Pune News :  मागील काही दिवसांपासून पुण्यात वाहतूक कोंडी आणि वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. वाहनांची वाढती संख्या वाहतूक कोंडीला कारणीभूत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नो पार्कींगमध्ये पुणेकर गाड्या पार्क करतात परिणामी त्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणं पुणेकरांना चांगलंच महागात पडणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांना नो पार्किंगमध्ये आपलं वाहन लावताना एकदा विचार करावा लागणार आहे. कारण नो पार्किंगमध्ये वाहनं लावणाऱ्यांवर आता घसघशीत आर्थिक दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.


पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाकडून दंडाच्या रकमेबाबत सूचनापत्र जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार पुणे शहरात नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या दुचाकीस्वारांकडून पहिल्यांदा टोइंगसह 785 रुपये आणि मोटारचालकांकडून 1,071रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास दुचाकीस्वारांना 1,785 रुपये आणि मोटारचालकांना 2,071 रुपये दंड भरावा लागेल.  पार्किंगसंदर्भातील नियम तोडणाऱ्या वाहनचालकांनी पोलिसांसोबत वाद घालू नयेत, असं आवाहन वाहतूक पोलीस शाखेकडून करण्यात आलं आहे.


वाहतूक नियम:



  • वाहनाचा प्रकार – दुचाकी – चारचाकी

  • प्रथमच दंडाची रक्कम - रु 500 - रु. 500

  • दुसऱ्यांदा दंडाची रक्कम – रु 1500 - रु. 1500


टोइंग चार्ज:



  • दुचाकी - 200 रु

  • चारचाकी - 484 रु


GST:



  • दुचाकी - रु 85.56

  • चारचाकी - रु 87.12


एकूण (रुपयामध्ये):



  • दुचाकी - रु 785.56 (पहिल्यांदा) आणि रु 1,785.56 (दुसऱ्यांदा)

  • चारचाकी - रु 1,071.12 (पहिल्यांदा) आणि रु 2,071.12 (दुसऱ्यांदा)


 यापूर्वी हेल्मेट अन् बेपर्वा वाहनचालकांवर कडक कारवाई


 यापूर्वी   विमा नसलेली वाहने आणि हेल्मेट नसलेल्या टू व्हीलरवर करडी नजर होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बेपर्वा वाहनचालकांवर कडक कारवाई केली होती. , आरटीओच्या 'वायुवेग' पथकांनी एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत 20,000 हून अधिक वाहनचालकांवर कारवाई केली होती. आरटीओच्या बहुतांश कारवाया विमा (Insurance) नसलेल्या वाहनांवर केल्या जात होत्या. यावर्षी विमा नसलेल्या 5 हजार 903 वाहनांवर आणि मागील वर्षी विमा नसलेल्या 4 हजार 491 वाहनांवर कारवाई केली. याशिवाय हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या 3 हजार 693 आणि वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणाऱ्या 1199 जणांवर कारवाई करण्यात आली होती. 


धडक कारवाईला सुरुवात...


सिग्नल तोडणे, सीटबेल्ट न वापरणे, माल ओव्हरलोड करणे आणि मालवाहू वाहनांमध्ये प्रवाशांची ने-आण करणे यासारख्या इतर उल्लंघनांवरही दंड आकारला जातो. बेपर्वा वाहनचालकांना शिस्त लावणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे या प्राथमिक उद्देशाने आरटीओच्या पथकांनी ही कारवाई सुरु केली आहे. सध्या पुण्यात प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलीस उभे असतात. त्यात अनेक दुचारीस्वारांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्राची विचारपूस करतात. त्यानंतर हेल्मेट सक्ती असताना हेल्मेट न वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता नो पार्किंगच्या गाड्यांवरदेखील पोलिसांची करडी नजर असणार आहे.