Pune Crime : पुण्यातील खडकी (Khadki) भागातील एका दुकानातून तब्बल 55 चप्पल आणि बूट जोड चोरट्यांनी चोरुन नेले. तीन जणांनी मिळून 30 ते 40 हजार रुपयांचे 55 चप्पलांचे जोड (Shoes) लंपास केले. यातील 40 मेन्स शूज तर 15 लेडीज चपला चोरट्यांनी चोरल्या. हरेश आहुजा यांनी या प्रकरणात पोलिसात तक्रार दिली होती. या चोरीचा तपास करताना पोलिसांनी सागर चांदणे, आकाश कपूर, अरबाज शेख यांना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आहूजा यांचे खडकी बाजार भागात चपलेचे गोडाऊन आहे. शनिवारी (20 मे) गोडाऊन बंद केल्यानंतर रात्री या तीन तरुणांनी गोडाऊनचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि हाताला दिसेल आणि मिळतील तसे बूट आणि चप्पल असे एकूण 55 चप्पल आणि बूट चोरी करुन पसार झाले. अशिक्षित असल्यामुळे या तरुणांनी उदरनिर्वाह तसंच दारु पिण्यासाठी ही चोरी केल्याचं प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे. खडकी पोलीस ठाण्यात या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे कोयता गँगची दहशत असतानाच दरोडा, मोबाईल फोन, दागिन्यांच्या चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यातच आता चोर चोरीसाठी नव्या वस्तूंचा आधार घेताना दिसत आहेत. उदरनिर्वाहासाठी तसंच इतर कारणांसाठी आता चप्पलची चोरी करण्याचा प्रकार समोर आला आहे.
पिंपरखेडमध्ये मध्यरात्री घरावर सशस्त्र दरोडा
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड इथल्या दाभाडेमळा परिसरात सात ते आठ चोरट्यांनी बाळू नावजी दाभाडे यांच्या घरावर दरोड टाकला होता. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील दहा तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेत पोबोरा केला. त्यांनी आणखी एका घरात प्रवेश करुन सोन्याचा वेल आणि पाच हजार रुपये रक्कम असा एकूण पाच लाखांचा ऐवज घेऊन पलायन केल्याची 18 रोजी पहाटे घडली होती. या घटनेने पिंपरखेड परिसरात खळबळ उडाली आहे.
मोबाईल चोरी करणार्या उच्चशिक्षित तरुणाला अटक
रामटेकडी इथल्या डिजीटल हबमध्ये परीक्षा देण्यासाठी आलेल्या परीक्षार्थींच्या बॅगेतील मोबाईल चोरी करणार्या उच्चशिक्षित तरुणाला पाच दिवसांपूर्वी वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या मोबाईलसह इतर ऐवज असा एकूण 96 हजार 500 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला. ऋषिकेश प्रभाकर पाटील असं आरोपीचं नाव असून जो मूळचा जळगावचा आहे.
खडकीतील महिलेच्या हत्येचा उलगडा, एकतर्फी प्रेमातून खून
पुण्यातील खडकीमध्ये महिनाभरापूर्वी महिलेवर चाकूने हल्ला करुन खून केल्याप्रकणी आरोपींना कर्नाटकातील विजापूरमध्ये अटक करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून आरोपी रिक्षाचालकाने साथीदाराच्या मदतीने महिलेची हत्या केली होती. खडकी पोलिसांनी तीन दिवसात या प्रकरणाचा छडा लावत मुख्य आरोपी नसिर बिराजदार आणि त्याच्या साथीदाराला विजापूरमधून अटक केली.