राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
समीर वानखेडे यांना हायकोर्टाचा तात्पुरता दिलासा, अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय कायम
आयआरएस अधिकारी आणि एनसीबीचे माजी झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला. 8 जूनपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. मात्र केससंदर्भातले पुरावे माध्यमांमध्ये शेअर न करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. सीबीआयला 3 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले, त्यानंतर 5 दिवसांनी, म्हणजेच 8 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानकडून 25 लाख रुपये मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने केला आहे. वाचा सविस्तर
मोबाईल, दागिन्यांनंतर पुण्यात आता चक्क चप्पल चोरी; खडकीमध्ये तब्बल 55 चप्पल आणि बूट जोड चोरीला
पुण्यातील खडकी भागातील एका दुकानातून तब्बल 55 चप्पल आणि बूट जोड चोरट्यांनी चोरुन नेले. तीन जणांनी मिळून 30 ते 40 हजार रुपयांचे 55 चप्पलांचे जोड (Shoes) लंपास केले. यातील 40 मेन्स शूज तर 15 लेडीज चपला चोरट्यांनी चोरल्या. हरेश आहुजा यांनी या प्रकरणात पोलिसात तक्रार दिली होती. या चोरीचा तपास करताना पोलिसांनी सागर चांदणे, आकाश कपूर, अरबाज शेख यांना अटक केली आहे. वाचा सविस्तर
नाशिकच्या नोटप्रेसमध्ये पाचशेच्या तब्बल 2 हजार मिलियन नोटांची छपाई; चार महिने 24 तास कामकाज
दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद होणार असल्याने भविष्यात 500 रुपयांच्या नोटांची मागणी वाढणार आहे आणि एकंदरीतच ही सर्व परिस्थिती बघता नाशिकच्या नोट प्रेसमधील 1500 कामगारांना येत्या दोन दिवसात पुढील चार महिन्याच्या कालावधीत नोटबंदीच्या काळाप्रमाणेच 24 तास कामकाज करावे लागणार आहे. वाचा सविस्तर
राज्यात पावसाची स्थिती काय, मान्सून कधी दाखल होणार; पंजाबराव डख यांनी वर्तवला असा अंदाज
राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष यंदाच्या मान्सूनकडे लागले असून, यंदा मान्सून कधी दाखल होणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून मशागतीचे कामे देखील केली जात आहे. दरम्यान शेतकऱ्यांनो, शेती मशागतीची कामे वेळेत उरकून घ्यावीत, मान्सूनचे आगमन लवकरच होणार आहे, असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले आहे. तर आजपासून तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता देखील डख यांनी वर्तवली आहे. वाचा सविस्तर
शेतकऱ्यांच्या घामाला मिळेना दाम; लातूरच्या बाजारात भाजीपाल्याला भाव नाही, शेतकरी सापडला संकटात
अगोदर अवकाळीने कंबरडे मोडले असताना आता भाजीपाल्याचे दर अचानक कोसळले आहेत, याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे. उत्पादक शेतकऱ्यांना पिकवलेला भाजीपाला मातीमोल भावाने विकावा लागत आहे. टोमॅटो एक रुपये किलो तर कांद्याला तीन रूपये किलो पालेभाज्या 4 ते 5 रुपये जुडी या दराने विकल्या जात आहेत. सर्वच भाज्या दहा रुपये किलोच्या घरात विकल्या जात असल्यामुळे भाजीपाला उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. वाचा सविस्तर