Pune Traffic Police : पुण्यातील ट्रॅफिक पोलिसांचे अनेक किस्से आपण ऐकले आहे. सोशल मीडियावर अनेक नागरिकांनी ते शेअर देखील केले आहेत. याच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे दोन वाहतूक पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. सोशल मीडिया एखाद्याला न्याय मिळवून देऊ शकतो किंवा वाईट कार्य पुढे आणून चुकीच्या कार्याला आळा बसवू शकतो हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. वाहनचालकांकडून पैसे घेतल्याच्या आरोपांवरुन दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. बाळू दादा येडे आणि गौरव रमेश उभे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघे कर्मचारी स्वारगेट वाहतूक विभागात कार्यरत होते.


प्रफुल्ल सारडा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर 17 मे रोजी गंगाधाम-आई माता मंदिर रस्ता या ठिकाणी वाहतूक पोलीस नागरिकांकडून पैसे घेत असल्याचे व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान व्हिडीओमध्ये वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता त्यांच्याकडून पैसे स्वीकारतानाच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. विभागीय चौकशीतील कार्यवाहीनुसार या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 






व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?


या व्हिडीओमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी नियमांचं उल्लंघन केल्यामुळे वाहनचालकाला थांबवलं आहे. त्यानंतर काहीही न बोलता थेट लाच घेतल्याचं स्पष्टपणे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पोलिसांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


एका व्हिडीओमुळे थेट निलंबन


सध्या अनेक नागरिक सजग झाले आहेत. कोणतंही वाईट कृत्य दिसल्यास ते थेट सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. या सोशल मीडियामुळे आतापर्यंत अनेक अशा घटना पुढे आल्या आहेत आणि वेळीच संबंधित व्यक्तींवर कारवाईदेखील झाली आहे. यावेळीही पोलीस  कर्मचाऱ्यांना  या व्हिडीओवरुन निलंबित करण्यात आलं आहे. 


पोलिसांची प्रतिमा मलिन केली?


शहरात वाहतूक पोलिसांची मनमानी सुरु असल्याच्या भावना आतापर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर  बोलून दाखवल्या आहेत. याच बाबतीत अनेक रील स्टार्सने रील्सदेखील तयार केले आहेत. मात्र तरीही पोलिसांची मनमानी कमी झाली नसल्याचं समोर आलं आहे. पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याने दोघांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. काही रुपयांसाठी पोलिसांनी पोलीस विभागाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका या दोन्ही पोलिसांवर ठेवला आहे.