बुलडाणा :  माँ जिजाऊंच्या जन्मस्थळी भेट देऊन माझं जीवन धन्य झालं, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी आज माँ जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज्यपाल हे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.  माँ जिजाऊंचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या विदर्भाच्या दौऱ्याला सुरूवात केली. यावेळी त्यांच्यासोबत विविध मान्यवर उपस्थित होते.


शुक्रवारी सकाळी 11 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा ताफा औरंगाबादहून सिंदखेडराजा येथे दाखल झाला. पोलीस दलाने त्यांन मानवंदना दिल्यानंतर ते शासकीय विश्रामग्रह येथे दाखल झाले. त्यानंतर राज्यपालांनी शहरातील ऐतिहासीक अशा मोती तलावाची पाहणी केली. तसेच राजे ळकोजीराव जाधव यांच्या राजवाड्याला भेट देऊन त्यांनी माँ जिजाऊंना वंदन केले, तसेच तेथील उपस्थितांकडून त्यांनी राजवाड्याची माहिती देखील घेतल. राज्यपाल जवळपास 30 मिनिटे राजवाड्यात होते. यावेळी माध्यमांशी बोलताना राज्यपाल म्हणाले की, आज जिजाऊंच्या जन्मस्थळी भेट देऊन माझ्या जीवनाच सार्थक झाले आहे.


यावेळी राज्यपालांसोबत त्यांचे धाकटे बंधू तसेच पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे , जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती उपस्थित होते. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजवाड्याचा इतिहास सांगितला. दरम्यान, राज्यपाल हे लोणार सरोवराला देखील भेट देणार आहेत. त्यानंतर शासकीय विश्रामग्रहात ते शासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील करणार आहेत. रात्री ते एमटीडीसी विश्रामगृहात मुक्काम करणार आहेत. तसेच उद्या सकाळी 9 वाजता राज्यपाल लोणार येथून जैन मंदिर, शिरपूर जैन करुन वाशिमकडे प्रस्थान करणार आहेत.
  
जिजाऊंचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये 12 जानेवारी 1598 साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागूनच आहे. याच वस्तूसमोर नगरपालिकानिर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वस्तू आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती. येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे, तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे. या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर 8 व्या ते 10 व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे.


महत्त्वाच्या बातम्या: