Jalgaon Crime : जळगावात (Jalgaon) भरदिवसा बँकेवर दरोडा (Robbery) पडला. तीन दरोडेखोरांनी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) शाखेत घुसून चाकूचा धाक दाखवत लाखो रुपये लुटले. दरोडा टाकल्यानंतर चोरटे पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. मात्र दिवसाढवळ्या पडलेल्या या दरोड्यामुळे एकच खळबळ उडाली.
जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत हा दरोडा पडला. तिघांनी चाकूचा धाक दाखवत भरदिवसा दरोडा टाकून रोकड लांबवली. चोरट्यांनी बँकेतील अंदाजे 15 लाखांपेक्षा जास्त रुपयांची रोकड लांबवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
कसा पडला दरोडा?
कालिका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. आज (1 जून) सकाळी नऊ वाजता बँक उघडून नियमितपणे कारभार सुरु झाला होता. मात्र सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन तरुण दुचाकीवरुन बँकेत आले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र होते. या शस्त्राच्या बळावर त्यांनी व्यवस्थापकासह पाच ते सहा कर्मचार्यांना धमकावले. यावेळी दरोडेखोरांनी व्यवस्थापकाच्या मांडीवर कोयत्याने वार देखील केला. यानंतर कोयत्याचा धाक दाखवत त्यांनी बँकेतील रोकड घेऊन तिथून पळ काढला.
अवघ्या काही मिनिटांचा थरार
हा संपूर्ण प्रकार अवघ्या काही मिनिटांत घडला. चोरटे बँकेत घुसल्यापासून रोख रक्कम पळवून नेण्यापर्यंतची थरार अवघ्या काही मिनिटांचा होता. त्यांनी बँकेतील अंदाजे 15 लाखांपेक्षा जास्त रुपयांची रोकड लांबवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
जळगाव जिल्ह्यात खळबळ
दरम्यान, या दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेत धाव घेतली. जखमी झालेल्या व्यवस्थापकाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या ठिकाणी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसीचे प्रभारी शंकर शेळके यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि आढावा घेतला. याशिवाय श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून आरोपींचा शोध सुरु आहे. परंतु भरदिवसा घडलेल्या या दरोड्यामुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा
Bihar Children Rescued : बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांची तस्करी? 60 मुलांना पोलिसांनी सोडवलं