऊर, देशसेवेसाठी सज्ज झालेले तरुण…अशा वातावरणात गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट एव्हिएशन स्कूलमध्ये 39 व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळा चित्ता, चेतक, ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टर्सच्या साक्षीने डोळ्यांची पारणे फेडणारा ठरला. यावेळी ट्रॉफी विजेत्यांपैकी कॅप्टन GVP प्रथुष याला कॉम्बॅट एव्हिएटर्सच्या 39 व्या तुकडीच्या एकूण ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये प्रथम स्थान मिळाल्याबद्दल सिल्व्हर चीता ट्रॉफी देण्यात आली तर मेजर हर्षित मल्होत्रा यांना एकूणच मेजर प्रदीप अग्रवाल ट्रॉफी देण्यात आली. सर्वोत्कृष्ट आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स क्रमांक 38 मेजर प्रणित कुमार यांना बेस्ट इन ग्राउंड सब्जेक्ट्स ट्रॉफी आणि मेजर विवेक कुमार सिंग यांना बेसिक RPAS कोर्स साठी फर्स्ट इन ऑर्डर ऑफ मेरिट ट्रॉफी देण्यात आली. हा सोहळा प्रत्यक्षपणे अनुभवण्यासाठी प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय देखिल उपस्थित होते. 


दरम्यान युद्धाच्या वेळी महत्वाची साथ देणार्‍या लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांची तुकडी देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झाली आहे. गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी  एव्हिएशन स्कूलमध्ये हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधित त्यांच्याकडून संपूर्ण तयारी करुन घेतली जाते. यामध्ये शत्रुंवर हवाई हल्ला करणे, जमिनीवरील सैन्याला रसद पुरविणे, जखमीना सुरक्षित ठिकाणी उपचार्थ हलविणे आदीसह विविध बाबींचे सखोल ज्ञान दिले जाते. यावेळी लष्करी थाटात मान्यवरांच्या हस्ते 21 वैमानिकांना एव्हिएशन विंग व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या पाल्याचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.


हवाई दलाच्या चित्तथरारक कसरती 


दरम्यान दीक्षांत संचलनानंतर प्रांगणात हवाई दलाच्या चित्ता, चेतक, ध्रुव या हेलिकॉप्टर चमूने चित्तथरारक कसरती सादर करत उपस्थितांना खिळवून ठेवले. हवेत करण्यात आलेल्या कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अतिशय चित्तथरारक कसरती सादर करत हवाई दलातील चमूने उपस्थितांची मने जिंकली. हेलिकॉप्टरमधून युद्धभूमीवर दाखल होत शत्रूच्या छावण्यांवर हल्ला चढविणे, जखमी सैनिकांना एअर लिफ्ट करणे, एकाचवेळी चार चार हेलिकॉप्टरवर हल्ला करून जाणे, अशी हृदयाचा ठोका चुकवणारी प्रात्यक्षिके सादर झाली.