Maharashtra Mansoon : राज्यभरातील शेतकऱ्यांचे (Farmers) लक्ष यंदाच्या मान्सूनकडे (Mansoon) लागले असून, यंदा मान्सून कधी दाखल होणार याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून मशागतीचे कामे देखील केली जात आहे. दरम्यान शेतकऱ्यांनो, शेती मशागतीची कामे वेळेत उरकून घ्यावीत, मान्सूनचे आगमन लवकरच होणार आहे, असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी केले आहे. तर आजपासून तीन दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता देखील डख यांनी वर्तवली आहे. 


छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथे एका कार्यक्रमासाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डख आले असता त्यांनी आपल्या अभ्यासानुसार यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे सांगितले. तसेच पाऊस कुठं पडतो याची बरीच माहिती उदाहरणांसह सांगितली. तर येत्या 22, 23, 24 मे रोजी मान्सूनपूर्व पाऊस पडणार असून, जून महिन्याच्या 1, 2, 3 तारखेला देखील पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. तर 8 जून रोजी महाराष्ट्रात मोसमी पावसाची दमदार हजेरी लावून यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


पुढे बोलताना डख म्हणाले की, मी फक्त शेतकऱ्यांचा हितासाठी हवामानाचा अंदाज सांगून पावसामुळे शेतकऱ्यांचे होणार नुकसान टाळण्यासाठी व पुढील नियोजनासाठी सांगत आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीसाठी थोडे दिवस राहिले आहेत. त्यांनी लवकरात लवकर शेतीच्या मशागतीची कामे करून खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज राहावे, असेही पंजाबराव डख म्हणाले. 


शेतकऱ्यांचे मान्सूनकडे लक्ष... 


यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मान्सूनकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत. विशेष म्हणजे गेल्यावर्षी खरीप हंगामात मोठ्याप्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं. त्यातून शेतकरी सावरत नाही तो, रब्बी हंगामात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. मार्च, एप्रिल ते मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांचा पेरणीसाठी लावलेला खर्च देखील निघाला नाही.  त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला असला तरीही अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने येऊ नयेत अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 


तापमान वाढतोय...


सध्या उन्हाचा पारा चांगलाच तापताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून तापमान 41 अंशांवर गेले आहे. सोमवारी त्यात एक अंशाने वाढ होण्याची शक्यता असून, तापमान 42 अंशांवर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Monsoon : मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात तीन दिवस आधीच दाखल, पुढील तीन-चार दिवसात बंगालच्या उपसागरात येणार