राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील..
प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता होणार जाहीर
दहावीच्या निकालाची धाकधूक असणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांसाठी उद्याचा दिवस महत्वाचा असणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे, त्याचप्रमाणे 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही दहावीचा निकाल सर्वात आधी पाहता येणार आहे. यंदा निकालाची प्रत डाऊनलोड करण्याचा ऑप्शन देखील 'एबीपी माझा'च्या साईटवर देण्यात आला आहे. वाचा सविस्तर
बारावी परीक्षेच्या 'हस्ताक्षर घोटाळा' प्रकरणी पोलीस 'त्या' 372 विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवणार
बारावीच्या परीक्षेच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर आढळून आलेल्या प्रकरणात रोज नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. तब्बल 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर समोर आल्याने या प्रकरणात चौकशीअंती राहुल ऊसारे आणि मनिषा शिंदे दोन शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलिसांकडून याचा तपास केला जात असताना, या सर्व प्रकरणात आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे बोर्डाच्या चौकशीनंतर आता पोलिसांकडून देखील 372 विद्यार्थ्यांचा जबाब घेतला जाणार आहे. वाचा सविस्तर
रायगडाच्या पायथ्यापासून गडावर प्रत्येक पाचशे मीटरवर वैद्यकीय मदत केंद्र
खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून विशेष काळजी घेतली जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान उन्हात लाखो शिवप्रेमींची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. रायगडाच्या पायथ्यापासून अगदी गडावर प्रत्येक पाचशे मीटरवर वैद्यकीय मदत केंद्र तयार केले जाणार आहेत. शिवाय उपचारांसाठी आयसीयू बेड्स आणि अॅम्ब्युलन्स सुद्धा तयार ठेवण्यात येणार आहे. वाचा सविस्तर
मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष थोडीच माझा आहे; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
राष्ट्रीय समाज पक्षाने बुधवारी (31 मे) दिल्लीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली. दरम्यान याच कार्यक्रमाच्या भाषणामध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 'मी भाजपची आहे, पण भाजप पक्ष थोडीच माझा आहे', असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे. पंकजाताई भाजप माझ्या पाठिशी आहे, असंच म्हणाल्या, असं बावनकुळे म्हणाले. वाचा सविस्तर
जळगावात भरदिवसा बँकेवर दरोडा, चाकूचा धाक दाखवत लाखो रुपये लांबवले, चोरटे पसार
जळगावात भरदिवसा बँकेवर दरोडा पडला. तीन दरोडेखोरांनी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) शाखेत घुसून चाकूचा धाक दाखवत लाखो रुपये लुटले. दरोडा टाकल्यानंतर चोरटे पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत हा दरोडा पडला. मात्र दिवसाढवळ्या पडलेल्या या दरोड्यामुळे एकच खळबळ उडाली. वाचा सविस्तर