राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाकडून कायमचं अभय, महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा वैध


राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल दिला आहे.  घटनापीठाने सुनावणीनंतर याबाबतचा निकाल राखून ठेवला होता. तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्ट आज काय निकाल देणार याकडे बैलगाडाप्रेमींचं लक्ष लागले होते. अखेर बारा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी मोठा दिलासा आहे. वाचा सविस्तर


तुळजाभवानी  मंदिरात भाविकांसाठी ड्रेसकोड, मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी


महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा विचार तुम्ही करताय का? मग मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना तुळजाभवानी मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी करण्यात आली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करुन येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा, असा सल्ला देखील फलकावरुन देण्यात आला आहे. वाचा सविस्तर


शिवरायांची जगदंबा तलवार, वाघ नखे यावर्षीच महाराष्ट्रात येणार


छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमध्ये असलेली जगदंबा तलवार, वाघ नखे आपल्या मायभूमीत परत यावीत याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. हीच जगदंबा तलवार, वाघ नखे पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावलं उचलली आहेत. 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा आणि आगामी सर्वच निवडणुका पाहता यावर्षीच तलवार आणि वाघ नखे देशात राज्य सरकार आणणार आहे. वाचा सविस्तर


तीन महिन्यात एकट्या पुण्यातून तब्बल 447 मुली बेपत्ता; जिल्ह्यातील शेकडो मुली गेल्या कुठे?


महाराष्ट्रातून गेल्या तीन महिन्यात 16 ते 25 वयोगटातील 3 हजार 594 तरुणी राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत. राज्य सरकारच्या वेबसाईटवर असलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी चिंताजनक आहे, असं म्हणत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यातूनच एकट्या पुणे जिल्ह्यातून तब्बल 447 महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर


म्हाडा मुंबई मंडळाच्या 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात, 18 जुलै रोजी सोडत


म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी सोमवारी, 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हाडाची ही घरं गोरेगाव पहाडी, विक्रोळीच्या कन्नमवारनगर, अँटॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर, सायन परळ, ताडदेवमध्ये आहेत. 22 मे पासूनच नोंदणी, अर्ज विक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया 26 जूनपर्यंत सुरु राहणार असून 18 जुलै रोजी वांद्रे पश्चिम इथल्या रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात येणार आहे. वाचा सविस्तर