Compalaint File Agaisnt Police : नाशिकच्या एका राष्ट्रीय सायकलपटू महिलेशी गैरवर्तन करणं कर्नाटक पोलिसांना चांगलंच महागात पडलं आहे.  या रणरागिणीने थेट कर्नाटक पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना चांगलाच घाम फोडला आहे. यामिनी खैरनार असे या राष्ट्रीय सायकलपटूचे नाव आहे. कर्नाटकच्या हद्दीत झालेल्या घटनेबाबत त्यांनी माहिती दिली. 


यामिनी खैरनार यांनी सांगितले की, त्या आपल्या व्यावसायिक भागिदारासोबत कारने 31 जानेवारीला रात्री साडेअकरा वाजता सोलापूरहुन गाणगापूरकडे जात होत्या. दरम्यान कर्नाटकातील बालूर्गी चेकपोस्टजवळ त्यांना दारूच्या नशेत असलेल्या तिघांनी अडवले आणि त्यांच्याकडे RTPCR रिपोर्टची मागणी केली. मात्र हे रिपोर्ट दाखवूनही त्यांना कर्नाटकात प्रवेश देण्यास त्या तिघांनी नकार दिला. तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याला फोन करा नाहीतर आपण सेटलमेंट करून घेऊ असं यामिनी यांना सांगितले. त्या तिघांकडून अशी भाषा वापरताच यामिनी यांनी त्यांच्याकडून ओळखपत्राची मागणी केली. ओळखपत्र मागताच त्या तिघांनी त्यांना गाडी खाली उतरण्यास भाग पाडून अरेरावीची भाषा सुरू केली. कोणाकडेही मास्क नव्हते, आयकार्ड नव्हते, नाव सांगत नव्हते आणि सगळ्यांनी दारू प्यायले होते असे यामिनी यांनी सांगितले. 


112 क्रमांकावरूनही मदत नाही 


यामिनी यांनी 112 या हेल्पलाईनला कॉल केल्यानंतर दीड तासांनी तिथे पोलिस, आरोग्य आणि महसूल विभागाचे अधिकारी पोहोचले. मात्र, त्यांनी देखील त्यांच्याशी गैरवर्तन करत आपण मिटवून घेऊ असं म्हणत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. यामिनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यावसायिक भागिदारालाही धमकीही देण्यात आली. यंत्रणेतील लोकांकडून सुरू असलेल्या या त्रासाविरोधात यामिनी यांनी जवळील अफजलपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या ठिकाणी पोलीस झोपले होते. त्या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक आणि इतरांनी यामिनी यांच्याशी हुज्जत घालत तक्रार नोंदवण्यास नकार दिला. इतकंच नव्हे तर मध्यरात्री दोन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. 


अखेर गुन्हा दाखल


या मानसिक छळानंतरही न डगमगता यामिनी यांनी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला आणि सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली. चेकपोस्टवरील तीन अधिकारी, एक हेडकॉन्स्टेबल, महसूल अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि अफजलपूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली. 


ट्वीटकरूनही मदत नाही. 


कर्नाटक पोलिसांकडून त्रास दिला जात असताना महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकारसह केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांसह अनेकांना ट्वीट करण्यात आले होते. मात्र, त्याची कोणीही दखल घेतली नसल्याचे यामिनी यांनी सांगितले. मी अनुभवलेले रात्रीचे ते सर्व सात तास खूपच भयानक होते. त्या रात्री काहीही घडू शकले असते. असा प्रकार कोणत्याच महिलेसोबत घडू नये याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.