राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


पावसाची चाहूल... मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण, राज्यात 'वरुण राजा' केव्हा बरसणार?


केरळमध्ये दाखल झालेला पाऊस हळूहळू पुढे सरकत आहे. महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा लागली असून ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोव्यासह देशातील काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नवीन सॅटेलाईट फोटोंनुसार, आज सकाळी 8.45 वाजता केरळपासून गोवा आणि दक्षिण कोकणातील काही भागापर्यंतच्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे ढग दिसून येत आहेत. वाचा सविस्तर


अजितदादांवर कोणती जबाबदारी असेल? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेलयांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यांनी प्रतिक्रिया देणंही टाळलं होतं. त्यानंतर अजित पवारांवर नेमकी कोणती जबाबदारी असणार?, याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. "अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचं पद हे मुख्यमंत्री समान असतं. मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेत्याची राज्यात मोठी भूमिका असते आणि कार्यध्यक्ष झाल्यावर राज्यात माझं रिपोर्टिंग अजित पवारांकडे असणार आहे," असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. यावरुन राज्याची जबाबदारी अजित पवारांवर असल्याचा अंदाज आहे. वाचा सविस्तर


आषाढी वारीमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार


संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडत आहे. 12 जून आणि 13 जूनला पालखीचा पुण्यात मुक्काम आहे. या पालखीनिमित्त पुणे विद्यापीठाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे विद्यापीठाने पालखी दरम्यान असणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षांचं वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध केले जाईल. याशिवाय सासवड परिसरात 14 जून ते 16 जून दरम्यान होणाऱ्या पालखी मिरवणुकीमुळे नियमित परीक्षेला बसू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर


ना सोबत पीए, ना पोलीस सुरक्षा; ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा नांदेड ते मुंबई एकट्याने रेल्वे प्रवास


एखादा मंत्री असो वा एखादा खासदार आमदार त्यांच्या अवतीभवती तुम्हाला त्यांचे पीए किंवा त्यांना असलेली पोलीस सुरक्षा दिसते. दौऱ्यावर जाताना तर अनेकदा नेत्यांसोबत लवाजमा पहायला मिळतो. मात्र राज्यातील एक मंत्री मात्र याला अपवाद ठरत आहेत. भाजपचे संकटमोचक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू अशी ओळख असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोबत कोणालाही न घेताच नांदेड ते मुंबई असा रेल्वेने एकट्याने प्रवास केला. विशेष बाब म्हणजे गिरीश महाजन स्वतःच्या बॅगा स्वतः हातातून घेऊन जात होते. गिरीश महाजन यांना याबाबत विचारले असता मी आमदार असल्यापासूनच एकटा प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर


'सपनों का घर सपने में मिलेगा'; प्रधानमंत्री आवास योजनेवरुन जलील यांचे हटके आंदोलन


छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत होणाऱ्या घरकुल योजनेचा प्रश्न काही सुटता सुटत नसल्याने, खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी हटके आंदोलन केले. स्मार्ट सिटीच्या कार्यालयाच्या बाहेर जलील यांनी हे आंदोलन केले. 'सपनों का घर सपने में मिलेगा' असे म्हणत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान घरकुल योजनेचे उद्घाटन आणि घरकुलाचे उपहासात्मक वाटप करण्यात आले. यावेळी एमआयएमचे कार्यकर्ते आणि घरकुल योजनेचे लाभार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचा सविस्तर