Shivrajyabhishek Din 2023खारघरमध्ये (Kharghar) महाराष्ट्र भूषण सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून विशेष काळजी घेतली जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान उन्हात लाखो शिवप्रेमींची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून (Health Department) विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. रायगडाच्या पायथ्यापासून अगदी गडावर प्रत्येक पाचशे मीटरवर वैद्यकीय मदत केंद्र तयार केले जाणार आहेत. शिवाय उपचारांसाठी आयसीयू बेड्स आणि अॅम्ब्युलन्स सुद्धा तयार ठेवण्यात येणार आहे.


रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. खारघरच्या घटनेनंतर ऊन पाहता प्रत्येक राज्य शासनाच्या मोठ्या कार्यक्रमात आरोग्य विषयक विशेष खबरदारी घेतली जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला लाखो शिवप्रेमी रायगडावर येणार आहेत. वाढते ऊन पाहता उष्माघातापासून बचाव व्हावा यासाठी अगदी रायगडाच्या पायथ्यापासून ते रायगडावर वैद्यकीय मदत केंद्र तयार करण्यात आले आहेत. शिवाय अत्यावश्यक सेवेसाठी ॲम्बुलन्स तैनात ठेवण्यात आले आहेत.रायगडावर चढताना शिवप्रेमींसाठी दीड लाख पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स देण्यात येणार आहेत.


आरोग्य विभागाकडून कोणकोणत्या सोयी?



  • 25 वैद्यकीय मदत केंद्रात साडे तीनशे अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील

  • ठिकठिकाणी 25 आयसीयू बेड्स

  • गडावर 2 आयसीयू बेड्स

  • 70 साधे बेडस

  • 28 अॅम्ब्युलन्स

  • दीड लाख बॉटल्स आणि ओआरएस दिले जाणार


राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज


छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह इथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे.



  • गडाच्या पायथ्याशी राज्यभरातून येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांसाठी कोंझर, वालुसरे, पाचाड येथे वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी साडेतीन हजार वाहने या ठिकाणी पार्किंग करून ठेवता येणार आहे. 

  • उन्हाळ्याचे दिवस असल्याने गडावर 10 हजार लिटर आणि गडाच्या पायथ्याशी 40 हजार लीटर पाणीसाठा करण्यात आला आहे. 

  • शिवभक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 24 वैद्यकीय सेंटर्स तैनात केली जाणार आहेत. 

  • गडाच्या पायथ्याशी अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सोयीसाठी पाचाड शिवसृष्टी परिसरात 3 हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत. गडावर आणि पायथ्याशी अग्निशमन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.

  • गडावर येण्यासाठी चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग उपलब्ध असणार आहेत. रोप-वे मार्ग हा निमंत्रितांसाठी मर्यादित राहणार आहे.

  •  रायगड किल्ले परिसरात जवळपास 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात येईल

  • याशिवाय पायरी मार्गाने रात्री गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पायरीमार्गावर पुरेसे पथदिवे लावण्यात आले आहेत.