Girish Mahajan : एखादा मंत्री असो वा एखादा खासदार आमदार त्यांच्या अवतीभवती तुम्हाला त्यांचे पीए किंवा त्यांना असलेली पोलीस सुरक्षा दिसते. दौऱ्यावर जाताना तर अनेकदा नेत्यांसोबत लवाजमा पहायला मिळतो. मात्र राज्यातील एक मंत्री मात्र याला अपवाद ठरत आहेत. भाजपचे संकटमोचक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू अशी ओळख असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सोबत कोणालाही न घेताच नांदेड ते मुंबई (Nanded To Mumbai) असा रेल्वेने एकट्याने प्रवास केला. विशेष बाब म्हणजे गिरीश महाजन स्वतःच्या बॅगा स्वतः हातातून घेऊन जात होते. गिरीश महाजन यांना याबाबत विचारले असता मी आमदार असल्यापासूनच एकटा प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले. 


....म्हणून सुरक्षा नाकारली : गिरीश महाजन


याबाबत विचारलं असता गिरीश महाजन म्हणाले की, "पोलीस दलावर अतिरिक्त भार येऊ नये म्हणून यापूर्वीच मी वाय प्लस सुरक्षा नाकारली आहे. आणि प्रवासात सुरक्षा व्यवस्था असली की पुन्हा प्रत्येक स्टेशनला 10 अतिरिक्त पोलीस बदलत राहतात. यामुळे नागरिकांनाही त्रास होतो, त्यांची गैरसोय होते आणि पोलीस दलावरही भार वाढतो. म्हणून गेली 30 वर्ष आमदार आणि मंत्री असतानाही एकट्याने प्रवास करतो."


याआधी सुरक्षाही नाकारली


महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त वाय+ (Y+) सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी अतिरिक्त वाय+ सुरक्षा देखील नाकारली होती.


मोकळेढाकळे गिरीश महाजन


महाराष्ट्रातील भाजपचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन आपल्या फिटनेससाठी तसंच मोकळ्याढाकळ्या स्वभावासाठीही ओळखले जातात. जळगावच्या जामनेरमध्ये रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांना खांद्यांवर घेतलं. यानंतर मात्र, गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला प्रतिसाद देत गाण्याच्या तालावर ठेका धरला होता. तर धुळे जिल्हा पोलिसांच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात 'हिट धुळे फिट धुळे' मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी गिरीश महाजन यांनी झुम्बा डान्स केला होता. तरफडणवीस सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी देखील त्यांनी लेझीमच्या तालावर ठेका धरला होती.


हेही वाचा


 


Buldhana News:  बुलढाण्यात याच वर्षी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश सुरू होणार; गिरीश महाजन यांची माहिती