Relief to Sameer Wankhede : आयआरएस अधिकारी आणि एनसीबीचे माजी झोन डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) तात्पुरता दिलासा दिला. 8 जूनपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. मात्र केससंदर्भातले पुरावे माध्यमांमध्ये शेअर न करण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. सीबीआयला 3 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले, त्यानंतर 5 दिवसांनी, म्हणजेच 8 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानकडून 25 लाख रुपये मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने (CBI) केला आहे.


कोर्टाने काय म्हटलं?


न्यायमूर्ती अभय आहुजा, न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. सीबीआयच्या वकिलांनी केलेल्या आरोपांची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. समीर वानखेडे यांचे वकील आबाद पोंडा यांचा युक्तिवाद हायकोर्टाने मान्य केला आहे. मात्र याचवेळी मीडिया ट्रायल होऊ नये याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. तपासासंदर्भात कोणतीही माहिती अथवा मेसेज देण्यास न्यायालयाने समीर वानखेडे यांना प्रतिबंध घातले आहेत. शिवाय चौकशी आणि तपासात सीबीआयला सहकार्य करण्याचे निर्देश वानखेडे यांना दिले आहेत. कोर्टाने सीबीआयला 3 जूनपर्यंत  अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून 8 जून रोजी पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे सुनावणी होईपर्यंत समीर वानखेडे यांना अटकेपासून दिलासा कायम आहे.


मागील दोन दिवसात काय झालं?


समीर वानखेडे यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. मागचे दोन दिवस समीर वानखेडे यांची सीबीआयकडून दररोज पाच तास चौकशी झाली आहे. हायकोर्टाने दिलेल्या निर्देशांचं पालन करत दोन दिवस सीबीआय अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीला सहकार्य केल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे. या दोन दिवसातील चौकशीचा अहवालही सीबीआयने हायकोर्टात सादर केला आहे. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर समीर वानखेडेंना हायकोर्टाने अटकेपासून असलेलं संरक्षण कायम ठेवलं आहे.


कोर्टातील युक्तिवाद


आबाद पोंडा, समीर वानखेडे यांचे वकील : हे लोक (सीबीआय)  25 ऑक्टोबर 2021 पासूनच प्रकरणाचा तपास करत आहेत. स्पेशल इन्क्वायरी टीमची (SET) स्थापना करण्यात आली आहे. दीड वर्षांपासून चौकशी सुरु आहे.  41 अ ची नोटीस दिली आहे. अटक करायची नसेल त्यांना ही नोटीस दिली जाते. त्यांना चौकशीसाठी बोलावलं जातं. चौकशीत मी सहकार्य करतोय, कायम करणार. मला अटक करण्याची मानसिकता का? या प्रकरणी मी दिल्ली कोर्टात गेलो, मला सोमवारपर्यंत दिलासा दिला होता. याप्रकरणी मी दोन दिवस सीबीआय कोर्टात हजर देखील झालो, तपासात सहकार्य देखील केलं आहे. मी कोविड काळात शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी फार प्रयत्न केले आणि अनेक लोकांना अटक केली, ज्यात बिग शॉट सहभागी होते, ते आता माझा बदला घेत आहे. मी चांगलं कायम करतोय, अशा शब्दात माझ्या वरिष्ठांनी माझ्या कामाचं कौतुक केलं आहे.  मी माझा जबाब नोंदवण्यास तयार आहे. माझ्यावर वसुलीचे आरोप झाल्यामुळे व्हॉट्सअॅप चॅट दिले. आणि वरिष्ठांना माहिती दिल्यानंतरच ड्रग्जची संबंधित कारवाई करण्यात आली.


कुलदीप पाटील, सीबीआयचे वकील : समीर वानखेडे यांची चौकशी अद्याप अपूर्ण आहे. मिळालेला कालावधी पुरेसा नाही. अद्याप काही महत्त्वाचा खुलासा, समीर वानखेडे करायला तयार नाहीत. चौकशीतील महत्त्वाचा भाग मी डिस्क्लोज करु शकत नाही. शाहरुख खानसोबत केलेला संवाद त्यांनी खुला केला हे सरकारी नोकरी नियमांचं उल्लंघन आहे.


आबाद पोंडा :  शाहरुखसोबतचं चॅट कोर्टात सादर केली हा माझा नैसर्गिक बचाव अधिकार


हायकोर्ट : तुम्ही माध्यमात प्रसिद्ध केलीत का? 


आबाद पोंडा : नाही, आम्ही कोर्टात सादर केली आहेत 


कुलदीप पाटील : यांचा मीडिया ट्रायल करण्याचा प्रयत्न आहे


आबाद पोंडा : आम्ही मीडिया ट्रायल केली नाही


हायकोर्ट : मीडिया ट्रायल चालणार नाही


आबाद पोंडा : प्रतिज्ञापत्रानुसार सीबीआयने 11 मे 2023 पासून तपासाची सुरुवात केली. तर ऑक्टोबर 2021 पासून 11 मे 2023 पर्यंत काय झालं? आम्ही सुट्टीकालीन कोर्टात आलोय कारण यांचा हेतूच आम्हाला अटक करण्याचा आहे, वानखेडे यांचे वकील पोंडा यांचा युक्तिवाद


आबाद पोंडा यांनी यांनी कोर्टासमोर शाहरुख खानसोबत समीर वानखेडे यांचं झालेलं चॅट वाचून दाखवलं. ज्यात शाहरुख खानने वानखेडे यांना अपराईट ऑफिसर म्हटलं आहे. हे या चॅट्सचा काही भाग आहे, जर ते चुकीचं असतं आणि पैसे मागितले असते तर एक वडील अधिकाऱ्याला अपराईट का म्हणेल?


आबाद पोंडा : शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्या चॅटमध्ये कुठेही समीर यांच्या हेतूबद्दल शंका नाही. एका पित्याचा एका पित्याशी झालेला संवाद आहे. यात कुठेही समीर यांनी तपासातील गोपनियनेताचा भंग केल्याचं दिसत नाही. आपल्या कर्तव्यबद्दल त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. कोणताही व्यवहार किंवा फेवर केल्याचंही यात दिसत नाही. शाहरुख खान सुद्धा हे अॅडमिट करतो हे यात स्पष्ट होतं. 


कुलदीप पाटील : हे चॅट्स त्यावेळचं आहे, ज्यावेळी समीर हे प्रकरण हाताळत होते. समीर वानखेडे ते चॅट कॅरेक्टर सर्टिफिकेटप्रमाणे सादर करत आहेत. आम्ही जे आरोप लावले आहेत, यासंदर्भात चौकशी करत आहोत. कोणताही पुरावा आढळल्यास आम्ही अटक करु शकतो, तपासादरम्यान असा निर्णय घेण्याचे तपास अधिकाऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. उद्या दिलासा मिळाल्यानंतर तो कोणत्याही तपासाशी संबंधित पुराव्यांशी छेडछाड करु शकतो


हायकोर्ट : आपण सध्या अटकेच्या विषयावर चर्चा करु, एफआयआर रद्द करणारी बाबी बाजूला ठेवू.


कुलदीप पाटील : कस्टडीत असलेल्या मुलाबद्दल, शाहरुख खाननं केलेला संवाद कायदा अत्यंत स्पष्ट आहे, असा संवाद गैर आहे या चॅटमधील कन्टेन्ट महत्वाचा नाही तर एफआयआरमधील कन्टेन्ट महत्वाचा आहे. समीर वानखेडे यांना अटक करायची का नाही याबद्दल आता सांगू शकत नाही, अद्याप तपास बाकी आहे. योग्य चौकशी होण्यासाठी समीर वानखेडे यांना कोर्टाने अजून संरक्षण देऊ नये.


कुलदीप पाटील : अद्याप तपास सुरु असून त्यांना अटक करण्यासाठी आम्ही घाई करत नाही


हायकोर्ट : तुम्ही त्यांच्याकडून शपथ घ्या की जेव्हा तुम्हाला तपासासाठी त्यांची आवश्यकता असेल तेव्हा ते इथे असतील.


कुलदीप पाटील : आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला दोन आठवडे लागतील


एनसीबी : आम्ही आमचा अहवाल गृह मंत्रालयाला दिला आहे जो SET ने चौकशीनंतर केला होता. गृह मंत्रालयाने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं आहे.


हायकोर्ट : वानखेडे कोणत्याही पुराव्याशी छेडछाड करणार नाहीत, ते या तपासाशी संबंधित कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांसमोर देणार नाहीत ज्यामुळे प्रकरणावर परिणाम होऊ शकेल, तपासादरम्यान त्यांना आवश्यक असेल तेव्हा ते नेहमी सीबीआयसमोर हजर राहतील. त्यांनी या सर्व गोष्टी मान्य केल्यास पुढील सुनावणीपर्यंत संरक्षण कायम राहणार आहे.


हायकोर्ट : सीबीआयने 3 जूनपर्यंत आपली बाजू मांडावी.


समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून पुढील सुनावणीपर्यंत दिलासा