BRS Party Meeting : भारत राष्ट्र समिती पक्षाच्यावतीने (BRS) राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तर तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री तथा बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) (K. Chandrashekar Rao) हे उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाच्या किसान सेलचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माणिकराव कदम यांनी दिली आहे.


नांदेडमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर


बीआरएस पक्षाला राष्ट्रीय स्थरावर वाढवण्यासाठी के. चंद्रशेखर राव यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी त्यांनी मराठवाड्यात आतापर्यंत तीन भव्य सभा देखील घेतल्या आहेत. दरम्यान आता राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. नांदेड शहरातील अनंता लॉन्स येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 19 ते 20 मे असे दोन दिवसीय हे शिबीर असणार असून, यासाठी स्वतः के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे उपस्थित राहणार आहे. 


कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार?


तर या शिबिरात भारत राष्ट्र समितीचे ध्येय धोरणे, प्रत्येक गावात शाखा, कोअर कमिटी स्थापना अभियान (मुख्य शाखा, किसान सेल, युवक सेल, महिला सेल, एस सी सेल, एस टी सेल, अल्पसंख्याक सेल, कामगार सेल आदी), महाराष्ट्रातील समस्या बद्दल चर्चा, शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी ठोस उपाय योजनासह येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी, विधानसभा निवडणुकीची तयारी, पक्ष सदस्य नोंदणी महाआभियान आणि प्रचार या संबंधाने चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे या शिबिरात फक्त निमंत्रित सदस्यांनाच प्रवेश मिळणार असू, या शिबिरार्थींची निवास व्यवस्था गुरुद्वारा इथल्या पंजाब भवन इथे करण्यात आली आहे.


संपूर्ण 288 विधानसभा जागा लढवणार...


आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील सर्वच महत्वाच्या पक्षाकडून तयारी सुरु झाली आहे. दरम्यान अशात बीआरएस पक्षाने देखील आगामी सर्व निवडणुका लढवण्याचं निर्णय घेतला आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण 288 जागा लढवण्याचा देखील बीआरएस पक्षाकडून हालचाली सुरु आहेत. तर नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिरात देखील विधानसभा निवडणुकीचा मुद्दा महत्वाचा असणार आहे. तसेच यावर विशेष चर्चा देखील होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : आमदाराचा एक फोन अन् एसटी बस हजर; विद्यार्थ्यांची गैरसोय दूर