Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) महानगरपालिकेअंतर्गत होणाऱ्या घरकुल योजनेचा प्रश्न काही सुटता सुटत नसल्याने, खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी शनिवारी हटके आंदोलन केले. स्मार्ट सिटीच्या कार्यालयाच्या बाहेर जलील यांनी हे आंदोलन केले. 'सपनों का घर सपने में मिलेगा' असे म्हणत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान घरकुल योजनेचे उद्घाटन आणि घरकुलाचे उपहासात्मक वाटप करण्यात आले. यावेळी एमआयएमचे कार्यकर्ते आणि घरकुल योजनेचे लाभार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


महापालिका क्षेत्रात गोरगरिबांसाठी बांधण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतगर्त घरकुलाचा प्रश्न काही सुटता सुटत नाही. विशेष म्हणजे या घरकुलांसाठी तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लागून काम सुरु होईल अशी अपेक्षा होती. मात्र नवीन प्रशासकांनी ही निविदा रिकॉल केल्याने घरांचे काम दोन वर्षे रखडणार असल्याची टीका होत आहे. दरम्यान याच मुद्यावरुन पुन्हा एकदा जलील यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. जलील यांनी शनिवारी उपहासात्मक घरकुलाचे वाटप करत हटके अनोखे आंदोलन केले. 


उपहासात्मक घरकुल वाटप 


शहरातील घरकुल योजना रखडल्याच्या निषेर्धात पंतप्रधान घरकुल योजनेचे उद्घाटन आणि घरकुल उपहासात्मक वाटप समारंभ जलील यांच्याकडून आयोजित करण्यात आले होते. शहरातील स्मार्ट सिटी कार्यालयासमोर हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री व राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते उपहासात्मक घरकुल वाटप करण्यात आले. तसेच याचवेळी उपहासात्मक घराचे तयार केलेले मॉडेल पंतप्रधानांना पाठवण्यात येणार असल्याचे जलील म्हणाले. तसेच यावेळी झोपडी आणि पत्र्याचे शेडचे घर देखील उभारण्यात आले होते. 


योजना वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात


2022 पर्यंत देशातील प्रत्येक कुटुंबाला घर देण्याचे आश्वासन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. दरम्यान योजनेअंतगर्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीत 39 हजार घरांचे बांधकाम केले जाणार आहे. ज्यात पहिल्या टप्प्यात 8 हजार घरे बांधली जाणार आहे. पण पहिल्यापासूनच ही योजना वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात अडकली. आधी जागा निश्चित होत नव्हती. जागा निश्चित झाल्यावर काढण्यात आलेल्या निविदेत घोटाळा झाल्याचे समोर आहे. ज्यात सुरुवातीला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर यात ईडीची एन्ट्री झाली आणि ईडीकडून कंत्राटदारांच्या घरी छापेमारी झाली. ईडीकडून याचा तपास सुरु आहे. अशातच आता ही निविदा नवीन प्रशासक यांनी रिकॉल केल्याने घरांचे काम दोन वर्षे रखडणार असल्याचे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! छ. संभाजीनगरमधील पंतप्रधान आवास योजना घोटाळ्याप्रकरणी कृषी आयुक्तांना ईडीची नोटीस